नॉट विदाऊट माय डॉटर ❤️
बेट्टी मेहमुदी लिखित 'नॉट विदाऊट माय डॉटर'या इंग्रजी पुस्तकाचा 'लीना सोहोनी'यांनी केलेला मराठी अनुवाद वाचून पूर्ण केलं. मी हे पुस्तक फक्त वाचलं नाही तर जगलो आणि यातून एका आईच्या साहसाला नमन करून आलो.
एकंदरीत कमालीचं अस्वस्थ करून जाणारा हा प्रवास होता.
"खरंच ! अशी बिकट परिस्थिती नि दुःख कोणाच्याही वाटेला येऊ नये"जे या लेखिकेच्या नशिबी आले होते.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकाला गुंतून ठेवणाऱ्या या पुस्तकातून एका आईच्या अफाट शौर्य अन् धाडसाचे दर्शन मला झाले.
हा प्रवास वाचताना डोकं सुन्न व्हायला होतं नि कितीतरी वेळा डोळ्यांतून आपसुकच पाणी तरळत.'आजूबाजूचं काही भान राहतं नाही एवढं आपण यात गुंतून जातो.हे सर्वकाही आपल्या डोळ्यासमोर घडतोय असं आपल्याला वाटू लागतं.बेट्टी नि माहतोबचं दुःख आपल्याला आपल्या स्वतःच वाटू लागतं, या मायलेकीच्या दुःखाचे नकळतच आपण वाटेकरी होऊन जातो.
हे पुस्तक वाचून पूर्ण केल्यानंतर मीच लेखिकेसोबत हा विलक्षण नि संघर्षपूर्ण प्रवास करून आलोय असं मला वाटतंय.स्वतःच दुःख मला किरकोळ वाटू लागलं आहे.
खरंच ना ! आपले दुःख किती क्षुद्र असतात व आपण त्यांनाच खूप मोठे समजून कुरवाळत बसतो.जगात लोकांच्या वाटेला काय काय आलेलं आहे हे आपल्याला ठाऊक सुद्धा नसतं.जेव्हा आपण इतरांच्या दुःख नि संकटाबद्दल हे असलं काही बघतो,वाचतो तेव्हा खऱ्या अर्थाने 'आपण किती नशीबवान आहोत' याची जाणीव होते नि आपल्या आयुष्यात येणारी संकटे आपल्याला किरकोळ वाटू लागतात.या अश्या पुस्तकातून इतरांच्या वेदना तर कळतातच व यासोबतच आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना मात देण्याची प्रेरणा आणि हिम्मत सुद्धा मिळते.🌾
कथानकाबद्दल.....❤️
बेट्टी महमुदी ह्या मूळ अमेरिकन असलेल्या महिलेला त्याचा मूळ इराणी असलेला पती 'डॉ.सय्यद महमूदी'त्याच्या कुटुंबियांना भेटण्याच्या निमित्ताने इराणला घेऊन येतो.त्यांच्या सोबत त्यांची 4 वर्षाची मुलगी 'माहतोब'सुद्धा असते.'अमेरिकासारख्या देशात वाढलेल्या बेट्टीला इराण सारखा कर्मठ नि महिलांना कवडीची किंमत न देणारा देश अजिबात आवडतं नाही.जेमतेम पंधरा दिवस तर काढायचे आहे,त्यानंतर आपल्या मायदेशी परत जाणारच आहोत
अशी मनाची समजूत घालून ती दिवस काढत असते.
पण इकडे तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबीयांचं काही वेगळंच कारस्थान शिजत होतं,अमेरिकेला परत जायचं नाही असं यांनी ठरवलं होतं.
एकेदिवशी मुडी बेट्टीला खडसावतो...
"आता तू जन्मभर इथंच राहायचं, समजलं? तू आता इराण सोडून कधीच जायचं नाही, मरेपर्यंत इथंच राहायचं."
इथून सुरू होतो प्रवास एका आईच्या एका आगळ्या वेगळ्या संघर्षपूर्ण नि खडतर प्रवासाचा. "काहीही झालं तरीही आपल्या मुलीला घेऊन अमेरिकेला परत जायचंच" हा मनाशी निर्धार करून इथे आलेल्या संकटांना तोंड देत,बिकट परिस्थितीचा सामना करत करत ती सुटकेचे प्रयत्न सुरूच ठेवते.
शेवटी येथील एका माणसाच्या साह्याने ती इराण मधून पलायन करण्यात यशस्वी होते.'पण तीचा हा सुटकेचा मार्ग सोपा नसतो.पावलोपावली संकट,भीती असते परंतु तरीही ती काही जुमानत नाही नि मनाशी केलेला निर्धार पूर्ण करून दाखवतेच नि इथे एका आईचा विजय होतो ...! 🌾🌿
©️Moin Humanist🌾
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा