चिखल, घाम आणि अश्रू....❤️🌼
चिखल, घाम आणि अश्रू’ (Mud, Sweat and Tears) हे बेअर ग्रील्स यांचं आत्मचरित्र वाचताना मला नेहमीच असं वाटतं की माणसाच्या आयुष्यातील खरे संघर्ष हे बाहेरून दिसणाऱ्या संकटांपेक्षा आतल्या मनाच्या लढाईत अधिक असतात.बेअर ग्रील्स
हा नाव जगभरात साहस, धाडस नि जिद्दीचा प्रतीक आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास अगदी लहानपणापासूनच वेगळा होता. वडिलांसोबत गिर्यारोहण, जंगलात फिरणं, निसर्गासोबत जुडणं या सगळ्या गोष्टींनी त्यांच्या मनात साहसाची बीजं पेरली. शाळेतील शिक्षणात ते फारसे पुढे नव्हते, पण निसर्गाशी, संकटाशी सामना करण्याची त्यांची तयारी लहानपणापासूनच होती. मला स्वतःला निसर्गात भटकायला आवडतं, नि बेअर ग्रील्स च्या अनुभवातून मला हे जाणवलं की, निसर्ग आपल्याला नम्र, धैर्यवान नि जिद्दी बनवतो.
बेअर यांच्या जीवनातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे त्याचा SAS (Special Air Service) मध्ये निवड होण्यासाठीचा संघर्ष. SAS मध्ये निवड होणं म्हणजे जगातील सर्वात अवघड नि कठोर प्रशिक्षण प्रक्रियांपैकी एक. बेअर ने या प्रशिक्षणात जे शारीरिक नि मानसिक कष्ट सहन केले, ते वाचताना अंगावर काटा येतो. दिवस-रात्र चालणं, चिखलात झोपणं, थंडी, पाऊस, झोपेचा अभाव नि सततचा मानसिक तणाव या सगळ्याचा सामना करताना बेअर ग्रील्स यांनी कधीही हार मानली नाही.
ते म्हणतात, “शरीर थकून जातं, पण मनाची ताकद असेल तर माणूस कोणतीही मर्यादा ओलांडू शकतो.” हे वाचताना मला माझ्या आयुष्यातील काही प्रसंग आठवले, जिथे शारीरिक थकवा आला तरी मनाने हार मानली नाही नि त्यामुळेच पुढे जाण्याची उमेद मिळाली.
बेअर ग्रील्स यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे पॅराशूटिंग करताना झालेली गंभीर दुखापत. पाठीच्या तीन हाडांना जबरदस्त इजा झाली, डॉक्टरांनी सांगितलं की ते पुन्हा चालू शकणार नाही. पण त्यांनी हार मानली नाही. महिन्यांच्या उपचारानंतर नि प्रचंड मानसिक संघर्षानंतर, ते 18 महिन्यांतच माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज झाले. वयाच्या 23 व्या वर्षी बेअर हे एव्हरेस्ट सर करणारे सर्वात तरुण ब्रिटिश झाले. हे वाचताना मला असं जाणवलं की, अपयश, वेदना नि अश्रू हे यशाच्या प्रवासातले महत्वपूर्ण टप्पे आहेत.
बेअर म्हणतात, “तुम्ही किती वेळा पडता याला अर्थ नाही,तर तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हेच महत्वाचं.” ही गोष्ट माझ्या आयुष्यातही लागू पडते. अनेकदा अपयश आलं, मनात निराशा आली, पण बेअर ग्रील्स सारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या गोष्टी वाचून पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळाली.
हे पुस्तक केवळ साहसाची कथा नाही, तर माणसाच्या जिद्दीची, आत्मविश्वासाची अन् स्वप्नांसाठी झगडण्याची कथा आहे. त्यांनी ‘Man vs. Wild’ या शोमधून जगभरातील लोकांना जंगली परिस्थितीत जगण्याचे धडे दिले. कधी विषारी साप, कधी कीटक खाणं, कधी थंडी, उपासमार, एकटेपणा Bear ने हे सगळं स्वतः अनुभवून दाखवलं. या सगळ्या अनुभवातून मला हे शिकायला मिळालं की, आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द नि धैर्य हवं.
बेअरचे कारनामे वाचताना मनात धडकी भरते, पण त्याच वेळी प्रेरणाही मिळते. त्यांच्या जीवनातील चिखल, घाम नि अश्रू हेच त्याच्या यशाचं खरं रहस्य आहेत नि हेच प्रत्येकासाठी शिकण्यासारखं आहे. माझ्या दृष्टीने हे पुस्तक म्हणजे संकटांवर मात करण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची नि जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा सामना धैर्याने करण्याची शिकवण आहे. बेअर यांच्या संघर्षातून नि अनुभवातून मला माझ्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे.🌼❤️
आवर्जून वाचा...❤️🌼
©️Moin humanist ❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा