चित्रपटातून सापडलेला आदर्श : माझा बा भीमा ❤️🌼

एका दहा रुपयाच्या छोट्याखानी पुस्तकापासून वयक्तिक ग्रंथालयापर्यतचा हा प्रवास आणि फाटक्या अंगी पासून ते सुटा बुटा पर्यतचा हा प्रवास फक्त बा भीमा तुझ्यामुळे......♥️✨

मी लहानपणापासून गावाकुसाबाहेर असलेल्या एका बौद्ध वस्तीत राहतोय.येथेच लहानाचा मोठा झालोय. अनेक बाबतीत वंचित असलेली ही छोटीशी गल्ली जेथे कोणतीही विशेष सुविधा नाही.गावातील विकासानंतर या गल्लीचा नंबर येतो.या गल्लीतूनच माझी आणि बा भीमाची नाळ जुडली आहे असे मी म्हणू शकतो.बालपणापासून या वस्तीत असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा नाव हमखास कानांवर पडायचा.गल्लीतील प्रत्येक मित्रांच्या घरात 'बा भीमा' आणि 'गौतम बुद्धांचा' फोटो असायचाच,गावात 'जय भीम' हा वाक्य 'राम राम'नंतर आवर्जून ऐकायला मिळायचा..

14 एप्रिल च्या दिवशी वर्षभर फाटक्या ,तुटक्या कपड्यात राहणारे माझे मित्र नवीन कपडे,चप्पल घ्यायचे.त्यांच्या घरात गोड-धोड बनायचं.वर्षभरात 14 एप्रिल हा सण वाटायचं.बाजूला असलेल्या गावात दिवाळी तर आमच्या घरी ईद ज्या पद्धतीने साजरी व्हायची त्या पद्धतीने गल्लीतील मित्रांच्या घरी 14 एप्रिल साजरी व्हायची.

तेव्हा 14 एप्रिलचे महत्व नेमके काय होते ? हे अजिबात माहिती नव्हते आणि ते समजून घेण्याचे प्रयत्न सुद्धा मी कधी केले नव्हते.बौद्धांचा सण आहे एवढीच ओळख फक्त मला 14 एप्रिलची होती.घरात आणि आजूबाजूला समजून सांगणारा कोणीही असं विशेष नसल्याने कधी समजून घेण्याचं प्रयत्न सुद्धा केले नाही.निळ्या कोटात उभा असलेला,एका हातात जाड- जुड पुस्तकं धरून समोर बोटं दाखवणाऱ्या माणसाचं नाव 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर' आहे तर एका वृक्षाखाली शांततेत डोळे बंद करून बसलेल्या त्या माणसाचं नाव 'गौतम बुद्ध' आहे आणि हे दोन्ही बौद्धांचे देव आहेत एवढीच माहिती मला तेव्हा पुरेशी होती.

गावात 14 एप्रिल ला निघणाऱ्या मिरणुकीत खरंच फार भारी वाटायचं.बाबासाहेबांचा मोठा फोटो बघून,गावाच्या चौकात असलेला पुतळा बघून छान वाटायचं...तेव्हा या माणसाचे कर्तृत्व जरी माहिती नसले तरीही इतर मित्रांसोबत आपसूकच हात जोडायचो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेमके कोण ?

हा प्रश्न काही मला 7 वी पर्यत पडला नाही आणि मी  स्वतःला कधी विचारलंच नव्हतं.

सातवीपर्यंतचं माझं आयुष्य म्हणजे 'नदी,जुगार आणि गावभर कुत्री मारत हिंडणे एवढ्या पूर्तच मर्यादित होतं. शाळा आणि त्यातील अभ्यास मुळात माझ्यासाठी सर्वांत मोठी अंधश्रद्धा होती.वडील शाळेत पाठवायचे शाळेत दप्तर सोडून मी नदीवर पोहायला,मासे धरायला असायचो... जणू माझे दुसरे घर नदी आणि जुगाराचा अड्डा होते...पोहायला जायचो मग किंवा जुगार खेळत बसायचो. समजलं नसलं तरीही जुगार खेळायचो आणि पैसे हारायचो.सातवीपर्यंत फक्त हेच केलं दुसरं काहीही नाही.7 वीत असताना असचं सहज एक चित्रपट बघितला आणि बघतच गेलो....आजपर्यंत तो चित्रपट मी किती वेळेस बघितला असेल याची काही गिनती नाही.त्या चित्रपटाने मला आतून हेलावून सोडलं,शून्य अक्कल असताना सुद्धा काहीतरी कोठेतरी मला टच केलं..चित्रपटात दाखवलेल्या त्या मोठ्या 'लायब्ररी'ने मला खुणावलं तर चित्रपटातील नायकाच्या ध्येयाने मला प्रेरणा दिली आणि त्या माणसाची ओळख करून दिली,ज्याची ओळख मला पूर्वीच व्हायला हवी होती ,एका प्रश्नाचं शॉर्ट मध्ये उत्तर मिळालं आणि कितीतरी नवीन प्रश्नांनी मनात गिरक्या घ्यायला सुरुवात केली.

या चित्रपटाने मला प्रथमच एक आदर्श दिलं आणि त्या आदर्शाबद्दल अधिक माहिती घ्यायला प्रवृत्त केलं.या माहिती घेण्याच्या प्रेरणेतून मी माझ्या शालेय पुस्तका व्यतिरिक्त पहिलं वहिलं एक छोटंसं पुस्तकं हाती घेतलं आणि ते छोटेखानी पुस्तकं वाचून पूर्ण केलं.हा परिवर्तन फक्त एका चित्रपटाने झालं.आता तो चित्रपट कोणता आणि तो आदर्श कोण ?तर तो चित्रपट होता 'जब्बार पटेल सरांनी दिग्दर्शित केलेला आणि 'मामुटी' या अभिनेत्याने अभिनय केलेला चित्रपट 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर'आणि मला मिळालेला तो आदर्श होता माझा बा भीमा.

बस्स..... मग काय तो दिवस आणि आजचा दिवस...तेव्हा या अवलियाच्या प्रेरणेमुळे एक छोटंसं पुस्तकं हाती घेतलं होतं आता स्वतःच 'ग्रंथालय'निर्माण केलं आहे.त्या ग्रंथालयातील निम्मी पुस्तके वाचलेली आणि जगलेली आहे.

बा भीमाने कमालीची ऊर्जा दिली,प्रेरणा दिली आणि मार्ग दाखवलं आहे.10 वी नंतर शाळा सोडून देण्याचं निर्णय घेतलेल्या या माझ्या सारख्या मुलाला या महामानवाने PHD पर्यत मजल मारायची हिम्मत दिली आहे.

एकंदरीत माझ्या बा भीमाने मला सुद्धा कोटी 'अस्पृश्य'म्हणून हिनवल्या गेलेल्या बांधवांसारखा नवीन जन्म दिलं आहे.बा भीमा च्या शिवाय हा माझा प्रवास शक्य झालं नसतं..✨

जय भीम....♥️✨😘

सर्वांना खूप खूप शुभेच्छा 😍♥️

©️Moin Humanist🌱

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼