द दा विंची कोड: रहस्य अन् थराराचा अविस्मरणीय प्रवास 🌼
डॅन ब्राऊन यांची ‘द दा विंची कोड’. ही साधारण 454 पानांची कादंबरी वाचताना मला जणू एका गूढ खजिन्याच्या शोधात पॅरिसच्या रस्त्यांवरून लंडनच्या गल्लीबोळांपर्यंत नि त्याही पलीकडे स्कॉटलंडच्या गडद जंगलांपर्यंत भटकल्यासारखं वाटलं.हे एक असा अनुभव आहे जिथे आपण इतिहास, कला, धर्म अन् रहस्य यांच्या एका गुंतागुंतीच्या जाळ्यात सापडत जातो. डॅन ब्राऊन यांचं लेखन इतकं ताकदवान आहे की लुव्हर संग्रहालयातली रहस्यमयी रात्र, प्राचीन गुप्त संस्थांचा थरार नि होली ग्रेलचा शोध माझ्या डोळ्यांसमोर जिवंत झाला. त्यांनी शब्दांतून एका गूढ विश्वाचा नकाशा इतक्या बारकाईने रंगवलाय की मी वाचता वाचता त्या रहस्याचा एक हिस्सा बनलो होतो.
ही कादंबरी पॅरिसच्या लुव्हर संग्रहालयातल्या एका रहस्यमयी खुनाभोवती फिरते. हार्वर्डचा सिम्बॉलॉजिस्ट प्राध्यापक रॉबर्ट लँग्डन नि फ्रेंच क्रिप्टॉलॉजिस्ट सोफी न्युव्हो यांना या खुनाच्या तपासात अनपेक्षितपणे ओढलं जातं. खून झालेला माणूस, जॅक सॉनिए, लुव्हरचा क्युरेटर, मरताना काही गुप्त संदेश, कोड अन चिन्हं मागे ठेवतो, जे लिओनार्दो दा विंचीच्या कलाकृतींशी जोडलेले असतात. मला लँग्डनचं त्या चिन्हांचं विश्लेषण नि त्यातून हळूहळू उलगडणारी रहस्यं खूप भारी वाटली. सॉनिएने मरताना आपल्या रक्ताने जमिनीवर काही संदेश लिहिले नि स्वतःला दा विंचीच्या ‘व्हिट्रुव्हियन मॅन’च्या पोजमध्ये ठेवलं, ज्यामुळे लँग्डन अन् सोफीला एका प्राचीन रहस्याच्या मागावर जावं लागतं. हे रहस्य आहे प्रायरी ऑफ सायन नावाच्या गुप्त संस्थेचं अन होली ग्रेलच्या खऱ्या अर्थाचं.
दा विंचीच्या ‘मोना लिसा’, ‘द लास्ट सपर’ यांसारख्या कलाकृतींमधली लपलेली रहस्यं, ज्यांचा उलगडा करताना लँग्डन नि सोफी पॅरिसपासून लंडनपर्यंत अन नंतर स्कॉटलंडच्या रॉस्लिन चॅपलपर्यंतचा प्रवास करतात. या प्रवासात त्यांना धार्मिक कट्टरपंथी, गुप्त शत्रू अन् पोलीस यांचा सतत पाठलाग करावा लागतो.लँग्डन व सोफी यांचं एकमेकांशी जुळलेलं नातं मला खूप खरं वाटलं. लँग्डनची शांत बुद्धिमत्ता, त्याचं सिम्बॉल्स नि इतिहासाचं अफाट ज्ञान व सोफीची तीक्ष्ण अक्कल नि तिची वैयक्तिक पार्श्वभूमी यांचा मेळ या कथेला खूप रंगत आणतो.
त्यांना अनेक धोके पत्करावे लागतात, विशेषतः जेव्हा त्यांना त्यांच्या विश्वासू शिक्षकाचा विश्वासघात समजतो नि प्रायरी ऑफ सायनच्या गुप्त इतिहासाचा पर्दाफाश होतो. जिथे लँग्डन अन सोफी एका प्राचीन कोडाचं उत्तर शोधतात अन त्यातून होली ग्रेलच्या खऱ्या अर्थाचा शोध लागतो हा प्रसंग मला फार भावला. या सगळ्यात लँग्डनला सत्याचा पाठलाग करताना स्वतःच्या विश्वासांवर प्रश्न पडतात नि त्याची ती अस्वस्थता मला खूप जाणवली. तसंच, सायलास नावाच्या रहस्यमयी भक्ताचा कट्टरपणा नि बिशप अरिंगरोसाचा धार्मिक दृष्टिकोन यांनी कथेला आणखी खोली मिळाली.
डॅन ब्राऊन यांनी प्रत्येक पात्राला इतक्या बारकाव्याने रंगवलंय की लँग्डन, सोफी, सायलास, ली टीबिंग, अरिंगरोसा हे सगळे आपल्याला माझ्या आसपासचे लोक वाटू लागले. ही कादंबरी वाचताना मला इतिहास, धर्म नि कला यांच्याबद्दलचं कुतूहल खूप वाढलं. प्रत्येक कोड उलगडताना मला नवं काहीतरी शिकायला मिळालं, मग ते दा विंचीच्या चित्रांमधलं लपलेलं गणित असो किंवा ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातली गूढ तथ्यं असोत. डॅन ब्राऊन यांनी एक थरारक अन् गूढ विश्व माझ्यासमोर उभं केलं. कादंबरी संपली तरी ती रहस्यं, कोड अन चिन्हं माझ्या मनात तशीच रेंगाळत राहिली, जणू मी स्वतः त्या शोधात हरवून गेलो होतो.
©️Bookish Moin 🌼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा