मुसाफिर....❤️🌼
अच्युत गोडबोले यांचं ‘मुसाफिर’ हे आत्मचरित्र मी वाचलं, त्याला बरीच वर्षं झाली असली तरीही या पुस्तकाची मोहिनी आजही माझ्या मनावर तशीच आहे. या पुस्तकाबद्दल माझा अनुभव मी असंख्य वेळा लिहायचं ठरवलं, पण ते काही जमलं नाही. मात्र, काल रात्री एका मित्राने सुचवल्यामुळे दोन ओळी लिहितोय जेणेकरून ज्यांनी अजून हे अफाट आत्मचरित्र वाचलं नसेल, त्यांना याबद्दल कल्पना येईल नि ते आवर्जून वाचून समृद्ध होतील.🌼
मुसाफिर एक स्वप्नं, ध्येयं नि आयुष्यातील चढ-उतारांमधून प्रवास करणाऱ्या एका मुसाफिराची प्रेरणादायी गाथा आहे. अच्युत गोडबोले, एक मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा, जो आपल्या बुद्धिमत्तेच्या, मेहनतीच्या नि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर आयटी, साहित्य, संगीत नि समाजकार्य अशा विविध क्षेत्रांत यशस्वी झाला, त्याची ही कहाणी प्रत्येकाला काहीतरी शिकवते. ‘मुसाफिर’ वाचताना मला जाणवलं, की आयुष्य हा एक प्रवास आहे, अन् तो कसा जगायचा, हे आपल्या हातात आहे.मुसाफिर’ हे अच्युत गोडबोले सरांच आत्मचरित्र आहे, जे २०१२ मध्ये प्रकाशित झालं नि फार लोकप्रिय झालं. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास बालपणापासून ते आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनीअरिंग, आयटी क्षेत्रात CEO पदापर्यंत नि मग साहित्य, संगीत व समाजकार्यापर्यंत अतिशय प्रामाणिकपणे मांडला आहे. गोडबोले यांचं आयुष्य म्हणजे एक रोलर-कोस्टर राइड आहे. त्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं, दहावीत राज्यात Rank मिळवला, IIT तं शिष्यवृत्तीवर शिक्षण घेतलं, पण कॅम्पस प्लेसमेंट सोडून भिल आदिवासींसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. केमिकल इंजिनीअरिंग शिकले, पण स्वतःला स्वयंशिक्षित करत आयटी क्षेत्रात करिअर केलं. टाटा मिल्सपासून ते आयबीएम, पतनी कॉम्प्युटर्स नि एल अँड टी इन्फोटेकच्या सीईओपर्यंतचा त्यांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे.🌼
मला या पुस्तकात सर्वात जास्त भावलं ते गोडबोले यांचं “मी हे का करू शकत नाही? हा कमालीचं सकारात्मक दृष्टिकोन. त्यांनी आयुष्यात अनेक आव्हानं स्वीकारली मग ती आयटी क्षेत्रात शिकण्याची असो, की नैराश्यातून बाहेर पडण्याची. त्यांच्या मुलाला ऑटिझम आहे नि यामुळे त्यांनी ‘आशियाना’ नावाची विशेष मुलांसाठी शाळा सुरू केली. या प्रसंगाने मला त्यांच्या संवेदनशील अन् समाजाप्रती जबाबदारीची जाणीव दाखवली. त्यांनी धूम्रपान व मद्यपान सोडण्याचा निर्णयही मुलाच्या स्थितीमुळे घेतला, जो त्यांच्या दृढनिश्चयाचं उदाहरण आहे. सरांची लेखनशैली खूपच सहज नि फार प्रवाही आहे.ते आपल्या आयुष्यातील चढ-उतार, यश अन् अपयश याबद्दल इतक्या मोकळेपणाने लिहितात, की वाचकाला त्यांच्याशी आपोआप जोडलं जातं.
पुस्तकात संगीत, साहित्य, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान नि समाजशास्त्र यांबद्दलचे त्यांचे विचार आहेत, जे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवतात. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचा नि भेटलेल्या व्यक्तींचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर कसा पडला, हे वाचताना मला वाचनाची नि नवीन शिकण्याची प्रेरणा मिळाली.‘मुसाफिर’ हे पुस्तक तरुणांसाठी खास आहे, कारण ते सांगतं, की आयुष्यात काहीही शक्य आहे, जर तुम्ही मेहनत नि आत्मविश्वास ठेवला तर.त्यांनी स्वतःच्या चुका मान्य केल्या आणि त्या सुधारून पुढे गेले, हे मला खूप प्रेरणादायी वाटलं.
एकंदरीत मुसाफिर हे पुस्तक मला एका प्रवासाचं तिकीट देऊन गेलं सरांच्या आयुष्याच्या रस्त्यावरून फिरण्याचं.त्यांचं वाचनाचं वेड, नवीन शिकण्याची उत्सुकता नि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ मला खूप भावली. हे पुस्तक वाचून मला जाणवलं, की आयुष्य हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आहे अन् त्यासाठी धाडस नि प्रामाणिकता असणे मस्ट आहे.
जर तुम्ही प्रेरणादायी एखादा आत्मचरित्र शोधत असाल, तर ‘मुसाफिर’ नक्की वाचा.अच्युत सरांचा हा प्रवास तुम्हाला आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून बघायला शिकवेल एवढं नक्कीच.
पुस्तकाच्या शेवटी अच्युत सर म्हणतात,
आजपर्यंत जे काही अतुलनीय असं पाहिलं, ऐकलं, वाचलं, अनुभवलं, समजावून घेतलं ते सगळं लोकांपर्यंत पोचावं अशी प्रामाणिक इच्छा 'मुसाफिर' मागे आहे. 'मुसाफिर' वाचून कोणाला यातलं एखादं पुस्तक वाचावंसं वाटलं, एखादं ठिकाण वेगळ्या नजरेनं पाहावंसं वाटलं, एखादं गाणं त्यातल्या नवीन समजलेल्या बारकाव्यांसकट ऐकावंसं वाटलं, एखाद्याला यात आलेल्या कोणत्या तरी विषयाचा अभ्यास करावासा वाटला, त्याच्या किंवा तिच्या विचारात, आयुष्यात एखादं नवीन स्फुलिंग पेटलं तरी हे पुस्तक लिहिल्याचं मला समाधान लाभेल. त्यामुळेच तर मला सतत काहीतरी करावंसं वाटतं आणि माझं क्षितिज सतत पुढेच जात असतं. म्हणूनच विंदांसारखंच मलाही सतत वाटत राहतं,
मी चालतो अखंड चालायचे म्हणून;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे ❤️🌾
©️ Moin Humanist 🌼
माझे सर्वच पुस्तकं अनुभव तुम्ही -
Moin's Shelf वर वाचू शकता.❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा