माती, पंख आणि आकाश... 🌼❤️
हे पुस्तक मी प्रथमच वाचलं ते 2021 च्या लॉकडाऊन काळात. त्या वेळी बाहेरचं सगळं बंद असताना माझ्या मनातल्या विचारांमध्ये फार काही सुरू होतं नि अशाच वेळी ‘माती, पंख आणि आकाश’ हे अप्रतिम पुस्तक माझ्या हातात आलं. अक्षरनामा पोर्टवरील एक लेख वाचून मी हे पुस्तक वाचायला घेतलं नि वाचतच सुटलो. मला आठवतं हे वाचल्यानंतर मी फार भारावून गेलं होतं.या पुस्तकातून मला सकारात्मक विचार, प्रेरणा नि आत्मविश्वास याचं एक वेगळंच बळ मिळालं होतं ज्याची त्याकाळी मला फार गरज होती.
तेव्हा हे पुस्तक वाचल्यानंतर आपण भविष्यात या लेखकाला प्रत्यक्ष भेटु असं अजिबात विचार केलं नव्हतं.पण गेल्या वर्षी आमच्या कॉलेजमध्ये Colloquy या कार्यक्रमासाठी सर आले. त्यांची मुलाखत होती त्यावेळी मी आवर्जून त्यांना भेटलो.वेळेअभावी जरी फारसं बोलणं झालं नाही तरीही पुस्तकाबद्दल थोडंफार बोललो. तो क्षण आजही लक्षात आहे.तेव्हापासून मला दोन शब्द या पुस्तकाबद्दल लिहायचं होतं जेणेकरून इतरांना या पुस्तकाबद्दल माहिती होईल,पण हेक्टिकमुळे ते तेव्हा काही जमलं नाही पण आज अखेर माझा हा छोटासा अनुभव लिहितोय.
हे पुस्तक वाचताना सतत असं वाटत की, एका साध्या ग्रामीण भागातल्या मुलाने केवढा मोठा प्रवास केला आहे. शिक्षण, समाजकार्य, देशसेवा सगळं काही सरांनी आपल्या आयुष्यात जगून दाखवलं आहे. 'माती' म्हणजे आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं, 'पंख' म्हणजे स्वप्नं पाहणं नि उडायला शिकणं, व 'आकाश' म्हणजे मोठं ध्येय गाठण्याची जिद्द हे पुस्तक याच त्रिसूत्रीचा अर्थ समजावून सांगतं.
सरांच्या आयुष्यातलं शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नव्हतं, तर समाजासाठी काहीतरी करावं, देशाच्या सेवेसाठी स्वतःला सिद्ध करावं यासाठी होतं. त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत काम करताना जे अनुभव घेतले, ते त्यांनी फार प्रामाणिकपणे शेअर केले आहेत. देशाचं प्रतिनिधित्व करताना त्यांना काय वाटत होतं, कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागलं हे सगळं खूप मनापासून मांडलेलं आहे.
मी सुद्धा सध्या विद्यार्थी असल्याने, सरांचा प्रवास मला खूप आपलासा वाटतो. कधी कधी आपण हताश होतो, अपयश येतं, पण सरांनी दाखवलं की चिकाटी नि मेहनत असेल, तर कितीही सामान्य पार्श्वभूमी असली तरी मोठं यश मिळवता येतं. त्यामुळे त्यांच्या अनुभवातून मला शिकण्यासारखं खूप आहे. अभ्यासाबद्दल, जीवनाबद्दल नि स्वतःवर विश्वास ठेवण्याबद्दल.
माझ्या आयुष्यात भुरा या पुस्तकानंतर या पुस्तकाने एक नवा विचार जागवला आहे की शिक्षण हे केवळ मार्क्ससाठी किंवा नोकरीसाठी नको, तर ते आपल्याला चांगला माणूस बनवण्यासाठी हवं असतं. देशासाठी, समाजासाठी काहीतरी सकारात्मक करायची जाणीव शिक्षणाने यायला हवी हे सरांच्या जीवनातून स्पष्ट होतं.या पुस्तकाने मला माझ्या ध्येयाकडे अधिक ठामपणे वाटचाल करण्याची ताकद दिली आहे.
मला वाटतं हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. विशेषतः तरुणांनी. कारण हे पुस्तक आपल्या स्वप्नांना दिशा देतं, आपलं मनोबल वाढवतं नि आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देऊन जातं एवढं नक्की....🌼❤️
©️Moin Humanist 🌼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा