आस्तिकशिरोमणी चार्वाक ❤️🌼

चार्वाक या तत्त्वज्ञानाबद्दल जेव्हा मला कोणी  विचारतो तेव्हा मी त्यांना नेहमी एकच पुस्तक सुचवतो डॉ. आ. ह. साळुंखे लिखित "आस्तिकशिरोमणी चार्वाक".

 हे पुस्तक चार्वाक तत्त्वज्ञानाची सखोल नि नवी दृष्टी देणारं आहे. आपल्याकडे चार्वाक म्हटलं की लगेच ‘नास्तिक’, ‘भोगवादी’, ‘धर्मद्रोही’ अशा चुकीच्या संकल्पना पुढे येतात. पण या पुस्तकातून लेखकाने चार्वाक हा नास्तिक नाही, तर खऱ्या अर्थाने ‘आस्तिकशिरोमणी’ आहे असं ठामपणे सांगितलं आहे. कारण चार्वाक वेदांवर, देवावर, आत्म्यावर विश्वास न ठेवता मनुष्य, त्याचं शरीर, अनुभव, बुद्धी नि प्रत्यक्ष जीवन यावर आधार ठेवतो. तो परमेश्वर, आत्मा, पुनर्जन्म या गोष्टी नाकारतो पण माणसाचं सुखदुःख, न्याय-अन्याय, विवेक अन् समता यांवर विश्वास ठेवतो.

हे पुस्तक एकूण आठ भागांमध्ये विभागलेलं असून चार्वाकांचे मूळ ग्रंथ कसे नष्ट झाले, तरी त्यांचे विचार कसे जिवंत राहिले, त्याचा इतिहास, तत्त्वज्ञान, सामाजिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानतेविषयीचे विचार, यज्ञ-धर्म-जातिव्यवस्थेविषयी त्यांचा विरोध नि माणसाच्या स्वातंत्र्याचा सन्मान या सर्व गोष्टी खूप समजूतदारपणे मांडलेल्या आहेत. प्रसिद्ध ओळ "कर्ज काढा पण तूप प्या" यामागेही फक्त भोग नाही, तर हेच एकच जीवन आहे, ते विवेकाने नि आनंदाने जगा, असा अर्थ आहे.

चार्वाक स्त्रीला वस्तू म्हणून न पाहता तिलाही माणूस मानतो. स्त्री-पुरुष संबंध, कामजीवन नि घरगुती व्यवहार याबाबतीत चार्वाकचं तत्त्वज्ञान हे समतावादी, सुसंस्कृत व मानवी मुल्यांवर आधारित आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला जाणवतं की चार्वाक हा केवळ प्राचीन विचारवंत नव्हता, तर आजच्या काळातही त्याच्या विचारांची गरज आहे.माणूस, त्याचं सुख, दुःख, शरीर, स्वातंत्र्य, न्याय नि विवेक यावर केंद्रित असलेलं चार्वाकचं तत्त्वज्ञान खरंतर माणुसकीचं तत्त्वज्ञान आहे.

हे पुस्तक वाचणं म्हणजे आपल्यातील झोपलेल्या विचारांना जागं करणं आहे असं मला वयक्तिक वाटतं...❤️ 

©️Moin Humanist ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼