पार्टनर 🌼🌾❤️

व.पु.काळेंचं साहित्य माझ्यासाठी नेहमीच खास नि स्पेशल राहिलं आहे. त्यांच्या लेखनात एक वेगळाच जिव्हाळा नि जीवनाकडे पाहण्याची एक समजूतदार दृष्टी असते. मी आधी वाचलेली त्यांची अनेक पुस्तकं वपुर्झा,तू भ्रमत आहासी वाया,आपण सारे अर्जुन, दोस्त, पाणपोई, तप्तपदी इत्यादी. प्रत्येक वेळी मला वेगळ्या कोनातून विचार करायला लावतात. त्यातलंच एक खास पुस्तक म्हणजे "पार्टनर." या कादंबरीने मला केवळ कहाणी नाही दिली, तर एक खोल भावनिक नि मानसिक प्रवास दिला.

मी ही कादंबरी आधी एकदा वाचली होती. तेव्हा ती एक प्रेमकथा वाटली होती. श्री, किरण, अरविंद यांची गोष्ट. पण आता, मागे पुन्हा एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा जेव्हा वाचली, तेव्हा तिचं वेगळंच रूप उघडं पडलं. वपु कधीच सरळ कथा सांगत नाहीत. ते पात्रांमधून, प्रसंगांमधून नि खूप साध्या शब्दांतून मोठ्या प्रश्नांची उत्तरं देतात.
या कादंबरीतलं सर्वात विशेष पात्र म्हणजे "पार्टनर." त्याचं नाव कधी येत नाही, पण त्याचं अस्तित्व पूर्ण कथेत जाणवत राहतं. तो श्रीच्या आयुष्यात येतो, त्याला ऐकतो, समजतो नि मग हळूच निघूनही जातो. पण श्रीला त्याचा खरा अर्थ कळायला वेळ लागतो नि आपल्यालाही. मला स्वतःला असं वाटतं की हा 'पार्टनर' म्हणजे वपु स्वतःच आहेत. ते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असेच येतात  त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला थांबायला, विचार करायला नि स्वतःला समजून घ्यायला लावतात.

"पार्टनर" वाचताना मला अनेकदा थांबावं लागलं, काही वाक्यं पुन्हा पुन्हा वाचावी लागली. कारण ते फक्त शब्द नव्हते, तर आरसे होते. उदाहरणार्थ, “गणिताच्या उत्तरासारखी तुम्ही आयुष्याकडे अपेक्षा करता नि जास्त दुःखी होता.” हे वाक्य थेट मनात घुसतं. आपल्याला वाटतं की प्रत्येक नातं, प्रत्येक प्रसंग परिपूर्ण असावा, पण तसं होत नाही. आणि ही असमजूत दुःखाचं मूळ ठरते.

ही कादंबरी म्हणजे एक प्रकारची मानसशास्त्रीय थेरपी आहे. यातली माणसं परिपूर्ण नाहीत. श्रीचा राग, त्याचा गर्व, किरणचं समजून न घेणं, अरविंदचं नक्की काय करायचं याबद्दलचं गोंधळ ही सगळी पात्रं खूप खरी वाटतात. आपल्या आजूबाजूच्या, किंवा अगदी आपल्या आयुष्यातल्या माणसांसारखी.

या सगळ्या प्रवासात 'पार्टनर' श्रीला नि मुळात आपल्याला एक मोठा शिकवण देऊन जातात की आयुष्य कोणत्याही एक नात्यावर आधारलेलं नसतं. आपण ज्या माणसांना "सर्वकाही" मानतो, तेच जर आपल्याला समजून घेत नाहीत, तर त्यांना धरून बसण्यात अर्थ नसतो. या कथेच्या शेवटी, श्री स्वतःकडे वळतो नि मला वाटतं, हीच वपुंची जादू आहे ते आपल्या वाचकाला शेवटी त्याच्याच मनात सोडतात, विचार करायला भाग पाडतात.

हि कादंबरी वाचल्यावर मला खूप छान वाटलं.कारण हि कादंबरी मनाच्या खूप खोलपर्यंत जाते. प्रत्येकाला आपला एक 'पार्टनर' आयुष्यात असतो जो दिसत नाही, पण आपल्याला समजून घेतो. वपुंच्या या पुस्तकाने मला असाच एक मनाचा मित्र दिला.

बाकी शेवटी…

याबद्दल लिहायला, बोलायला खूप काही आहे. पण माझ्यामते तुम्ही हे सगळं स्वतः अनुभवायला हवं. या साध्या शब्दांतून आकार घेत गेलेली 150 पानांची ही अंतर्मुख करणारी वाटचाल.

त्यामुळे ही कादंबरी जरूर वाचा. ती तुमचं काहीतरी हरवलेलं शोधायला मदत करेल.शोधा तुमचा पार्टनर  तो व्यक्ती जो ऐकेल, समजून घेईल, तुमच्याशी न बोलता संवाद साधेल नि जरी असा पार्टनर मिळाला नाही, तरीही हरकत नाही –तुम्ही मात्र नक्कीच कोणाच्या तरी जीवनात असा पार्टनर होऊ शकता…🌾

मनःपूर्वक शुभेच्छा सर्वांना..😊

शेवटी नेहमीप्रमाणे यातील मला आवडलेले विचार म्हणा किंवा काही तत्वज्ञान :- 

★ज्या माणसाच्या बाबतीत प्रेमाची वाटचाल लग्नाच्या मंडपात संपते तो वाया गेला.

★माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही  . एकटा राह्यला की हरवतो.

★आमचा देव दगडाचा नाही . आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत .

★शरीराच्या एका गरजे पुरतीच बाईला पुरुष आणि पुरुषाला बाई हवी असते . बाकी निसर्गाच्या गरजा प्रत्येकाच्या एकेकट्या च्या असतात .

★माणसाची नजर ज्या वस्तूकडे असते , तीच वस्तू त्याला पहायची आहे , तसं त्या माणसाकडे पाहणाऱ्या इतरांना वाटतं.

★सौंदर्याची ओढ वाटणं ही जिवंतपणाची खून असते.

★स्वतःच नाव विसरणं ह्यात मस्त आनंद आहे . खरं तर आपल्याला नावच नसतं . बारशाला नाव ठेवतात ते देहाचं.

★डोळे आणि स्पर्श , शब्दांपेक्षा छान बोलतात.

¶  दोन इंच लांबीच्या जिभेवर पदार्थ असतो , तोवर ' चव .'  खाली उतरला की ' घास .' सुगंधाचं नातं नाकाशी , घशातून आत गेल्यावर ती फक्त ' हवा .' खरंतर सगळ्या पंचेंद्रियाच नातं रसिकतेशी नसून तृप्तिशी असतं . तो क्षण संपला की रसिकता संपली . इतर अनेक गरजांपैकी ' तृप्ती ' ही गरज आहे . जो गरजू आहे , त्याला व्यवहार सांभाळावा लागतो . व्यवहार नेहमीच साधतो असा नाही . तो सत्यासारखा कटू असतो . ज्या मनात रसिकता असते त्याच मनात कटुता असते .

★गणिताच्या उत्तरासारखी तुम्ही आयुष्याकडे अपेक्षा करता आणि जास्त दुःखी होता . आयुष्य काही गणिताचं कोड नाही लगेच सुटायला .

★जो मागं राहणार आहे , त्याचंच खरं मरण आहे . मरणारी व्यक्ती सुटून जाणार आहे . ज्याला आघात सहन करायला मागे राहायचं आहे , त्याचं खरं मरण आहे.

 ★नजर शाबूत असलेला बाप मुलाला एकदाच जन्म देऊन थांबत नाही . आयुष्यभर तो जन्मच देत असतो .

©️ Bookish Moin  🌿😊

हे पुस्तक कोठे मिळेल :- 

हे पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी We Read ला संपर्क करू शकता.
https://wa.me/7066495828 या लिंकवर क्लिक करून पुस्तकाचं नाव नि आपला पत्ता पाठवा...🌼

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼