वाचन प्रसंग ❤️



प्रत्येक वाचकाने 'पुस्तकावरील पुस्तकं'
(Book On Books)वाचायलाच हवे या मताचा मी आहे.या पुस्तकातून इतर वाचकांचे पुस्तकप्रेम,वाचनवेड अनुभवायला नि पुस्तकप्रेमाचे महत्वपूर्ण धडे घेऊन यायला हवे असं मला नेहमीच वाटतं.माझे वाचन प्रेम वृद्धिंगत करण्यात या प्रकारच्या पुस्तकांनी महत्वाची भूमिका निभावली आहे;यासोबतच वाचनासंबंधित माझ्या मनात असलेल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

'सतीश काळसेकर सरांचं 'वाचणाऱ्याची रोजनिशी'तर निरंजन घाटे सरांचं'वाचत सुटलो त्याची गोष्ट'या Genre मधली माझी खूप आवडती पुस्तके जी वाचून माझं वाचनप्रेम कितीतरी पटीने वाढलं आहे.तर या यादीत नुकतंच आलेलं नितीन वैद्य सर लिखित नवंकोर 'वाचन प्रसंग'हे ' पुस्तकं नव्याने समाविष्ट झालं आहे.

या पुस्तकाने मला वाचनाच्या अजून जास्त जवळ नेलं तर 'मी खुप काही वाचलेलं आहे' हा असलेला गोड गैरसमज दूर केलं.

या पुस्तकांत लेखकांनी वेळोवेळी वाचलेल्या पुस्तकावर लिहिलेली एकूण शंभर टिपणं/वाचननोंदी दिलेल्या आहेत जी फार वाचनीय,प्रेमात पाडणारी तर आहेच त्यासोबत बऱ्याच पुस्तकाबद्दल महत्वपूर्ण माहिती देऊन जाणारी आहे.

राम जगताप यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे - यात केवळ पुस्तकांबद्दलच्या नोंदीच नाही,तर काही नोंदी लेखक नि त्यांच्या पुस्तकांबद्दलच्याही असून काही प्रकाशन संस्था,काही वर्तमानपत्रं वा नियतकालिकांमधल्या वाचलेल्या लेखनाबद्दलच्याही आहेत.एकाच पुस्तक नि लेखकबद्दल त्यांनी एकापेक्षा जास्त नोंदी लिहलेल्या आहेत.अनेकवेळा त्यांना एका पुस्तकाबद्दल लिहिताना इतर अनेक पुस्तकं आठवतात.

एकूण 216 पृष्ठसंख्या असलेलं हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला किती काही वाचायचं बाकी आहे ही जाणीव होऊन जाते.आपण आजपर्यंत खूप वाचल्याचा गर्वहरण हे पुस्तक वाचल्यानंतर होतो.लेखकांच्या वाचन प्रेमाला सलाम करावंस वाटतं.

अंबरीश सर म्हणतात :-

 'आपण सगळे पुस्तक वाचतो. मित्रवर्य नीतिन वैद्य पुस्तकं जगतात. वैद्य पुस्तकं अंथरतात, पांघरतात; पुस्तकांना न्हाऊ-माखू घालतात, अंगडं-टोपडं चढवतात. ते पुस्तकांशी बोलतात, पुस्तकांचं ऐकतात-ऐकवतात. थोडक्यात माहिती देऊन वैद्यांचं भागत नाही; पुस्तकाच्या निरनिराळ्या असोसिएशन्सविषयी ते सहज लिहून जातात. चिमूटभर मागचं पुढचं सांगतात. ठिपके ठिपके जोडतात आणि वाचनातलं सृजन वेचतात.'

हे अगदी मनापासून पटून जातं,हे वाचत असताना पावलोपावली अंदाज येतो.खरंच ! हे असलं काही वाचलं तर वाचनाच्या जगात अजून आपला जन्म सुद्धा व्यवस्थित झालेला नाही याची प्रचिती येते.हे पुस्तक एका वाचकाच्या वाचनप्रेमाची सुंदर सैर करून आणायचं तर मनन,चिंतन करून वाचनाचं महत्व सांगण्याचं काम करतं..!

आवर्जून प्रत्येकांनी नक्कीच वाचावं नि संग्रही ठेवावं असं हे पुस्तकं आहे.🌾

©️Moin Humanist♥️
मी वाचलेली पुस्तके

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼