द कृष्णा की ...🌼❤️
हि कादंबरी म्हणजे इतिहास, पौराणिकता नि थरार यांचं एक भन्नाट मिश्रण आहे. अश्विन सांघी यांची लेखनशैली म्हणजे माहिती नि कल्पनेचं सुंदर कॉम्बिनेशन आहे. सुरुवातीला असं वाटतं की ही एक साधी गुन्हेगारी गोष्ट असेल, पण जसं-जसं आपण वाचत जातो, तसं आपण एका ऐतिहासिक शोधयात्रेत सामील होतो.
कथा सुरू होते एका खुनापासून जेव्हा एका नामवंत इतिहासकाराचा खून होतो, तेव्हा त्याचा मित्र प्रोफेसर रवी मोहन सैनी याच्यावर संशय घेतला जातो. पुढे प्रोफेसर सैनी स्वतःच्या निर्दोषतेचा शोध घेत असतानाच तो एका मोठ्या गुपितात अडकतो “कृष्णा की” चं गुपित ही किल्ली केवळ पुराणांमधली कल्पना नाही, तर त्यामागे खूप सखोल संशोधन, ऐतिहासिक पुरावे नि धार्मिक सुत्रे जोडलेली आहेत.
या कथेमध्ये लेखकाने श्री कृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंग वापरले आहेत पण ते केवळ आध्यात्मिक नसून, वैज्ञानिक, सामाजिक संदर्भात जोडले आहेत. पुस्तकात असे अनेक विविध संदर्भ येतात . उदा. द्वारका शहराचं रहस्य, समशेरपूरचा खजिना, वेदांमधील संख्यांचं गणित, आर्यवंशाचा इतिहास जे वाचताना आपण भारावून जातो. भारतीय इतिहासाची नि पौराणिकतेची नवी ओळख करून देणं हि या कादंबरीची एक वेगळी खासियत आहे. पुस्तकात काही गोष्टी खऱ्या आहेत, काही कल्पनाशक्तीने भरलेल्या आहेत, पण लेखकाने त्या इतक्या विश्वासार्हपणे मांडल्या आहेत की आपण त्या जगात पूर्णपणे हरवून जातो. एक क्षणाला वाटतं की, हे खरंच आपल्या देशात घडलं असेल का?
ही कादंबरी म्हणजे आपल्याला विचार करायला लावणारा एक भारी प्रवास आहे. आपण जे इतिहास म्हणून शिकतो, त्यामागे काही गुप्त अर्थ तर नाही ना? असं अनेकदा वाटतं. त्यात लेखकाने दाखवलेली पात्रं खूप हुशार, अभ्यासू अन् धाडसी आहेत विशेषतः प्रोफेसर सैनी हे पात्र खूपच प्रभावी आहेत.
हि कादंबरी वाचताना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या भारतीय संस्कृतीचं गूढ, प्राचीन ज्ञान नि ज्ञानाची ताकद. कादंबरी एकदा सुरू केली की मध्ये अजिबात थांबावंसं वाटत नाही. वाचताना थरार, कुतूहल नि ज्ञान या सगळ्यांचं एक वेगळंच समाधान मिळतं.
गुन्हेगारी कथा, पौराणिक रहस्यं, किंवा भारतीय इतिहास आवडत असेल तर The Krishna Key हि novel Must Read आहे.❤️💜
©️Moin Humanist 🌼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा