डोंगराएवढा ❤️


रात्री 'शिवराम कारंत'लिखित 'बेट्टद जीव' या कानडी भाषेतील अप्रतिम कादंबरीचा 'उमा कुलकर्णी'यांनी'डोंगराएवढा'नावाने सुंदरीत्या केलेला अनुवाद एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलं.

148 पृष्ठसंख्या असलेली ही अप्रतिम कादंबरी माझ्या मनाला फार आवडून नि भावून गेली.लेखकासोबत प्रवास करून जणू मीच यातील परिसरात भटकंती करून नि यातील पात्रांशी भेटून आलोय असं मला वाटतंय.मी ही कादंबरी वाचताना पूर्णपणे यामध्ये हरवून गेलो होतो,वाचताना मला आजूबाजूचं भान राहिलेलं नव्हतं एवढं मी यात गुंतून गेलो होतो.

पहिल्या पानांपासून तर शेवटच्या पानांपर्यत वाचकाला खिळवून ठेवण्यात ही कादंबरी कमालीची यशस्वी होते.शेवटपर्यंत कुठेही थोडी सुद्धा कंटाळवाणी न वाटणारी ही कादंबरी अनुवादित आहे असं अजिबात वाटतं नाही .एवढं कमालीचं अनुवाद या कादंबरीचं झालं आहे.'एकदा वाचायला हातात घेतल्यावर खाली न ठेवता येणाऱ्या या कादंबरीचा कथानक फारच सुंदर नि हृदयाला स्पर्श करून जाणारा आहे.जो प्रत्येक वाचकाने नक्की वाचायला नि अनुभवायला हवे.

कथानक :-

रात्रीच्या वेळी 'पंज' या गावी जायला निघालेला पण रस्ता चुकलेला या कादंबरीचा निवेदक जंगलात असलेल्या एका वेगळ्याचं वाडीत जाऊन पोहोचतो.या वाडीत कोणीही ओळखी/पाळखीचे नसल्याने नि चोहीकडे मोठ्या डोंगररांगा नि अरण्य व जंगली जनावरांच सावट असल्याने तो चिंतेत पडतो.'आता एवढ्या रात्री कोठे जावे नि नेमकं काय करावे हा प्रश्न त्याला सतावतो.

या विवंचनेत असतानाच रस्त्याने जात असलेले दोन 'रहिवासी' त्याच्या नजरेस पडतात. तो त्यांना रात्रभर झोपण्यासाठी थोडी जागा देण्याची विनंती करतो .ते खेडूत त्याला तेथून दोन मैल असलेल्या वाडीवरल्या एका उदार वृद्ध ब्राह्मण 'गोपालय्या'यांच्या घरी आश्रयाला घेऊन जातात.हे इसम म्हणजेच या कादंबरीचे नायक ज्यांना लेखक 'डोंगराएवढा' म्हणून संबोधतात.
ते नेमकं का ? या प्रश्नाचं उत्तर कादंबरी वाचताना वाचकाला उलगडत जातं.

'गोपालय्या' व त्यांची पत्नी 'शंकरम्मा'हे वृद्ध दाम्पत्य वाडीतल्या घरात राहत असतात.निवेदक तेथे जाताच ते त्याचं मनापासून स्वागत करून त्याला फार प्रेमाची वागणूक देतात.नव्या पाहुण्याच्या आगमनाने ते फार हरखून जातात.पाहुण्याची मागचं काहीतरी ऋण असल्यासारखी काळजी घेतात.हे सर्वकाही बघून पाहुणा सुद्धा सुखावून जातो.त्याला हे प्रेम अनपेक्षित असतं.

एका रात्रीसाठी मुक्कामाला आलेल्या या पाहुण्याचं मुक्काम वाढत जातो नि त्यासोबत यांच्यातील स्नेह सुद्धा.बघता बघता निवेदक या घराचा जणू एक सदस्य होऊन जातो.तो या दाम्पत्याच्या मनाला स्पर्श करून त्यांच्या मनातील दुःख जाणून घेऊन ते तो कमी करण्याचा निर्धार करतो.

कादंबरीचं कथानक जसं जसं पुढे जातो तसं तसं आपल्याला या वाडीतील इतर रहिवासी असलेल्या काही पात्रांची ओळख होतं जाते नि त्यांच्यासोबत आपण जुडत जातो.आजूबाजूला केलेली निसर्गाची भटकंती,नदीच्या थंडगार पाण्यात केलेली अंघोळ,घेतलेला भोजनाचा आस्वाद नि केलेली वाघाची शिकार इत्यादी प्रसंगाचे वर्णन वाचून आपण फार सुखावून जातो.'यातील कथानक जणू आपण डोळ्याने बघतोय असं आपल्याला अनेक वेळा वाटून जातं..💙

एकंदरीत सुंदर नि अप्रतिम असलेली ही मनाला मोहून घेणारी कादंबरी आवर्जून सर्वांनी वाचावी नि अनुभवावी. याबद्दल लिहण्यासारखं नि वर्णन करण्यासारखं अजून बरंच काही आहे पण वाचकांनी या कादंबरीचा आस्वाद प्रत्यक्ष ही कादंबरी वाचूनच घ्यावा असं मला वाटतं.'यामुळेच मी अधिक काही न लिहिता हात आखडता घेतलं आहे..!❤️🤗🌿


©️Moin Humanist❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼