भंगार...💔🌼
एखादं पुस्तक असतं, जे वाचताना ते आपल्याला आपल्या जागेवर बसूनच हेलावून टाकतं. भंगार असंच एक पुस्तक आहे.मागे दलित साहित्यातील सर्वच आत्मचरित्र वाचल्यानंतर मी जेव्हा हे पुस्तक उघडलं नि वाचत गेलो नि हे वाचल्यानंतर लक्षात आलं की ही फक्त अशोक जाधव यांची गोष्ट नाही... ही त्या संपूर्ण गोसावी समाजाची वेदना, जगणं नि त्यातून वर यायचा संघर्ष आहे.
अशोक जाधव नावाचा एक लहान मुलगा, उकिरड्यावर, कचऱ्यातून भंगार गोळा करत मोठा होतो. भीक मागणं, अपमान सहन करणं, भुकेलेपणावर झोपणं नि आईला रोज दारु पिऊन येणाऱ्या बापाकडून शिव्या-मार खाणं हे त्याचं बालपण असतं. त्या समाजात शिक्षण म्हणजे “बिगडणं” असं समजलं जातं. पण अशोकला शाळा बघून शिकायचं वेडच चढतं. अन् तिथून सुरू होतो त्याचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे.
तो शाळेत जातो, चोरी करून का होईना पण पुस्तक मिळवतो नि बी.ए., बी.एड्. होतो. शिक्षक होतो. शिक्षक म्हणून काम करताना तो समाजाच्या खऱ्या प्रश्नांवर बोट ठेवतो, बोलतो, प्रश्न विचारतो. हेच त्याचं वेगळेपण ठरतं.त्याच्या समाजात जातपंचायत म्हणजे सर्वोच्च सत्ता. पण तिथे न्याय नाही, केवळ दहशत असते. महिलांना काहीच किंमत नसते. त्यांचं लग्न, त्यांची प्रतिष्ठा, आयुष्य सगळं पंचायतीच्या मर्जीवर असतं. अशोक याच पंचायतीच्या विरोधात उभा राहतो. आपल्या बहिणीला शिकवतो, डॉक्टर बनवतो. त्याच्या घरच्यांनी जे स्वप्नही पाहिलं नव्हतं, ते तो प्रत्यक्षात आणतो.
भंगार हे पुस्तक म्हणजे भंगारात सोनं शोधण्याचा जिद्दीचं उदाहरण आहे. ते केवळ शिक्षण मिळवून थांबत नाही, तर समाजाला संघटित करतो, राजकारणात भाग घेतो, संस्थांमधून काम करतो. भंगाराच्या पोत्याऐवजी टेम्पो येतो नि त्याचा समाज हळूहळू ‘दिसू’ लागतो. या पुस्तकात अशा कितीतरी गोष्टी आहेत . आईचं थकलेलं जगणं, जातीनं पायावर घातलेली बेडी, समाजाच्या नावानं गिळवलेलं स्वप्न नि तरीही त्या सगळ्यावर मात करत माणूस म्हणून उभं राहिलेला अशोक.
जेव्हा मी हे पुस्तक वाचलं तेव्हा सुन्न झालो होतो.तेव्हा थोडा वेळ काहीच सुचतं नव्हतं. मनात विचारांचे वादळ सुरू झालं होतं. आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो शिक्षण, स्वच्छ कपडे, दोन वेळचं अन्न त्यासाठी कुणाला किती लढावं लागतं हे लक्षात आलं.
हे पुस्तक फक्त एका गोसावी समाजाची गोष्ट नाही, ही एक आरसा आहे जो आपल्याला दाखवतो की या देशात अजून किती समाज, किती लेकरं, किती माणसं अशाच परिस्थितीत जगत आहेत नि त्यांच्यासाठी किती काम होणं गरजेचं आहे.हे पुस्तक वाचताना इतकं राग, दुःख, अभिमान सगळं एकत्र वाटतं. हे पुस्तक असं काहीतरी आहे, जे शेवटपर्यंत आपल्याला हलवतं आतून, खोलवर. मी अनेक आत्मचरित्रं वाचली, पण "भंगार" काहीतरी वेगळं आहे. कारण यात शब्दांपेक्षा भावना जास्त बोलतात. समाजाने फेकलेली माणसं, त्यांचं जगणं, त्यांची स्वप्नं.. हे सगळं यात आहे.
हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. जे आपल्याला आठवतं करून देईल की शिकणं, माणूस होणं, दुसऱ्यासाठी उभं राहणं हीच खरी क्रांती आहे नि आपल्याला करायची आहे.❤️
©️Moin Humanist 🌼
हे पुस्तक घरपोच सवलतीत मिळवण्यासाठी We Read ला संपर्क करू शकता.
9518398168 किंवा https://wa.me/7066495828
या व्हाट्सअप्प नंबर वर पुस्तकाचं नाव नि आपला पत्ता पाठवा...🌼❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा