रविंद्रनाथाच्या सहवासात❤️🌼
मैत्रेयी देवी यांनी लिहलेले हे पुस्तक वाचताना मला जणू काही एका वेगळ्या जगात प्रवेश केल्यासारखे वाटले. हे पुस्तक म्हणजे केवळ आठवणींचा संग्रह नाही, तर एका थोर साहित्यिकाच्या, विचारवंताच्या नि माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची एक सुंदर संधी आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत मैत्रेयी देवी यांनी 1934 साली मोंगपु येथे घालवलेला काळ, त्यावेळचे संवाद, त्यांची दैनंदिनी, त्यांच्या मनाच्या गूढ कप्प्यात डोकावण्याचा अनुभव, हे सगळं पुस्तकात इतकं हळुवारपणे नि प्रामाणिकपणे उतरवलं आहे की वाचक म्हणून मीही त्या सहवासाचा एक भाग झाल्यासारखं वाटलं. टागोर हे केवळ एक महान कवी किंवा नोबेल पुरस्कार विजेते लेखक नव्हते, तर ते एक अत्यंत संवेदनशील, प्रेमळ नि सगळ्यांना आपलंसं करणारे व्यक्तिमत्त्व होते, हे प्रत्येक पानावर जाणवत राहते.
पुस्तकाची भाषा अतिशय साधी, ओघवती नि भावस्पर्शी आहे व तेवढाच सुंदर अनुवाद विलास गीते सरांनी केलं आहे. मैत्रेयी देवी यांनी आपल्या अनुभवांना कुठेही अतिरंजित किंवा अलंकारिक न करता, अत्यंत नैसर्गिक अन् आपुलकीने शब्दबद्ध केलं आहे. त्यामुळे वाचकाला त्या काळात, त्या वातावरणात, शांतिनिकेतनच्या किंवा मोंगपुच्या परिसरात, प्रत्यक्ष टागोर यांच्या सान्निध्यात असल्याचा अनुभव येतो. त्यांच्या रोजच्या संवादात, त्यांच्या वागणुकीत नि अगदी साध्या प्रसंगांमध्येही टागोर यांची विचारशीलता, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नि माणुसकीचा गोडवा सतत जाणवत राहतो. त्यांच्या सहवासात असताना मैत्रेयी देवींना मिळालेली आत्मियता, संवादातील सहजता नि छोट्या-छोट्या गोष्टींमधून मिळणारी मोठी शिकवण हे पुस्तक वाचताना मला खूप भावलं.
या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील language and rhythm. विलास गीते यांचं भाषांतर इतकं ओघवतं आहे की मूळ बंगाली गंध हरवत नाही. मराठी वाचकाला टागोरांच्या सौंदर्यदृष्टीची नि संवेदनशीलतेची ओळख होते तीही त्यांच्या मातृभाषेत.
रवींद्रनाथ टागोर यांच्या दैनंदिन जीवनातील साधेपणा, त्यांच्या विचारांची खोली नि प्रत्येक गोष्टीतून आनंद घेण्याची वृत्ती हे सगळं पुस्तकातून छानपणे समोर येतं. टागोर यांचं प्रत्येक नातं, मग ते कुटुंबीय असो, मित्र असो, विद्यार्थी असो किंवा अगदी अनोळखी व्यक्ती असो, त्यांनी मनापासून जपलेलं होतं. त्यांच्या बोलण्यात नि वागण्यात एक वेगळाच गोडवा, शांतता आणि समजूत होती. ते कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही व्यक्तीशी बोलताना त्या माणसाला पूर्णपणे समजून घेण्याचा व त्याला आपलंसं वाटण्याचा प्रयत्न करायचे. हे सगळं वाचताना मला असं वाटलं की, टागोर यांच्यासारख्या मोठ्या माणसाच्या सहवासात असणं म्हणजे आयुष्यात एक नवी दृष्टी मिळवणं आहे.
या पुस्तकात टागोर यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडले आहेत. ते केवळ कवी किंवा लेखक नव्हते, तर एक विचारवंत, संगीतकार, चित्रकार नि समाजसुधारकही होते. त्यांच्या विचारांमधून, त्यांच्या संवादातून नि त्यांच्या वागणुकीतून माणुसकी, करुणा आणि जीवनातील सौंदर्य यांचा प्रत्यय येतो. लेखिकेने त्यांच्या आठवणींमध्ये टागोर यांचा केवळ मोठेपणा नाही, तर त्यांच्या साधेपणाचा, प्रेमळ स्वभावाचा नि मानवी नात्यांमधील गोडव्याचा अनुभव शब्दबद्ध केला आहे. त्यांच्या सहवासातील साध्या प्रसंगांमध्येही एक वेगळा अर्थ, गोडवा नि जीवनमूल्यांचा ठेवा आहे. टागोर यांचं जगाकडे, नात्यांकडे नि दुःख-सुखांकडे पाहण्याचं तत्त्वज्ञान हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं.
"रविंद्रनाथाच्या सहवासात हे पुस्तक वाचताना मी स्वतःच्या आयुष्यातील नातेसंबंध, जीवनाकडे पाहण्याची दृष्टी याबद्दल विचार करायला प्रवृत्त झालो. टागोर यांच्या साध्या बोलण्यातूनही मोठा अर्थ नि शिकवण मिळते. त्यांच्या सहवासात असताना मैत्रेयी देवींना मिळालेलं मार्गदर्शन, प्रेम नि आत्मियता, हे सगळं खूप आपुलकीने आणि सहजपणे पुस्तकात उतरवलं आहे. हे पुस्तक केवळ आठवणींचा संग्रह नाही, तर जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा, प्रेरणा देणारा नि अंतर्मुख करणारा अनुभव आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या सहवासातील प्रसंग, त्यांचे विचार नि त्यांच्या सहवासाचा प्रभाव हे पुस्तक वाचकाच्या मनावर खोलवर परिणाम करतात.
एकंदरीत, "रवींद्रनाथाच्या सहवासात" हे पुस्तक म्हणजे आठवणींच्या अलवार पदरातून उलगडणारा एक भावविश्व आहे. रवींद्रनाथ टागोर यांचे अंतरंग, त्यांची माणुसकी नि त्यांच्या सहवासाचा अनुभव हे पुस्तक वाचकाच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमठवतो.
हे पुस्तक वाचून मला जगाकडे, नात्यांकडे नि जीवनाकडे पाहण्याची एक नवी, सकारात्मक व संवेदनशील दृष्टी मिळाली हीच या पुस्तकाची खरी जादू आहे. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं, कारण यातून आपल्याला साधेपणातलं मोठेपण, नात्यांमधील गोडवा नि आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहण्याची प्रेरणा मिळते.❤️🌼
©️ Bookish Moin ❤️🌼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा