72 मैल एक प्रवास 🌼🖤
काही दिवसांपूर्वी मी '72 मैल एक प्रवास’ हा मराठी चित्रपट पुन्हा एकदा बघितलं नि खरंच, मन फार भरून आलं. हा 2013 साली आलेला चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो.🌼एका तेरा वर्षांच्या मुलाची, अशोक व्हटकरची ही कथा आहे. तो साताऱ्याच्या वसतिगृहातून पळून आपल्या कोल्हापूरच्या गावी निघतो. त्याचा हा प्रवास 72 मैलांचा आहे, पण त्या प्रवासात त्याला इतके अनुभव येतात की त्याचं आयुष्यच बदलून जातं. मला खूप आवडलं की ही गोष्ट खूप साधी आहे, पण तरीही मनाला फार भिडते.
अशोक रस्त्यात वेगवेगळ्या लोकांना भेटतो काही त्याला मदत करतात, तर काही त्याला त्रास देतात. विशेषतः त्याला त्याच्या जातीमुळे अपमान सहन करावे लागतात, जे पाहून खूप वाईट वाटतं. पण त्यातच राधाक्का नावाच्या एका दयाळू बाई सोबत त्याची भेट होते. ती आपल्या आजारी मुलाला घेऊन सांगलीच्या शिगावला निघाली आहे. ही भेट अशोकसाठी खूप खास ठरते नि आपल्यालाही ती खूप भावते.चित्रपटातलं गावं, शेतं, रस्ते सगळं इतकं सुंदर दाखवलंय की आपण त्या काळातच गेल्यासारखं वाटतं.
हा चित्रपट पाहताना आपल्याला आपलं गाव, परिसर आठवतो. प्रत्येक सीन इतका खरा वाटतो की जणू आपण अशोकबरोबर त्या रस्त्यावर चालतोय. मला विशेषतः अशोक नि राधाक्का यांच्यातले प्रसंग खूप आवडले. त्यांचं नातं कसं हळूहळू घट्ट होतं, हे पाहून डोळ्यात पाणी आलं. राधाक्का त्याला आपल्या मुलासारखं जपते, नि अशोक तिच्याकडून खूप काही शिकतो.अशोकची भूमिका चिन्मय संत नावाच्या मुलाने केलीये नि खरंच, त्याने फार जबरदस्त अभिनय केलं आहे.त्याचे डोळे, त्याचा चेहरा सगळं काही बोलतं.
राधाक्काच्या रोलमधली स्मिता तांबे तर अप्रतिम आहे. तिचा प्रत्येक संवाद इतका मायेने भरलेला आहे की आपल्याला ती आपलीच कोणीतरी वाटते. बाकीचे कलाकारही खूप छान आहेत. सगळ्यांनी मिळून ही गोष्ट जिवंत केलीये.चित्रपटातली गाणीही खूप छान आहेत. “देवा सुंदर जगा मध्ये का रे माणूस घडविला” हे गाणं मला खूप आवडलं. ते ऐकताना अंगावर शहारे आले. संवादही खूप साधे पण अर्थपूर्ण आहेत.
मला वाटतं, या चित्रपटातलं सगळं इतकं नैसर्गिक आहे की आपल्याला कुठेही बनावटपणा जाणवत नाही.हा चित्रपट बघताना मला खूप काही शिकायला मिळालं. अशोकच्या प्रवासातून माणुसकी, दया अन् स्वतःला समजून घेणं याचं महत्त्व मुळात कळलं.काही ठिकाणी हसू आलं, काही ठिकाणी रडू आलं, पण शेवटी मन खूप हलकं नि शांत झालं.
चित्रपटाचा शेवट खूपच सुंदर आहे नि तो आपल्या मनात घर करून राहतो.विशेष:त राधा आईने अशोक्याला दिलेले मोलाचे धडे.हा चित्रपट आपल्याला फक्त मनोरंजनच नाही, तर खूप काही विचारही देऊन जातो एवढं मात्र नक्की...🌼❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा