सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध ❤️🌼

हे डॉ. आ. ह. साळुंखे लिखित पुस्तक मी आजपर्यंत दोन वेळा वाचले आहे.हे वाचताना मला बुद्धाच्या विचारांची अधिक गहिराईने जाणीव झाली. बुद्ध ही केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नसून, ते सामाजिक क्रांती नि वैचारिक परिवर्तनाचे आधारस्तंभ होते, हे पुस्तक ते अधिक स्पष्ट करतं.

या पुस्तकात साळुंखे बुद्धाचा परिचय 'भूमिपुत्र' या शब्दातून करतात. यामागचा अर्थ अत्यंत सूक्ष्म आहे गोतम बुद्धांना भूमीशी, सामान्य जनतेशी जोडणारे मानले जाते. त्यांचा धम्म हा ईश्वरावर आधारित नसून, मानवकेंद्री आहे. म्हणूनच तात्या त्यांना ‘सर्वोत्तम भूमिपुत्र’ म्हणतात. हे दुसऱ्या वाचनात नीट लक्षात आलं.

पुस्तकात बुद्धांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे टप्पे उलगडले गेले आहेत त्यांच्या राजवाड्याच्या आयुष्यातून बाहेर पडणं, दुःखाचं कारण शोधणं, ज्ञानप्राप्तीसाठीचा प्रयत्न नि अखेर आत्मप्रबोधन. बुद्धाचं “चार आर्यसत्य” (दुःख, दुःखाचा कारण, दुःखाचं निवारण नि निवारणाचा मार्ग) हे केवळ धार्मिक तत्वज्ञान नव्हे, तर एक मानसशास्त्रीय विश्लेषण सुद्धा आहे जे मानवी आयुष्याच्या समस्यांवर भाष्य करतं. याची मला दुसऱ्या वाचनात खोल समज मिळाली.

तात्यांनी बुद्धांच्या शिकवणीचा अनिवार्य घटक म्हणजे "अष्टांगिक मार्ग" (सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती, सम्यक समाधी) याचं विवेचन साधेपणाने केलं आहे. या मार्गाने आयुष्य अधिक शिस्तबद्ध, नैतिक नि शांत बनतं. मला असं वाटतं की हे मार्ग आजच्या काळातही तितकेच उपयुक्त आहेत जिथे तणाव, असंतुलन नि गोंधळ भरपूर आहे.

बुद्धांच वैशिष्ट्य म्हणजे त्याचा विवेकवादी दृष्टिकोन. त्यांनी श्रद्धा पेक्षा प्रज्ञेला महत्व दिलं. “एत्थ बुद्धा, एत्थ गाहा” बुद्ध स्वतः सांगतात की केवळ कोणी म्हणालं म्हणून काहीही सत्य मानू नका; स्वतः अनुभवून, विचारपूर्वक स्वीकारा. हे विचार आजच्या विज्ञानवादी समाजाला सुसंगत आहेत.या पुस्तकात लेखक अनेक वेळा दलित, शूद्र, स्त्रिया, नि वंचित समाजावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख करतात. बुद्धांच्या काळात यांच्यासाठी शिक्षण, साधना, मोक्ष यावर बंदी होती. बुद्धांनी हे मोडीत काढलं नि पहिल्यांदाच सर्वांना बौद्ध संघात प्रवेश दिला. हे सामाजिक समतेचे मूलभूत पाऊल होते ज्यामुळे बुद्ध केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक क्रांतिकारक ठरतात. याच कारणामुळे त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावरही दिसतो.

दुसऱ्या वाचनाने हे लक्षात आलं की तात्यांची शैली संशोधनाधिष्ठित असूनही वाचकप्रिय आहे. ते संप्रेषणक्षमतेने बुद्धाच्या जटिल विचारांनाही सहज उलगडतात. या वेळी वाचताना पुस्तकातील संदर्भ, संस्कृत-पाली शब्दांचा अर्थ नि ऐतिहासिक पार्श्वभूमी अधिक स्पष्ट झाली.शेवटी, बुद्ध म्हणजे एक अशी प्रेरणा आहे जी सतत नव्याने समजून घ्यावी लागते. हे पुस्तक म्हणजे बुद्धाच्या विचारांची दारं उघडणारी एक चावी आहे. दुसऱ्या वाचनात मला ‘मी’ अधिक स्पष्ट दिसला. एक विचारशील, प्रश्न विचारणारा, करूणावान माणूस जो कदाचित बुद्धाच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकू पाहतो आहे.🌼❤️

©️ Bookish Moin ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼