वाट तुडवताना ...❤️🌼
221 पानांचं हे पुस्तक फक्त आत्मचरित्र नाही तर एका भुकेल्या मनाचा पुस्तकांशी जोडलेला प्रवास आहे. उत्तम कांबळे यांनी आपल्या खडतर आयुष्यातील संघर्ष, पुस्तकांप्रतीची ओढ नि वाचनाने त्यांचं आयुष्य कसं घडवलं, हे इतक्या सोप्या व प्रामाणिक शब्दांत मांडलं आहे, की वाचताना आपण त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात हरवून जातो.
‘वाट तुडवताना’ ही उत्तम कांबळे यांच्या बालपणापासून पत्रकार नि संपादक होण्यापर्यंतची कहाणी आहे. दारिद्र्य, जातीचा अभाव नि भुकेने जाळलेल्या मनात पुस्तकांची भूक कशी निर्माण झाली, याचा हा आलेख आहे. “रोज एक पाटी शेण गोळा करतो, मग देशील पुस्तक?” असं विचारणाऱ्या मुलाला आई म्हणते, “शेणकुट्याचं पैसं पुस्तकावर उधळलास तर खाशील काय?” या दोन प्रश्नांच्या संघर्षात कांबळे यांचं आयुष्य घडत गेलं. त्यांनी शेण गोळा केलं, डिंक जमा केलं, खांद्याला घट्टे पडल्यावर पाणी वाहिलं, कंपाउंडर म्हणून काम केलं. भुकेने आतडी जळत असताना भुताचा नैवेद्य खाल्ला, नळाला तोंड लावून पाणी पिऊन भूक मारली. पण या सगळ्यात त्यांची पुस्तकांची भूक कधी कमी झाली नाही, उलट ती तीव्र होत गेली. ही भूक त्यांना चार्वाक, बुद्ध, गांधी, आंबेडकर यांच्यापर्यंत घेऊन गेली नि त्यांचं आयुष्य बदललं.
मला या पुस्तकात सर्वात जास्त भावलं ते कांबळे यांचं पुस्तकांवरचं नितांत प्रेम. दारिद्र्याने त्यांना पुस्तकांपासून दूर ठेवलं, पण त्यांच्या मनातली वाचनाची भूक कधीच मेली नाही. “माझ्या जगण्यात ग्रंथांचा वाटा प्रचंड मोठा आहे. माझ्यावर सावलीही ग्रंथांची नि माझे हातही ग्रंथांच्याच हातात गुंतलेले,”
हे त्यांचं वाक्य माझ्या काळजाला भिडलं. प्रत्येक पानावर त्यांचं पुस्तकांशी असलेलं नातं झळकतं. वाचनाने त्यांना फक्त ज्ञानच नाही, तर स्वतःची ओळख, आत्मविश्वास नि समाजात उभं राहण्याची ताकद दिली. त्यांनी गावातल्या उकीरड्यापासून पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहापर्यंतचा प्रवास पुस्तकांच्या साथीने केला, हे वाचून मी थक्क झालो.
उत्तम कांबळे यांची लेखनशैली इतकी प्रामाणिक आहे, की आपण त्यांच्या आयुष्यात हरवून जातो. त्यांनी आपले संघर्ष, अपमान नि यश इतक्या मोकळेपणाने मांडले, की प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. कथेतली गावं, उकीरडे, बाजार नि पुस्तकांची दुकानं जणू आपण स्वतः अनुभवतो.
आपल्या निरीक्षणाच्या नोंदी मध्ये प्रभाकर बागले सर म्हणतात :-
श्री. कांबळे यांचे हे आत्मकथन दलित आत्मकथेच्या परंपरेला महत्त्वाच्या वळणावर आणून ठेवणारे आहे. त्या परंपरेला नूतनीकरणाची संधी उपलब्ध करून देणारे आहे. आणि या वळणावर जो दिशा बदल होत असतो त्याचा आरंभ बिंदू होण्याचे श्रेय त्याच्याकडे जाईल, असे ते वाचत असताना वाटते. कारण एक दलित मुलगा समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहापर्यंत येतो. त्या प्रवाहात खंबीरपणे उभं राहतो, स्वतःच्या जातीच्या जीवन प्रवाहाकडे आणि मुख्य प्रवाहाकडे पाहतो, अनुभव घेतो, आपली कार्यक्षमता सिद्ध करून पत्रकार, संपादक बनून पत्रकारिता या व्यवस्थेचा भाग बनतो.
हे आत्मकथन दलित-आत्मकथनाला एका वेगळ्या वळणावर आणून ठेवते, ते या अर्थाने की त्यामध्ये वेशीच्या बाहेरचे आणि आतले जीवन यामध्ये अर्थपूर्ण देवाण-घेवाण दिसते आहे. मुख्य प्रवाहात स्वतःला ठेवून, दोन्ही प्रकारच्या जीवनाला संवादी ठेवण्यासाठी, तो संवाद विकसित करण्यासाठीची धडपड त्यात दिसते आहे. हे कथन संवादांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर संपर्क बिंदू म्हणून काम करताना दिसते. दारिद्र्यामुळे बसलेले चटके, झालेल्या जखमा वाचनप्रक्रियेत विसरून, वाचनातील संस्कार स्वीकारत, स्वतःला सक्षम करत वाचन संस्कारांचा एक आलेखच या कथनात दिसतो. हा विकसित होणारा आलेख दोन्ही समाजांना आपल्या अस्मिताविषयक संकल्पनेवर विचार करायला लावतो. दुरभिमानाकडे सहज कलणाऱ्या अस्मितेचे वास्तवमान संवादाच्या सातत्यासाठी कसे उपकारक असते, हे तो आलेख दाखवून देतो.
तर ....
उत्तम कांबळे सर म्हणतात :-
ज्याला व्यवस्थेने इतिहास दिलेला नसतो, भूगोल दिलेला नसतो,चालण्यासाठी चांगला वर्तमानही दिलेला नसतो, अशा माणसांना ग्रंथ खूप उपयोगी पडतात असं माझं मत आहे.
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी ग्रंथांच्या गावात गेलो नसतो, तर
गावगाड्यातच राहिलो असतो. मला चार्वाक, बुद्ध, गांधी, आंबेडकर यांपैकी कोणीही दिसलं नसतं. त्यांच्या पाऊलखुणाही दिसल्या नसत्या. माझी स्वतःची ओळख सांगण्यासाठी शब्दही मिळाले नसते. मी तसाच राहिलो असतो - बिनचेहऱ्याचा...!
वाट गमावलेला...
आणि हे अगदी खरं आहे...🌼
मला पुस्तकातला शेवट खूप प्रेरक वाटला “मला अजून वाचायचं आहे ”
हे वाक्य त्यांच्या आयुष्याची ताकद दाखवतं. ‘वाट तुडवताना’ हे फक्त आत्मचरित्र नाही तर वाचनाच्या संस्कारांचा आलेख आहे. कांबळे यांनी स्वतःची वाट तुडवली, चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला नि पुस्तकांतून प्रश्नांची उत्तरं शोधली. त्यांचं म्हणणं खरं आहे “ज्याला इतिहास, भूगोल आणि वर्तमान दिलेलं नाही, त्याला ग्रंथ उपयोगी पडतात.” पुस्तकांनी त्यांना गावगाड्यातून बाहेर काढलं नि चार्वाक, बुद्ध, आंबेडकर यांच्या पाऊलखुणा दाखवल्या.
वाट तुडवताना या पुस्तकानेमला पुस्तकांचं नि शिक्षणाचं महत्त्व नव्याने समजावलं. कांबळे यांचा खडतर प्रवास नि पुस्तकांनी त्यांना कसं तारलं, हे वाचून मी थक्क झालो. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं, कारण ते तुम्हाला अंतर्मुख करतं व स्वप्नांसाठी लढायला शिकवतं.
जर अजूनपर्यंत तुम्ही हे वाचलं नसेल, तर नक्की वाचा. ❤️🌼
अतिशय प्रेरक आहे......
उत्तर द्याहटवा