कंट्या …. 🩷🤍


गणेश बर्गे या लेखकांच नाव ऐकलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतं ते त्यांच्या लिखाणातील खरं, साधं पण मनाला स्पर्श करणारं गावाचं चित्र.पहिल्यांदा शिरसवाडी वाचल्यानंतर त्यांच्या शब्दांच्या प्रेमात पडलो होतो नि कंट्या वाचून तर अजून जास्त …🌿

कंट्या ही फक्त एका मुलाची गोष्ट नाही तर ती एका पिढीची, एका गावाची नि त्या सगळ्या एकट्या मनांची गोष्ट आहे जी प्रेम, आधार अन् ओळख शोधत असतात.
कंट्याचा जन्मच आईच्या मायेविना झाला. लहानपणीचं आईचं सावट गेलं नि तो आजी-आजोबांच्या आधाराने वाढला. बाहेरून बिनधास्त, रांगडा, गावभर भटकणारा, कुणासाठी लोफर तर कुणासाठी टुकार… पण आतून? आतून तो एकटा, तुटलेला, खूप संवेदनशील नि कुणीतरी आपलं म्हणावं यासाठी तडफडणारा मुलगा.

गणेश सरांची लेखनशैली ही या कथेला वेगळं आयुष्य देते. त्यांची गावरान नि थेट मनात उतरणारी भाषा वाचकाला सरळ त्या गावाच्या वेशीवर आणून उभी करते. जणू आपण तिथेच आहोत चहाच्या टपरीवर बसलेलो, शेताच्या कडेला उभे राहून मळ्याची हवा घेत आहोत किंवा एखाद्या उन्हाळी दुपारी गावातील मुलांसोबत गल्लीबोळात खेळतोय. यातील पात्रं इतकी जिवंत आहेत की आपण त्यांना आपल्या गल्लीत 
किंवा शाळेत भेटल्याचं वाटतं.

कथानकाच्या प्रवासात कंट्याचं बालपण, त्याचे अनुभव, त्याच्या चुकांचा गोंधळ, त्याचे बिनधास्त निर्णय नि आतून चाललेला संघर्ष सगळं हळूहळू उलगडत जातं. कधी तो हसवतो, कधी चिडवतो, तर कधी अचानक रडवून जातो. त्याच्या आयुष्यातली रिक्तता,त्याला मिळालेलं नि गमावलेलं प्रेम व आपल्या समाजाकडून मिळणाऱ्या नजरा हे सगळं इतक्या खरीपणाने मांडलेलं आहे की वाचताना हे सर्व मनावर ठसतं.

पुस्तकातले काही प्रसंग मनावर खोल परिणाम करून जातात जे कितीतरी दिवस मनात घर करुन राहतात.
काही ठिकाणी वाचकाला त्याचा रागही येतो नि त्याच्याबद्दल करुणाही वाटते. कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात कुणीतरी ‘कंट्या’सारखा असतो जो बाहेरून कठोर दिसतो पण आतून मात्र फार कोमल असतो.

प्रकाश कोयाडे सरांनी एका ठिकाणी म्हटलंय, “कंट्या हा एक दगड आहे कधी इतका मऊ की हातात धरावा, कधी अणकुचीदार टोकाने पायाला जखम करावा.” खरंच, कंट्याचं व्यक्तिमत्त्व असंच आहे कधी आपल्याला आपुलकीने भिडणारं तर कधी आपल्याला दुखावणारं.

मला या कादंबरीची खासियत वाटते ती म्हणजे याची प्रामाणिकता. यात कुठेही कृत्रिम गोडवा नाही, अनाठायी नाट्य नाही नि नुसतं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न नाही. यात जीवन तसं आहे तसं दाखवलं आहे रांगडं, खडतर पण हृदयाला भिडणारं.

शेवटाकडे कथानक जेव्हा वेग घेऊन एका निर्णायक वळणावर येतं तेव्हा वाचक थोडा थांबतो. शेवट झाल्यावरही मन मात्र थांबत नाही . कंट्याचं आयुष्य, त्याचे निर्णय, नि त्याच्या आतल्या लढाया सतत मनात फिरत राहतात. पुस्तक संपतं पण कंट्या आपल्या मनातून काही जात नाही. तीन वर्षानंतर सुद्धा या कादंबरीचा शेवट डोळ्यासमोर आहे .

माझ्यासाठी कंट्या हा फक्त एक पात्र नाही तर आरशासारखा आहे. मी त्यात माझं गाव, माझं बालपण, नि कधीकाळी मनात दडवून ठेवलेल्या वेदना पाहिल्या. कधी त्याच्यासारखा हसलो, कधी रागावलो तर कधी शांत बसून त्याच्यासारखा विचार सुद्धा केला.

आजच्या फेक नि स्वार्थी जगात कंट्या ही कादंबरी म्हणजे एक खोल श्वास आहे. ते आपल्याला पुन्हा माणूस बनवते , आपल्या आतल्या संवेदनांना हलवते नि आपल्याला त्या गावाकडे, त्या माणसांकडे परत नेऊन ठेवते जिथून आपण दूर आलो आहोत.🥹🌱

©Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼