युगंधर...❤️ 🌼
मी सर्वप्रथम कधी वाचली हे मला व्यवस्थित आठवतं नाही पण हि माझ्या वाचन प्रवासातील सर्वांत पहिली मोठी कादंबरी होती जी तब्बल 978 पेजेसची होती. जी मी वाचून पूर्ण केली होती नि वाचताना अक्षरशः हरवून गेलो होतो.या कादंबरीने मला श्रीकृष्णाची एक वेगळी ओळख करून दिली होती.इथपर्यंत श्रीकृष्ण हे माझ्यासाठी फक्त टीव्ही मालिकेतील एका पात्रापुरतेच मर्यादित होते.या कादंबरीत मी प्रथमच त्यांच्याबद्दल वाचत होतो जे मनाला फार आनंद देणारा अनुभव होता माझ्यासाठी.
आपण सर्वच लहानपणापासून श्री कृष्णाच्या कथा ऐकत, वाचत नि बघत आलोय पण त्या सगळ्या कथा नेहमी एकाच चौकटीतल्या, चमत्कारी नि देवत्वाच्या रंगात रंगलेल्या असायच्या. पण युगंधर या कादंबरीने मात्र या चौकटीला छेद दिला नि यातून श्री कृष्णाला एका अत्यंत मानवी, भावुक नि संघर्षशील रूपात आपल्यासमोर उभं केलं आहे. ही कादंबरी वाचताना मला वाटलं, आपलं आयुष्यही कधीकधी असंच असतं बाहेरून सगळं ठिक असं वाटतं, पण आतून मात्र सतत संघर्ष, द्वंद्व, तडजोड नि काहीतरी शोध सुरूच असतो.
शिवाजी सावंतांनी ‘युगंधर’ मध्ये श्री कृष्णाच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले आहेत. कादंबरीची मांडणीच फार वेगळी आहे. प्रत्येक महत्त्वाच्या पात्राच्या दृष्टीकोनातून कृष्णाचं व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. रुक्मिणी, दारूक, द्रौपदी, अर्जुन, सात्यकी, उद्धव ₹ या सगळ्यांच्या नजरेतून श्री कृष्णाचा वेगळा रंग, वेगळी छटा, वेगळी वेदना आपल्यासमोर येते. हे वाचताना मला जाणवलं की, प्रत्येकाच्या आयुष्यात श्री कृष्ण हे वेगळे असतात. कुणासाठी सखा, कुणासाठी प्रियकर, कुणासाठी मार्गदर्शक, कुणासाठी तत्त्वज्ञ तर कुणासाठी राजा. नि माझ्यामते मुळात हेच या कादंबरीचं सगळ्यात मोठं यश आहे. श्री कृष्णाला एका चौकटीत न बसवता, त्याच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणं हे फार सुंदर प्रयोग होता.
या कादंबरीची सुरुवातच कृष्णाच्या अखेरच्या दिवसांपासून होते, नि मग त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्पे,प्रसंग नि नात्यांवर प्रकाश टाकत कथा पुढे सरकत जाते. बालकृष्णाचे चमत्कार, गोकुळातील गोपी, कालिया , गोवर्धन पर्वत हे पारंपरिक प्रसंग इथे जास्त नाहीत. त्याऐवजी, द्वारकेचा राजा म्हणून श्री कृष्णांनी घेतलेले राजकीय निर्णय, त्यांची कुटुंबातील गुंतागुंत, पांडवांसाठी केलेला संघर्ष, द्रौपदीसाठी दिलेली साथ, अर्जुनाला दिलेला गीता उपदेश, उद्धवाला सांगितलेली तत्त्वज्ञानाची शिकवण या सगळ्या गोष्टींना शिवाजी सरांनी फारच मानवी नि भावनिक पातळीवर मांडलं आहे जे वाचताना आपण अक्षरशः प्रेमात बुडून जातो.
मागे 2023 मध्ये ‘युगंधर’ एकदा पुन्हा वाचने म्हणजे श्री कृष्णाच्या प्रत्येक निर्णयामागची वेदना, त्यांची तडफड, जबाबदारी नि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याचं माणूसपण समजून घेणं होतं नि त्यासाठी हि कादंबरी फार सावकाश पद्धतीने वाचली होती.या कादंबरीत श्री कृष्ण हे सर्वगुणसंपन्न देव नाही, तर एक असे राजा आहे ज्यांना सतत समाज, कुटुंब, मित्र, धर्म, कर्तव्य नि स्वतःच्या भावनांमध्ये तडजोड करावी लागते. द्रौपदीच्या अपमानाच्या वेळी त्याचं अस्वस्थ मन, सुदाम्याच्या दारिद्र्यात त्याचा हळवा स्वभाव, रुक्मिणीच्या प्रेमातला गोंधळ, अर्जुनाच्या प्रश्नांना दिलेला तत्त्वज्ञानाचा आधार हे सगळं वाचताना मी अनेकदा थांबलो, विचार केला.
‘युगंधर’मधील श्री कृष्ण हे मला माझ्यासारखेच वाटले . कधी चुकणारे, कधी घाबरणारे, कधी प्रेमात हरवणारे, कधी जबाबदारीने झिजणारे. त्यांच्या प्रत्येक नात्यात एक वेगळी छटा आहे. मित्र म्हणून ते सखा आहेत, पती म्हणून ते प्रेमळ आहे, राजा म्हणून ते कर्तव्यदक्ष आहे, तत्त्वज्ञ म्हणून ते खोल विचार करणारे आहेत. पण या सगळ्या भूमिकांमध्ये ते कुठेही परिपूर्ण नाही नि म्हणूनच ते अधिक आपलासे वाटतात. हि कादंबरी वाचताना मला परत परत असं वाटलं की, श्रीकृष्णांच्या प्रत्येक निर्णयामागे एक वेदना, एक तडफड दडलेली आहे. ते देव आहे, म्हणून त्याचं आयुष्य सोपं नाही तर उलट, त्यांच्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत, अपेक्षा जास्त आहेत नि म्हणून त्याचा संघर्ष सुद्धा फार मोठा आहे.
शिवाजी सावंतांची भाषा, प्रसंगांची मांडणी इतकी जिवंत आहे की, वाचताना मी अनेकदा भारावून गेलो. श्री कृष्णाच्या वेदनेत, त्यांच्या गोंधळात, त्यांच्या प्रेमात मी स्वतःला शोधलं. मला असं वाटलं, आपल्याही आयुष्यात असेच द्वंद्व, अशाच तडजोडी, अशाच जबाबदाऱ्या असतात. ‘युगंधर’ वाचून माझ्या मनात श्री कृष्णाबद्दलची धारणा बदलली नि ते माझ्यासाठी फक्त मंदिरातला देव राहिले नाहीत, तर माझ्यासारखाच मनापासून प्रेम करणारा, संघर्ष करणारा नि मैत्री निभावणारा एक माणूस झाला. या कादंबरीतल्या अनेक प्रसंगांनी माझ्या मनाला स्पर्श केला. द्रौपदीसाठी केलेली निस्वार्थी मैत्री, अर्जुनाला गीता सांगताना आलेला संयम, उद्धवाला दिलेला अंतिम उपदेश या सगळ्या प्रसंगांनी मला माणूसपणाचा नि तत्त्वज्ञानाचा नवा अर्थ दिला. ‘युगंधर’मधून मी हे शिकलो की, देवत्व म्हणजे परिपूर्णता नाही तर त्या उलट, अपूर्णतेतून, वेदनेतून, संघर्षातून उभं राहणं हेच खरं युगपुरुषत्व आहे.
शेवटी एवढंच की, युगंधर’ ही कादंबरी केवळ श्री कृष्णाची कथा नाही, तर माझ्या, आपल्या, प्रत्येकाच्या संघर्ष, शोध नि माणूसपणाची कथा आहे. युगंधर वाचून मला आयुष्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी, माणूसपण जपणं, नात्यांचं मोल ओळखणं नि स्वतःच्या तत्त्वांवर ठाम राहणं हेच खरं यश आहे. श्री कृष्ण माझ्यासाठी आता फक्त देव नाहीत, तर एक सखा, एक मार्गदर्शक नि एक प्रेरणा आहे. ‘युगंधर’मुळे कृष्ण माझ्या मनातल्या मंदिरात नव्हे, तर हृदयाच्या एका कोपऱ्यात कायमचा घर करून राहतील एवढं नक्कीच...💜❤️
एकदा आवर्जुन वाचा...💜
©️Moin Humanist ❤️
युगंधर कादंबरी तून कृष्णाच्या जीवनपटावर प्रकाश पडतो
उत्तर द्याहटवा