खऱ्या शिक्षणाच्या शोधात ❤️🌼

आपल्याला लहानपणापासून शिकवले जातं की अभ्यास करा, परीक्षेत चांगले गुण मिळवा नि पुढे जाऊन चांगली नोकरी मिळवा. पण शिक्षण म्हणजे नुसतं हेच का ? मुलांना शाळेत खरोखर माणूस म्हणून घडवलं जातं का? त्यांच्या जिज्ञासेला, कल्पनाशक्तीला, आत्मभानाला पोसण्याचं काम शाळा करतं का? याच विचारांनी झपाटलेला शिक्षक डेव्हिड ग्रिबल सरांनी "खऱ्या शिक्षणाच्या शोधात" हे पुस्तक लिहिलं आहे.

लेखक स्वतः पारंपरिक शिक्षणव्यवस्थेतील शिक्षक होते. डार्टिंग्टन हॉल स्कूलमध्ये शिकवताना त्यांनी अनुभवलं की शाळा ही फक्त शिकवण्याची जागा नसून एक प्रयोगशाळा असते जिथे विचार, स्वातंत्र्य, सहभाग अन् आनंद असायला हवा. जेव्हा ही शाळा बंद झाली, तेव्हा त्यांनी सँड्स स्कूल सुरू केली जी अधिक खुले, स्वायत्त नि मुलांना केंद्रस्थानी ठेवणारी शाळा होती.

या पुस्तकात त्यांनी जगभरातील 14 वेगवेगळ्या शाळांची सफर घडवून आणली आहे. या शाळा इंग्लंड, अमेरिका, भारत, जपान, इस्रायल, इक्वाडोर, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड या देशांमध्ये आहेत. प्रत्येक शाळेची पद्धत, मूलभूत तत्त्वं, मुलांसोबतचा संवाद नि शिकवण्याची शैली वेगळी आहे पण एक समान धागा आहे तो म्हणजे मुलांना माणूस म्हणून समजून घेणं.

या शाळांमध्ये मुलांना आदेश देण्यात नाही येत, त्यांना समजून घेण्यात, ऐकण्यात नि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात भर असतो. "पारंपरिक शाळांमध्ये मुलं एकमेकांत अडकलेल्या चाकाच्या दात्यासारखी बनतात", असं लेखक म्हणतो. परंतु या पर्यायी शाळा त्या चाकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.

उदाहरण द्यायचं झालं तर भारतातील ‘नील बाग’ आणि ‘मीरांबिका’ शाळा या मुलांशी संवाद साधत शिकवतात. अमेरिका मधील ‘सड्बरी व्हॅली स्कूल’ मध्ये मुलांना काय शिकायचं आहे हे ठरवायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. जपानच्या नानोमी चिल्ड्रेन्स व्हिलेजमध्ये शिक्षण नि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. इस्रायलची ‘डेमोक्रॅटिक स्कूल ऑफ हडेरा’ मुलांना सहभागी निर्णय घेण्याची सवय लावते.

हे पुस्तक सांगतं की शिक्षण म्हणजे फक्त विषय शिकवणं नव्हे, तर विचार करायला शिकवणं. मुलांना निर्णय घेण्याचं, चुका करण्याचं व त्यातून शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं तर ते अधिक सशक्त नि मुळात आत्मनिर्भर होतात.

हे पुस्तक शिक्षकांसाठी, पालकांसाठी नि शिक्षणात काही तरी वेगळं घडवू पाहणाऱ्यांसाठी खुप प्रेरणादायक आहे. प्रत्येक शाळेचं वर्णन केवळ माहितीपर नाही, तर अनुभवात्मक आहे. लेखकाने त्या शाळांमध्ये वेळ घालवला आहे, विद्यार्थी नि शिक्षकांशी संवाद साधला आहे. त्यामुळे त्यांचं वर्णन अधिक जिवंत, थेट नि अंतर्मुख करणारं वाटतं.आपल्या आजूबाजूच्या शाळांमध्ये आपण किती मुलांना स्वतःचं व्यक्तिमत्त्व बिनधास्तपणे विकसित करताना बघतो? की आपणच त्यांना एका चौकटीत अडकवून टाकतो? खऱ्या शिक्षणाच्या शोधात हे पुस्तक ही चौकट मोडतं नि आपण शिक्षणाकडे नव्याने बघायला शिकतो.

या पुस्तकातली प्रत्येक शाळा आपल्याला विचार करायला लावते, की आपण मुलांना काय शिकवतोय फक्त अभ्यास? की आयुष्य जगण्याचं कलेचं शिक्षण? 🌼

एवढंच...❤️🌼

©️Moin Humanist 😊

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼