साद घालतो कालाहारी ...❤️🌼

कधी कधी एका पुस्तकात इतकी ताकद असते की ते आपल्याला आपल्या खुर्चीवर बसूनही हजारो किलोमीटर दूर कुठल्याशा अफाट प्रदेशात घेऊन जातं. “साद घालतो कालाहारी” हे असंच एक पुस्तक आहे. मूळ इंग्रजी शीर्षक Cry of the Kalahari, लेखक आहेत मार्क आणि डेलिया ओवेन्स एक अमेरिकन जोडपं जे प्राणीशास्त्र शिकून थेट आफ्रिकेतील कालाहारी वाळवंटात पोचतं. त्यांच्या त्या अफलातून 7 वर्षांच्या प्रवासाचा, संघर्षांचा, अनुभवांचा नि निसर्गाच्या गाभ्यात केलेल्या निरीक्षणांचा दस्तऐवज म्हणजेच हे पुस्तक.

हे पुस्तक वाचताना सुरुवातीला वाटतं की आपण एखादी साहसी कादंबरी वाचतोय, पण पुढे पुढे कळतं की ही तर खरीखुरी गोष्ट आहे. मार्क नि डेलिया हे दोघंही प्राणीप्रेमी. त्यांना मोठ्या मांसाहारी प्राण्यांचं वर्तन अभ्यासायचं होतं नि त्या अभ्यासाचा उपयोग आफ्रिकेतील प्राणिसंवर्धनासाठी व्हावा असं त्यांचं प्रमाणिक स्वप्न होतं. त्यामुळे अगदी थोडकं सामान फक्त एक दुर्बिण, काही कपडे नि थोडे पैसे घेऊन ते थेट बोट्सवाना या देशात पोचतात. तिथे त्यांनी एक थर्ड हँड लँड रोव्हर घेतली नि कालाहारी वाळवंटाच्या अंतर्भागात जिथे ना रस्ते आहेत, ना माणसं तिथे जाऊन राहायला सुरुवात केली.

वाचक म्हणून आपल्याला हे सगळं ऐकायला खूप धाडसी वाटतं, पण त्यांच्या अनुभवांतून हे लक्षात येतं की त्या ठिकाणी दिवस काढणं इतकं सोपं नव्हतं. प्रचंड उष्मा, सततचं पाण्याचं दुष्काळ, जंगली प्राण्यांचा धोका, अन्नाचा तुटवडा या सगळ्या अडचणींना तोंड देत ते सात वर्षं तिथे राहिले. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या भोवती असणाऱ्या हायना, सिंह, कोल्हे, जिराफ यांना त्यांनी अभ्यासलं, निरीक्षण केलं, त्यांच्या वर्तनाची नोंद केली. या सर्व अनुभवांना अतिशय जिवंत शैलीत त्यांनी या पुस्तकात मांडलं आहे.

या पुस्तकाचा मराठी अनुवाद मंदार गोडबोले यांनी अतिशय सहज नि ओघवत्या भाषेत केला आहे. आपण जेव्हा हे पुस्तक वाचतो, तेव्हा कुठेही हे अनुवादित पुस्तक आहे असं वाटत नाही.मराठीत ते इतकं सहज वाटतं की जणू मार्क नि डेलिया आपल्यासमोर बसून त्यांचे अनुभव सांगत आहेत असं भास होतं. लेखकांनी जेव्हा सिंहाच्या जवळून निरीक्षण केलेलं आहे, किंवा ब्राउन हायनाच्या वर्तनातील लाज अन् बुद्धिमत्ता सांगितली आहे, तेव्हा वाचक म्हणून आपणही त्यांच्यासोबत त्या वाळवंटात पोहोचतो.

हे पुस्तक एकाच वेळी साहस, निसर्ग, विज्ञान नि मानवी जिद्दीचं दर्शन घडवतं. आपल्या गोंधळलेल्या शहरी आयुष्यातून काही काळ बाहेर पडून, निसर्गाच्या कोरड्या पण प्रामाणिक कुशीत हरवून जायचं असेल तर हे पुस्तक मस्ट रीड आहे. मी जेव्हा हे पुस्तक वाचलं, तेव्हा मला असं वाटलं की आपण खूपच लहान झालोय नि समोर निसर्गाचं हे अफर चित्र उभं राहतंय. प्राण्यांचं जीवन, त्यांचं अस्तित्व, त्यांचा संघर्ष सगळंच आपल्याला नवं काहीतरी शिकवतं.

या पुस्तकातून केवळ माहिती मिळत नाही तर एक वेगळा दृष्टीकोन मिळतो. ज्याच्या आधारे आपण निसर्गाकडे, प्राण्यांकडे नि माणसाच्या मर्यादा नि स्वप्नांकडे नव्यानं पाहायला शिकतो एवढं नक्की.💜❤️

©️ Moin Humanist 🌿

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼