माझा वाचनप्रवास...❤️
वाचन आज माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. माणसाच्या विचारसरणीवर, व्यक्तिमत्त्वावर नि संपूर्ण आयुष्यावर वाचनाचा खोलवर परिणाम होतो. इतिहासात अनेक थोर व्यक्तींनी केवळ वाचनाच्या जोरावर आपलं जीवन घडवलं आहे. माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याचं आयुष्यही वाचनामुळेच बदललं आहे. चांगली पुस्तके जगण्याचा नवा दृष्टिकोन देतात, आपल्या विचारांना एक नवी दिशा देतात, बौद्धिक नि भावनिक समृद्धी वाढवतात.
"आपण जेव्हा वाचन करत नाही, तेव्हा आपलं आयुष्य सीमित राहतं; आपण चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करत नाही. माहिती आपल्याला अनेक ठिकाणाहून मिळते, पण खरी समज नि शहाणपण पुस्तकांमधूनच मिळतं. अनुभवाच्या समृद्धीने हे ज्ञान अधिक दृढ होतं, तेव्हा आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होतं जातं असं मला वाटतं.
माझ्या आयुष्यातही हेच घडलं. पुस्तकांनी मला दिशा दिली, मार्गदर्शन केलं नि माझ्या आयुष्याला एक वेगळी ओळख दिली. मी केवळ शिकत गेलो नाही, तर जगणंही समजत गेलो. वाचनाच्या या प्रेमामुळेच मला ‘स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार प्रथमच एका वाचकाला देण्यात आला होता. माझ्यासाठी हा केवळ सन्मान नव्हता, तर वाचनावर असलेल्या माझ्या निष्ठेची एक खरी साक्ष होती.
माझ्या वाचनप्रवासाची सुरुवात एका साध्या गोष्टीमुळे झाली,जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाच्या प्रभावामुळे.
या चित्रपटात बाबासाहेबांचे प्रचंड वाचन, अभ्यास नि पुस्तकांवरचं त्यांचं प्रेम पाहून माझ्या मनातही वाचनाची आवड निर्माण झाली.त्या वेळी मी कधीच विचार केला नव्हता की मला वाचनाची एवढी गोडी लागेल, कारण माझ्या कुटुंबात नि समाजात शिक्षणाचा कुठलाही वारसा नव्हता. माझ्या पिढीत किंवा पूर्वीच्या पिढ्यांमध्ये कुणीही शाळेची पायरी ओलांडली नव्हती. माझे आजोबा, माझे आई-वडील सर्वच निरक्षर होते. अशा परिस्थितीत मी वाचनाकडे वळेन, हे कुणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं.माझ्या वाचनाची खरी सुरुवात मी सातवीत असताना झाली. चित्रपट बघितल्यानंतर बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल अधिक जाणून घ्यायची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. त्याकाळात मी सतत शोध घेत होतो की बाबासाहेबांबद्दल अजून कुठे काही वाचायला मिळेल का. अखेर, एके दिवशी मेहकर बस स्टँडवर मला एक छोटेखानी पुस्तक मिळालं डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. त्याची किंमत अवघी 10 रुपये होती. हे माझ्या आयुष्यातील पहिलं विकत घेतलेलं पुस्तक होतं.
हे पुस्तक वाचून पूर्ण होताच, माझ्यात थोडी का असेना एक जाणीव निर्माण झाली. त्यानंतर मी केवळ बाबासाहेबांबद्दल नाही, तर इतर अनेक थोर व्यक्तींविषयी वाचायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, भगतसिंह, सुभाषचंद्र बोस, एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तींना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या काळातच मला समजलं की Library नावाची सुद्धा एक गोष्ट असते नि तिथे पुस्तकांचा अमूल्य खजिना असतो. मी गावातील नि आजूबाजूच्या ग्रंथालयांमध्ये जाऊ लागलो नि जे मिळेल ते वाचू लागलो.
सुरुवातीला मी बस स्टँडवर मिळणारी छोटी पुस्तकं विकत घ्यायचो. शेखचिल्ली, हातीमताई,चंपक,अकबर-बिरबलचे किस्से,पंचतंत्र यांसारख्या गोष्टींची पुस्तकं वाचत गेलो. पण हळूहळू माझ्या वाचनाचा विस्तार होत गेला नि मी समृद्ध होतं गेलो.
आठवीत असताना,डॉ.एपीजे अब्दुल कलाम सरांच 'अग्निपंख' हे पुस्तक मी वाचलं नि त्यामुळे मला वाचनाचं खरं वेड लागलं. त्या पुस्तकानंतर मी नियमितपणे पुस्तके खरेदी करून वाचू लागलो. पुस्तके माझी खरी मित्र झाली. वाचनाची गोडी एवढी वाढली की मी पुस्तकांसाठी वेगळा गुल्लक बनवला नि त्यात फक्त पुस्तकांसाठी पैसे साठवायला सुरुवात केली. हळूहळू माझ्याकडे बराच मोठा पुस्तकसंग्रह झाला नि शून्यातून सुरू झालेली ही वाचनयात्रा एका लहान Library च्या रूपात फुलली जी पुढे ' स्टडी बंकर ' म्हणून प्रसिद्ध होणारं होतं.
मी फक्त वाचनाचं वेडच नाही लावलं, तर Study Bunker नावाने माझं स्वतःचं खासगी ग्रंथालय तयार केलं. हे ग्रंथालय केवळ माझ्यासाठी नाही, तर आजूबाजूच्या विद्यार्थ्यांसाठीही खुलं आहे. मी Dalit literature, Rural literature, Historical, Biographies, Autobiographies, Poetry, Travelogues नि Self-help अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह केला.
डॉ. बाबासाहेबांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे -
"जर तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल, तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल."
हीच शिकवण नजरेसमोर ठेऊन मी We Read हा उपक्रम सुरू केला. माझ्यासारख्या तळागाळातील वाचकांपर्यंत चांगली पुस्तकं पोहोचवणं नि त्यांना वाचनाची प्रेरणा देणं, ही माझी जबाबदारी मानली.
सध्या मी Kautilya School of Public Policy येथे Master's करत आहे. इथपर्यंत पोहोचण्यात पुस्तकांचा, वाचनाचा फार मोठा वाटा आहे. इथे अभ्यासाचा मोठा ताण असतो, त्यामुळे वाचनासाठी जास्त वेळ मिळत नाही. पण तरीही महिन्याला किमान 3 पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करत असतो.माय मराठीसोबतच आता मी English Books वर Focus करतोय, कारण Public Policy च्या क्षेत्रात इंग्रजी ग्रंथसंपदा महत्त्वाची ठरते.
मी सध्या बाहेर राज्यात असलो तरीही Study Bunker कायम सुरू आहे. तिथे विद्यार्थी नियमितपणे भेट देतात, पुस्तके वाचतात. We Read ला सुद्धा मी जमेल तसं वेळ देतो. पुस्तकांशी असलेली माझी नाळ कधीही तुटू शकत नाही नि मी देणार नाही एवढं नक्की.कारण,वाचन ही एक जीवनशैली आहे...
मी वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाने मला काही ना काही शिकवलं. माझ्या आयुष्यात मार्गदर्शन करणारं कोणीच नव्हतं, त्यामुळे पुस्तकं हीच माझी गुरुकिल्ली बनली. पूर्वी स्टडी बंकरला असताना मी दररोज किमान 40 पानं वाचायचो आठवड्याला दोन पुस्तके नि महिन्याला 8 पुस्तके वाचण्याचा माझा नित्यक्रम असायचा.मी केवळ वाचत नाही, तर त्यावर चिंतन नि मनन करतो, विचारांची अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.माझा वाचनप्रवास केवळ पुस्तकं वाचण्यापुरता मर्यादित नाही. हे आत्मशोधाचं नि समाजपरिवर्तनाचं साधन आहे. वाचनाने मला केवळ माहिती नाही, तर जगण्याचा हेतू दिला आहे.
मी या प्रवासात निरंतर चालत राहणार आहे. कारण-
"वाचन ही एक मशाल आहे, जी एका हातातून दुसऱ्या हातात दिली गेली, तरच प्रकाश पसरतो..." ❤️🌼
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा