फँड्री 💔🖤
हा चित्रपट माझ्या मनात खोलवर रुतलेला आहे. 2014 साली नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट माझ्यासाठी फक्त एक चित्रपट नसून तर आपल्या समाजाचं कटू सत्य दाखवणारा आरसा आहे.आतापर्यंत किती वेळा बघितलं असेल हे सांगू शकतं नसलो तरीही जेव्हा सुद्धा बघतो तेव्हा हा नव्याने उमजतो.
हि गोष्ट आहे जब्या नावाच्या सातवीत शिकणाऱ्या मुलाची जो एका जातीयव्यवस्थेने निर्माण केलेल्या दलित कुटुंबातून आहे. त्याचं कुटुंब गावात मिळेल ते काम करत असतो, तर कधी डुक्कर पकडण्याचं काम करतं, त्यामुळे गावकरी त्यांना ‘फँड्री’ म्हणून हिणवतात. जब्याला शाळेतल्या जातीयव्यवस्थेने ठरवलेल्या उच्च जातीच्या शालूवर प्रेम आहे, पण जातीभेद नि गरिबी त्याच्या प्रेमाला नि मुळात स्वप्नांना बेड्या घालते यामुळेच त्याचं प्रेम हे स्वप्नच राहतं.त्याला शालूचं लक्ष वेधण्यासाठी काळ्या चिमणीचा वशीकरणाचा उपाय करायचा आहे व यामुळे तो काळ्या चिमणीच्या शोधात असतो.
हा चित्रपट जब्याच्या निरागस प्रेमकथेपासून सुरू होतो, पण हळूहळू जातीभेद, सामाजिक विषमता अन् मानवी क्रूरतेचं विदारक वास्तव उलगडतो. मला वाटतं, हा चित्रपट प्रत्येक फ्रेममध्ये आपल्या समाजाच्या जखमांना उघडं करतो.
जब्याच्या प्रवासातून माणुसकीच्या अनेक छटा दिसतात. त्याचं शालूसाठीचं निरागस प्रेम नि तिच्याशी बोलण्याची धडपड. पण त्याचवेळी, काही गावकऱ्यांकडून त्याच्या कुटुंबाला मिळणारी अपमानास्पद वागणूक बघून मन हादरतं. विशेषतः कचरू (किशोर कदम), जब्याचे वडील, याचं कष्टाचं आयुष्य फार त्रासदायक वाटतो. चित्रपटातलं गावाचं चित्रण इतकं वास्तववादी आहे की आपण तिथेच हरवून जातो. शेतं, रस्ते, शाळा नि गावकऱ्यांचं बोलणं सगळं जणू आपल्या डोळ्यांसमोर घडतंय. जब्या नि त्याच्या मित्राचे सायकलवरचे सीन, "तुझ्या प्रितीचा विंचू मला चावला" हा Song नि काळ्या चिमणीच्या वशीकरणाचा खटाटोप हे सगळं इतकं निखळ नि हसवणारं आहे. पण त्याचवेळी डुक्कर पकडण्याचा तमाशा नि गावकऱ्यांचा क्रूरपणा पाहून आपलं हृदय पिळवटून जातो. हा विरोधाभास आपल्याला खूप खोलवर विचारात टाकतो.
आपण माणसं इतकी सुंदर स्वप्नं पाहतो, पण त्याचवेळी इतके क्रूर का होतो?सोमनाथ अवघडेनं जब्याला जिवंत केलंय. त्याचे डोळे प्रेम, भीती नि राग बोलतात. किशोर कदम नि छाया कदम यांनी कचरू व जब्याच्या आईच्या भूमिकेत जीव ओतलाय. प्रत्येक संवाद, प्रत्येक Scene इतका अफाट आहे की आपल्याला जब्याच्या दुखःचा प्रत्यय येतो.Background Music चित्रपटाला आणखी गहिरं करतं.
विशेषतः शेवटचा सीन तो इतका धक्कादायक आहे की आपण काही क्षण स्तब्ध होऊन जातो. त्या सीननं मला समाजातल्या खोलवर रुजलेल्या अन्यायावर विचार करायला भाग पाडलं.‘फँड्रीने मला शिकवलं की माणुसकी म्हणजे फक्त प्रेम नि करुणाच नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत नि स्वतःचा सन्मान जपणं सुद्धा आहे.
जब्या, कचरू नि त्यांच्या कुटुंबाच्या संघर्षानं मला प्रश्न पडतो की आपण खरंच किती पुढे आलो आहोत? जातीभेद, विषमता आजही आपल्या आजूबाजूला आहे. हा चित्रपट आपल्याला फक्त भावनिकच नाही तर वैचारिकदृष्ट्याही झटका देऊन जातो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा