फेलानी 💜🌼

मागे फेब्रुवारी मध्ये हि कादंबरी वाचली नि विचारात पडलो,अस्वस्थ झालो तेव्हापासून बऱ्याच जणांना या कादंबरीबद्दल सांगितलं.कॉलेजमध्ये आसाम येथील एका मित्रांसोबत सुद्धा चर्चा करून नेमकी परिस्थिती त्याच्याकडून जाणून घ्यायचं प्रयत्न सुद्धा केलं नि आज याबद्दल दोन ओळी लिहितोय.🌼

अरूपा पटनिया कलिता यांची आसामी भाषेतली हि कादंबरी असून या कादंबरीचा मराठीत अनुवाद मेघना ढोके यांनी केला आहे. फेलानी ही केवळ एक पात्र नाही, तर ती एका संपूर्ण वर्गाची, संपूर्ण जमातीची प्रतिनिधी आहे ज्या लोकांना सतत परके ठरवले जाते, हुसकावून लावले जाते नि विसरले जाते.

फेलानी या मुलीची कथा एका दलदलीतून सुरू होते, जिथे तिच्या आईने तिला फेकून दिलं तिला वाचवण्यासाठी. ही सुरुवातच आपल्याला अस्वस्थ करते. फेलानी जिवंत राहते, पण तिच्या आयुष्याचा प्रवास कठीण असतो. ती एकटीच नाही, तिच्यासारखे अनेक लोक आसाममध्ये विस्थापित झाले आहेत कारण त्यांच्यावर ‘बांगलादेशी घुसखोर’ असा शिक्का मारण्यात आला आहे.या कादंबरीच्या पार्श्वभूमीला आसाममधील 1979 ते 1990 दरम्यानचे सामाजिक नि राजकीय संघर्ष आहेत. त्या काळात मोठ्या प्रमाणावर दंगली, आंदोलनं व हिंसाचार झाला. विशेषतः आसामी लोक नि बांगलादेशातून आलेले मुस्लीम यांच्यात तणाव वाढला. अनेक निष्पाप लोक मारले गेले, गावं जाळली गेली नि हजारो लोक निर्वासित छावण्यांमध्ये राहू लागले. फेलानी त्यापैकीच एक.

कादंबरी फक्त फेलानीवर केंद्रित नाही, तर तिच्या आजूबाजूच्या जगावरही प्रकाश टाकते. निर्वासित छावणीतल्या स्त्रिया, मुलं, वृद्ध  यांची रोजची झुंज यात दिसते. सरकारची उपेक्षा, स्थानिक लोकांचा राग नि पोलिसी दडपशाही या सगळ्यात त्यांचं माणूसपण हरवत जातं. पण तरीही ते जगतात, हसतात नि पुन्हा आयुष्य उभारण्याचा प्रयत्न करतात.

फेलानी ही त्या लोकांचीच एक प्रतिकात्मक कहाणी आहे जी आपल्याला सतत विचार करायला भाग पाडते. फेलानीचं आयुष्य हे दुःखद आहे, पण तिचं अस्तित्व म्हणजे प्रतिकार, जिद्द नि उमेद आहे. ती कितीही फेकली गेली तरी उभी राहते. यातून लेखिका आपल्याला एक मोठा संदेश देते की माणूस कोणत्याही परिस्थितीत आशा व जगण्याचा अर्थ शोधतो.

लेखिकेची भाषा साधी, पण प्रभावी आहे. प्रसंग खूप खरे वाटतात. कधी कधी वाचताना डोळे भरून येतात, तर कधी राग येतो. हे पुस्तक आपल्याला केवळ कथा सांगत नाही, तर त्या पात्रांमध्ये आपल्यालाही सामील करतं. वाचकाला अंतर्मुख करतं. हे पुस्तक आपण पटकन विसरू शकत नाही.फेलानीचा संघर्ष म्हणजे समाजाने, सत्तेने नि राजकारणाने फेकून दिलेल्या लोकांची कहाणी आहे. या कादंबरीतून ‘भारतीय’ असूनही परके ठरवले जाण्याचं दुःख समजतं. जात, धर्म, भाषा यावर आधारित ओळख किती असुरक्षित असते हे कळतं.

शेवटी, "फेलानी" ही एक अशी कादंबरी आहे जी वाचकाच्या मनात खोलवर जाते. ती आपल्याला अस्वस्थ करते, पण डोळे उघडून पाहायला शिकवते. आपण रोजच्या जगण्यात दुर्लक्षित करत असलेल्या लोकांचा आवाज ही कादंबरी आपल्यापर्यंत पोहोचवते.
ही कथा प्रत्येकाने वाचली पाहिजे विशेषतः जे लोक समाज, मानवी हक्क नि सत्तेचे खरे स्वरूप समजून घेऊ इच्छितात. "फेलानी" आपल्याला सांगते की इतिहास फक्त मोठ्या माणसांनी घडवलेला नसतो तर छोट्या लोकांच्या दुःखातूनही तो उभा राहतो नि राहिलेला आहे.🌼

©️ Bookish Moin ❤️

ता.क :- हि कादंबरी आपल्या we read मध्ये सवलतीत उपलब्ध आहे.💜🌼

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼