राधेय ...❤️
अखेर काही दिवसांपूर्वी राधेय ही रणजित देसाई सरांची मराठी साहित्यात महत्वपूर्ण असलेली कादंबरी वाचून पूर्ण केली.जी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. 1973 साली प्रकाशित झालेली ही कादंबरी फार वाचनीय आहे.कर्णाच्या जीवनातील अंतर्गत द्वंद्व, त्याची वीरता, त्याग नि सामाजिक अन्याय यांचे मार्मिक चित्रण या कादंबरीतून केले आहे, ज्यामुळे ती वाचकांसाठी एक पर्वणी आहे.
पांडवांचा सावत्र भाऊ असूनही ‘सूतपुत्र’ म्हणून हिनवल्या गेलेल्या कर्णाची कहाणी ही त्याच्या जन्मापासूनच सुरू झालेल्या संघर्षाची, अपमानाची नि आत्मसन्मानासाठीच्या लढ्याची कहाणी आहे. लेखकांनी कर्णाच्या व्यक्तिरेखेला एक मानवी चेहरा दिला आहे, ज्यामुळे वाचकांना त्याच्या भावनिक अन् मानसिक द्वंद्वाशी जोडता येते. कादंबरीची सुरुवातच मुळात पांडवांना कर्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या खऱ्या ओळखीची जाणीव होत असताना होते नि मग कर्णाचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडत जातो.
कर्णाला ‘राधेय’ का म्हणतात? याचा उलगडा या कादंबरीच्या नावातच आहे. कर्णाला त्याच्या आई राधेच्या नावाने ओळखले जाते, जरी तो कुंतीचा पुत्र असला तरी. लेखकांनी कर्णाच्या या ओळखीच्या द्वंद्वाला केंद्रस्थानी ठेवून, त्याच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर त्याला भोगाव्या लागलेल्या सामाजिक अपमानांचे व त्याच्या स्वाभिमानाचे चित्रण केले आहे व त्यांनी कर्णाच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगाला एक काव्यात्मक नि भावनिक स्पर्श दिला आहे. कादंबरीतील संवाद नि वर्णने इतकी प्रभावी आहेत की, वाचक कर्णाच्या भावनिक प्रवासात पूर्णपणे गुंतून जातो. रणजित सरांनी कर्णाच्या व्यक्तिरेखेला एका योद्ध्यापेक्षा अधिक गहनता दिली आहे; त्याला एक संवेदनशील, आत्मसन्मानासाठी झगडणारा नि आपल्या कर्तव्यासाठी प्राण पणाला लावणारा माणूस म्हणून दाखवले आहे.🌾
कादंबरीत कर्णाच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, जसे की त्याचा द्रौपदीच्या स्वयंवरातील अपमान, दुर्योधनाशी असलेली मैत्री नि अर्जुनाशी असलेले शत्रुत्व, यांचे अतिशय बारकाईने चित्रण केले आहे. विशेषत: द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगात कर्णाची भूमिका व त्याच्या मनातील द्वंद्व यांचे चित्रण आपल्याला विचार करायला भाग पाडते.
कर्ण ही महाभारतातील सर्वात जटिल नि आकर्षक व्यक्तिरेखांपैकी एक आहे नि रणजित सरांनी त्याला पूर्णपणे न्याय दिला आहे. कादंबरीत कर्णाला ‘सूतपुत्र’ म्हणून हिनवले जाणे, तरीही त्याने आपल्या कर्तृत्वाने नि वीरतेने स्वत:ची ओळख निर्माण केली. त्याच्या जीवनातील प्रत्येक अपमान त्याला अधिक दृढनिश्चयी बनवतो व त्याच वेळी त्याच्या मनातील करुणा नि उदारता यांचेही दर्शन घडते. लेखकांनी कर्णाच्या दुर्योधनाशी असलेल्या मैत्रीला अन् त्याच्या कर्तव्यनिष्ठेला विशेष महत्त्व दिले आहे, ज्यामुळे कर्णाची नैतिकता नि त्याची अंतर्गत लढाई अधिक स्पष्ट होते.
कर्णाच्या जीवनावर आधारित शिवाजी सावंत सरांनी लिहलेली ‘मृत्युंजय’ हि कादंबरी मी फार पूर्वी वाचली आहे तर राधेय हि नुकतीच वाचली.या दोन्ही कादंबऱ्या कर्णाच्या जीवनाला केंद्रस्थानी ठेवतात, परंतु त्यांचा दृष्टिकोन नि लेखनशैली काहीप्रमाणात भिन्न आहेत. ‘मृत्युंजय’ ही अधिक सखोल आहे, तर राधेय ही भावनिक नि मानवी पैलूंवर अधिक भर देते. रणजित देसाई यांनी कर्णाला एक योद्धा नि माणूस म्हणून सादर केले आहे, ज्यामुळे आपल्याला त्याच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगात सहभागी होता येते.
‘राधेय’ ही कादंबरी केवळ कर्णाच्या जीवनाची कहाणी नाही, तर ती प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसन्मान, कर्तव्य नि सामाजिक दबावांशी असलेल्या लढ्याचे प्रतीक सुद्धा आहे. लेखकांनी कर्णाच्या जीवनातील प्रत्येक पैलू इतक्या संवेदनशीलतेने मांडले आहेत की, आपल्याला कर्णाच्या प्रत्येक निर्णयामागील कारणे नि त्याच्या भावना समजतात.
बाकी,शेवटी एवढंच की रणजित देसाई यांनी कर्णाला एका पौराणिक व्यक्तिरेखेपेक्षा एका माणसाच्या रूपात उभा केलं आहे, ज्याचं आयुष्य अपमान अन् संघर्षांनी भरलेलं आहे, तरीही तो आपल्या कर्तव्यासाठी नि सन्मानासाठी लढत राहतो. मला वैयक्तिकरित्या या कादंबरीतील कर्णाची दुर्योधनाशी असलेली मैत्री नि त्याच्या अंतर्मनातील द्वंद्व खूप प्रभावित करणारे वाटले.
नक्की वाचा...❤️
©️Moin Humanist 😊
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा