श्यामची आई....❤️🌼
आज साने गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाची आठवण येणे साहजिकच आहे नि त्यामुळे मी याबद्दल मागे लिहलेलं अनुभव इथे देतोय जेणेकरून अजूनपर्यंत ज्यांनी हे पुस्तक वाचत नसेल तर वाचतील..🌼
हे पुस्तक आईच्या प्रेमाचा, संस्कारांचा नि माणुसकीचा एक खजिना आहे. साने गुरुजींनी आपल्या आई, यशोदाआई, यांच्या आठवणींना शब्दबद्ध केलं नि मराठी साहित्यात एक अजरामर कृती निर्माण केली.‘श्यामची आई’ हे साने गुरुजींचं आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे, ज्यात श्याम (म्हणजेच साने गुरुजी) आपल्या बालपणीच्या आठवणी सांगतात.
हे पुस्तक त्यांनी 1933 मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना अवघ्या पाच दिवसांत लिहिलं 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी. 42 रात्रींच्या कथांमधून त्यांनी आपल्या आईच्या प्रेमाचा, त्यागाचा नि संस्कारांचा प्रवास मांडला आहे. प्रत्येक रात्र वाचताना आपण कोकणातल्या गावात, सह्याद्रीच्या सान्निध्यात नि समुद्रकिनारी हरवतो.पुस्तकात यशोदा आईचं प्रेम कसं नितळ आहे, हे दिसतं. ती श्यामला सांगते, “प्रेम देण्यातच खरा आनंद आहे.” माणसांवर, प्राण्यांवर, झाडांवर प्रेम करायला ती शिकवते. “तळव्याला माती लागू नये म्हणून जपतोस, तसंच मनाला माती लागू नये म्हणून जप,” हे तिचं वाक्य आपल्याला खूप भावून जातो.
यशोदा आई फक्त श्यामचीच नाही, तर प्रत्येक वाचकाची आई बनते. तिच्या साध्या शिकवणी, जसे की खरं बोलणं, स्वच्छ राहणं, दुसऱ्यांना मदत करणं, आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.साने गुरुजींची लेखनशैली खूप सोपी पण हृदयाला भिडणारी आहे. त्यांनी 42 प्रकरणांमधून श्यामच्या लहानपणाचे प्रसंग इतक्या भावनेने लिहिले, की वाचताना डोळे नि मन दोन्ही भरून येतात. “प्रेम, ज्ञान नि शक्ती” यांचा संगम आयुष्याला पूर्णत्व देतो, हे त्यांचं तत्त्वज्ञान मला खूप प्रेरक वाटलं. विशेषतः “दुसऱ्यापेक्षा जास्त येतं म्हणून गर्व करू नकोस,” ही शिकवण आजच्या काळातही खरी आहे.
‘श्यामची आई’ 1935 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झालं नि आज 90 वर्षांनंतरही त्याचा प्रभाव कायम आहे. आजपर्यंत 3 लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक ‘अनाथ विद्यार्थी गृह’ या संस्थेला मदत व्हावी म्हणून त्यांनी प्रकाशित केलं होतं. मराठी साहित्यातील ‘मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र’ असं आचार्य अत्रे यांनी याला म्हटलं, नि ते खरंच आहे.
वाचताना मला वाटलं, मी श्यामच्या जागी आहे नि यशोदा आईच्या आठवणी ऐकतोय. प्रत्येक रात्र मला काहीतरी नवं शिकवून गेली.वाचताना मी कितीवेळा रडलो, किती शिकलो, हे सांगता येणार नाही. श्यामच्या प्रत्येक आठवणीतून आयुष्याकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली. हे पुस्तक फक्त डोळ्यांनाच नाही, तर काळजाला पाझर फोडतं. वाचण्याआधी नि नंतर मी बदललोय व मला खात्री आहे, तुम्ही वाचलात तर तुमचंही मन भरून येईल.
जर तुम्ही अजून ‘श्यामची आई’ वाचलं नसेल, तर नक्की वाचा.
साने गुरुजींची ही अमर कृती तुम्हाला माणूस म्हणून समृद्ध करेल.
तुम्हाला पुस्तकातलं कोणतं वाक्य किंवा प्रसंग आवडलं ते इथे शेअर करा..❤️🌼
©️Moin Humanist🌼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा