बनगरवाडी....❤️🌼
मारुती चितमपल्ली गुरुजींच्या पुस्तकानंतर मी व्यंकटेश माडगूळकरांच्या लेखनाच्या इतका प्रेमात पडलोय की त्यांची सर्वच पुस्तकं मला हवीहवीशी वाटतात. त्यामुळे मी त्यांची मिळतील ती पुस्तकं भराभर वाचत सुटलोय नि त्यातलंच एक रत्न म्हणजे बनगरवाडी.
ही 132 पानांची छोटीशी पण अफाट कादंबरी वाचताना मला माणदेशच्या धनगरवस्तीच्या मातीत हरवून गेल्यासारखं वाटलं. ही फक्त एक कथा नाही तर एक असा अनुभव आहे जिथे आपण गावकऱ्यांच्या साध्या जीवनात त्यांच्या भाबड्या भावनांमध्ये अन् त्यांच्या छोट्या छोट्या सुखदु:खात गुंतत जातो. माडगूळकरांचं लेखन इतकं जिवंत आहे की बनगरवाडीचं गाव तिथली धूळमाती मेंढ्यांचा आवाज नि गावकऱ्यांचं प्रेमळ मन माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. त्यांनी शब्दांतून माणदेशच्या ग्रामीण जीवनाचा आत्मा इतक्या सुंदरतेने टिपलाय की मी वाचता वाचता त्या गावातलाच एक भाग बनलो.
बनगरवाडी ही कादंबरी माणदेशातल्या एका छोट्या धनगरवस्तीवर आधारित आहे जिथे 1938 साली माडगूळकरांनी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी शब्दबद्ध केल्या आहेत. ही कथा आहे एका नवख्या शिक्षकाची जो बनगरवाडीत पहिल्यांदा शिक्षक म्हणून रुजू होतो. गावात येताच त्याला बालट्यांच्या धमकीला सामोरं जावं लागतं पण कारभाऱ्याच्या मदतीने तो शाळा सुरू करतो नि गावकऱ्यांमध्ये मिसळत जातो. मला मास्तरचं गावकऱ्यांशी हळूहळू जुळलेलं नातं खूप आवडलं. तो शाळा सांभाळतो गावकऱ्यांचे प्रश्न सोडवतो त्यांची पत्रं पोस्टात टाकतो मनिऑर्डर करतो अगदी रामा धनगराच्या बुचडा छाप राणीच्या पैशाची तालुक्याला जाऊन मोड आणतो. ही सगळी कामं करताना त्याचं गावाशी असलेलं बंधन दिसतं. पण यातच त्याच्या मनात द्वंद्व निर्माण होतं. विशेषतः शेकूसारख्या गावकऱ्याची बैलाची मागणी पूर्ण न झाल्याने त्याची बायको नांगराला जुपते हे ऐकून मास्तरला होणारी अस्वस्थता मला खूप भावली. तसंच रामा धनगराच्या पैशाची मोड करताना मास्तरचे पैसे चोरीला जातात अन त्यामुळे त्याला होणारा मनस्ताप मला खूप जाणवला. या सगळ्यातून गावकऱ्यांचा त्याच्यावरचा भाबडा विश्वास नि त्यामुळे येणारी जबाबदारी मास्तरला कशी अस्वस्थ करते हे मला खूप खरं वाटलं.
माडगूळकरांनी बनगरवाडीच्या प्रत्येक पात्राला इतक्या बारकाव्याने रंगवलंय की कारभारी,अंजी, शेकू, बालट्या हे सगळे मला माझ्या आजूबाजूचे लोक वाटू लागले. कारभारी अन् मास्तर यांच्यातलं नातं त्यात येणारी शंका नि नंतर ती दूर होण्याची प्रक्रिया मला खूप मानवी वाटली. विशेषतः अंजीच्या चोळीचं खन मास्तर शिवून आणतो नि त्यावरून बालट्याच्या काडीमुळे कारभारी अबोला धरतो हा प्रसंग मला खूप जवळचा वाटला. यातून मास्तरचा सात्विक संताप नि त्याला वाटणारी निराशा की आपण चांगलं करायला गेलो पण तोच मूर्खपणा ठरला हे मला खूप खरं वाटलं. हा प्रसंग माणसाच्या नात्यांमधला नाजूकपणा अन विश्वासाची गुंतागुंत मला प्रकर्षाने जाणवली.
बनगरवाडी वाचताना मला माणदेशच्या साध्या जीवनाचं नि तिथल्या लोकांच्या भोळ्या विश्वासाचं खूप कौतुक वाटलं. मास्तरच्या नजरेतून आपण त्या गावातलं खरंखुरं जीवन अनुभवतो जिथे छोट्या गोष्टींना खूप महत्त्व आहे मग ती पत्र पोस्टात टाकणं असो तंटे सोडवणं असो किंवा गावकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणं असो. माडगूळकरांनी फक्त कथा सांगितली नाही तर माणदेशच्या संस्कृतीचा तिथल्या माणसांच्या भावविश्वाचा एक जिवंत चित्रपट माझ्यासमोर उभा केला.
हि कादंबरी संपली तरी बनगरवाडी माझ्या मनात तशीच राहिली जणू मी तिथे प्रत्यक्ष जाऊन आलो. ज्यांनी ही कादंबरी अजून वाचली नसेल त्यांनी आवर्जून वाचावी. हा फक्त पुस्तकाचा अनुभव नाही तर माणदेशच्या मातीतला एक हृदयस्पर्शी प्रवास सुद्धा आहे.
नक्कीच वाचा चुकवू नका....❤️😊
©️ Bookish Moin ❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा