भटक्यांचे लग्न ...🌼💜

हे पुस्तक भारतातल्या भटक्या-विमुक्त जातींच्या विवाह पद्धतींचा एक अनमोल आणि रोचक दस्तऐवज आहे. उत्तम कांबळे यांनी आपल्या पत्रकारितेच्या अनुभवातून आणि संवेदनशील दृष्टिकोनातून कैकाडी, कूचकोरवी, पामलोर, घिसाडी, कुडमुडे जोशी, पिंगळे जोशी, पोपटवाले जोशी, ओढ बेलदार, राजपूत बेलदार, कांजरभाट, डोंबारी, गोसावी, लमाणी, पंचाळ, वड्ड, डवरी, फिरस्ते कोळी, फासेपारधी, गोपाळ गोंधळी, भामटे, बागडी, मांगगारुडी, वैदू, नंदीवाले, वंजारी, कंझार, हेळवे, श्रीरामभक्तरू आणि रावळ या जातींच्या लग्न परंपरांचं इतकं जिवंत वर्णन केलं आहे, की वाचताना आपण त्यांच्या अनोख्या जगात हरवतो.

हे पुस्तक भटक्या जातींच्या आयुष्याला नि त्यांच्या सांस्कृतिक वैभवाला समजून घेण्याचा एक खिडकीसारखा अनुभव आहे. भारतात असंख्य जाती आहेत नि प्रत्येक व्यक्ती आपापल्या जातीत जन्माला येऊन आयुष्य जगतो. पण भटक्या-विमुक्त जातींचं आयुष्य वेगळंच आहे त्यांना गाव नाही, शासकीय दप्तरात नाव नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही. डोक्यावर फाटकं आभाळ अन् पायाखाली दुभंगलेली जमीन घेऊन ते भाकरीच्या तुकड्यासाठी गावोगावी भटकतात. त्यांचं राहणीमान, भाषा, रीतीरिवाज नि लग्न पद्धती न्यारी आहे.

कांबळे सरांनी या जातींच्या विवाह परंपरांचं बारकाईने निरीक्षण करून त्यांचं सांस्कृतिक नि सामाजिक महत्त्व उलगडलं आहे. या लग्न पद्धती काही रंगीबेरंगी नि उत्साही आहेत, काही प्राचीन मातृप्रधान संस्कृतीकडे बोट दाखवतात, काही निसर्गाशी नातं सांगतात, तर काही आजच्या दृष्टिकोनातून अमानवी वाटतात. प्रत्येक जातीच्या लग्न पद्धतीचा थोडक्यात पण अचूक परिचय या पुस्तकात आहे.

मला  सर्वात जास्त भावलं ते कांबळे यांनी भटक्या जातींच्या आयुष्याला दिलेला आवाज. आपण या जातींना गावात वावरताना पाहतो, पण त्यांचं राहणीमान, संस्कृती नि लग्न पद्धती याबद्दल आपल्याला फारसं माहीत नसतं. उदाहरणार्थ, कैकाडी जातीत नवरदेवाला सासरच्या गावात काही काळ राहावं लागतं, जे मातृप्रधान परंपरेचं लक्षण आहे. कांजरभाटात मुलीच्या कुटुंबाची संमती लग्नासाठी महत्त्वाची असते. डोंबारींच्या लग्नात नाच नि गाण्यांचा जल्लोष असतो, तर लमाणींच्या लग्नात रंगीबेरंगी पोषाख आणि दागिने डोळे दिपवतात. गोसावी आणि वैदूंच्या लग्नात अध्यात्म आणि निसर्गाशी नातं दिसतं, तर फासेपारधींच्या लग्नात साधेपणा आणि संघर्ष दिसतो. या सगळ्या परंपरा कांबळे यांनी इतक्या सोप्या आणि प्रभावीपणे मांडल्या आहेत, की त्या तुमच्या मनात घर करतात.कांबळे यांची लेखनशैली साधी पण हृदयस्पर्शी आहे. त्यांनी पत्रकार म्हणून भटक्या जातींसोबत घालवलेला वेळ आणि त्यांच्या आयुष्याचं बारकाईने केलेलं निरीक्षण या पुस्तकातून जाणवतं. त्यांनी कुठेही अतिशयोक्ती न करता सामाजिक वास्तव मांडलं आहे. पुस्तक वाचताना मला जाणवलं, की या लग्न पद्धती फक्त रीतीरिवाज नाहीत, तर या जातींच्या संघर्षमय आयुष्याचं नि सांस्कृतिक ओळखीचं प्रतिबिंब आहेत.

काही प्रथा आजच्या काळात प्रश्न निर्माण करतात, पण त्या समजून घेण्यासाठी त्यांचा ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ समजणं गरजेचं आहे. हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणूनही अनेक विद्यार्थ्यांनी वापरलं आहे, कारण त्यात माहिती अचूक नि संशोधनपर आहे.

या पुस्तकाने मला उपेक्षित जातींच्या आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनाने पाहायला शिकवलं. लेखकांनी त्यांच्या लग्न पद्धतींमधून त्यांचं सांस्कृतिक वैभव, संघर्ष नि ओळख मांडली. हे पुस्तक वाचताना मी त्यांच्या रंगीबेरंगी परंपरांत हरवलो नि त्यांच्या दु:खाला स्पर्श केला. प्रत्येक सुजाण वाचकाने हे पुस्तक वाचावं, कारण ते आपल्याला आपल्या आजूबाजूच्या अनोख्या जगाची ओळख करवून देतो एवढं नक्की...💜❤️

नक्कीच आवर्जून वाचा...🌼

©️Moin Humanist ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼