माझा वाचन प्रवास ♥️


वाचन मला आज फार महत्वाचं वाटतं.अवांतर वाचन आयुष्यात खूप मोठा इम्पॅक्ट पाडत असतो.असंख्य महापुरुषांपासून तर माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांचं आयुष्य वाचनाने बदललं आहे.चांगली पुस्तके आपल्याला खूप काही देऊन जातात.'आपण जेव्हा वाचन करत नाही तेव्हा आपलं आयुष्य सीमित राहतं, चौकटीच्या बाहेर जाऊन आपण विचार करत नाही.आपली प्रगल्भता वाढतं नाही.माहिती आपल्याला चोहीकडे मिळेल पण पुस्तकांतून आपल्याला ज्ञान मिळतो आणि या ज्ञानाला जेव्हा अनुभवाची जोड मिळते तेव्हा खरंच आयुष्य समृद्ध होतं जातो.

वाचन तुम्हाला समृध्द करत असतं.'वाचन तुमच्या वागणुकीत दिसायला हवं.'हजारो पुस्तके वाचून जर तुम्ही प्रेमाला सोडून द्वेषाला प्राधान्य देत असाल,तुमच्या वागणुक,राहणीमान नि विचारांत काहीही फरक येतं नसेल,माणसाला तुम्ही माणसाच्या दृष्टीकोनातून बघायला शिकतं नसाल तर तुमचं एवढं वाचन करून काहीच फायदा होतं नसतं.

'वाचन माणसाला सकारात्मकता शिकवत असतो अन् कमालीचं आत्मविश्वास देऊन जातो.पण  एवढं वाचन करून सुद्धा आपण त्यातून प्रत्यक्षात उतरवू शकतं नसू किंवा वाचलेलं जगतं नसू तर तो वाचन अनेक बाबतीत कुचकामी ठरतो.

'चांगल्या पुस्तकाचं वाचन जगाला बघण्याचा दृष्टीकोन बदलतं असतो,एका आयुष्यात असंख्य आयुष्य जगायला शिकवतं असतो.वाचण्यापेक्षा वाचलेलं जगण्याला प्राधान्य द्यायला हवं असं मला कायम वाटतं..!

वाचन मला नेहमीच फार गरजेचं वाटतं आलेलं आहे.एकंदरीत वाचनामुळेच घडलोय आणि घडतोय.अवांतर वाचन म्हणजे माझ्या फारच जिव्हाळ्याचा विषय आहे.कोणाला अतिशयोक्ती वाटेल पण मला वाचनाशिवाय इतर काहीही जास्त नाही.आजपर्यंत खूप खूप काही वाचलंय आणि पुढे वाचायचं आहे.बाकी मुख्य गोष्ट म्हणजे मी अवांतर वाचन कोणत्याही फायद्यासाठी,करीयरसाठी किंवा कुठल्याही प्रसिद्धी साठी करत नाही.मी वाचतो फक्त एका आयुष्यात असंख्य आयुष्य जगण्यासाठी.करियर वगैरेची मला चिंता नाही.माझ्यासाठी तोच माझा करियर असेल ज्या मध्ये मला सुकून आणि शांती मिळेल..बाकी वाचनाने मला सुकून आणि शांती मिळते नि यासाठीच मी वाचत असतो आणि कायम वाचत राहणार.आणि वाचलेलं जगत राहणार व समाजात पेरत राहणार आहे.मी वाचनासोबत अजिबात Compromise करू शकतं नाही,कारण पुस्तकांनीच आजपर्यंत मला मार्गदर्शन केलं आहे मला एक नवी दिशा दिली आहे.माझ्या आयुष्यात पुस्तकाचा वाटा फार मोठा राहिला आहे.पुस्तकांनीच मला आज एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.पुस्तकांवर मनापासून केलेल्या प्रेमानेच मी आज 'स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार "या पहिल्या वहिल्या वाचकाला देण्यात येणाऱ्या पुरस्काराचा मानकरी ठरलो.

मी वाचलेल्या पुस्तकामुळेच हालाकीच्या परिस्थितीतुन येऊन सुद्धा योग्य मार्गावर मार्गक्रमण करतोय.आजपर्यंत मी असंख्य पुस्तके वाचली आणि माझ्या "स्टडी बंकर"मध्ये संग्रही करून ठेवली आहे.'स्टडी बंकर'माझा वयक्तिक ग्रंथालय असून मी तो आजूबाजूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खुला केला आहे.जेणेकरून इतरांना सुद्धा वाचायला वाचनीय पुस्तके मिळावी आणि वाचनाची आवड लागावी. तर एकंदरीत वाचनामुळे माझ्या आयुष्यात अनेकप्रकारे कमालीचं परिवर्तन आले.

मी वाचनाकडे वळलो ते एका निमित्ताने.तो निमित्त म्हणजेच जब्बार पटेल दिग्दर्शित 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर' हा चित्रपट.या चित्रपटामुळेच डॉ.आंबेडकरांचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला.यामध्ये त्यांचे अभ्यास आणि पुस्तकांवर प्रेम बघून माझ्या मनात सुद्धा वाचनाची इच्छा निर्माण झाली.'तेव्हा अजिबात विचार केला नव्हतं की मला वाचनाची एवढी आवड लागेल.आमच्या संपूर्ण पिढीत शिक्षण आणि वाचनासोबत दूर दुर पर्यत कोणाचाही संबंध नव्हता.'खापर पंजोबा पासून तर पालकांपर्यंत सर्वंच अशिक्षित. यापैकी कोणीही शाळेची पायरी सुद्धा ओलांडलेली नव्हती.त्यामुळे मला वाचनाची आवड लागेल असं कोणीही कधीही विचार केला नव्हता.
मला वाचण्याची आवड निर्माण झाली ती इयत्ता सातवी पासून आणि ती सुद्धा एका चित्रपटामुळे. पहिली ते सातवी पर्यत माझं आयुष्य बघता तो पूर्ण अंधकारात होता.

डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यावर पुन्हा कुठं काही नवीन वाचायला मिळतंय का? याचं मी शोध घेत होतो. एकेदिवशी तालुक्यातल्या बस स्टँडवर माझ्या हाती दहा रुपये किमतीच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र’ हे छोटेखानी पुस्तक पडलं आणि मी तो वाचून पूर्ण केलं.माझ्या आयुष्यातील हे पहिलं खरेदी केलेलं पुस्तकं होतं.आता इथूनच मला पुस्तकांची आवड लागली.मी आता बाबासाहेबांच्या सोबतच अनेक इतर महापुरुषांबद्दल सुद्धा वाचायला सुरुवात केली.शिवराय,महात्मा फुले,शाहूमहाराज,महात्मा गांधी,भगत सिंह,सुभाषचंद्र बोस इत्यादी.महापुरुषांबद्दल मी मिळेल ते वाचून काढलं,त्यांना समजून घेण्याचं प्रयत्न केलं. ग्रंथालय सारखं काही प्रकार असतो हे माहिती झाल्यावर मी गावातील व आजूबाजूच्या ग्रंथालयात जाऊन काही पुस्तके वाचली.आणि वेगवेगळी पुस्तकं जमवायला सुद्धा सुरुवात केली.

सुरुवातीला मी बसस्टँड वरून छोटेखानी पुस्तके विकत घेतली. त्यामध्ये शेखचिल्ली, हातीमताई,छान छान गोष्टी,चंपक,अकबर बिरबल,पंचतंत्राच्या गोष्टी,चंपक, ठकठक आणि इतर काही पुस्तके समाविष्ट होती.पुढे मी माझा पुस्तक वाचनाचा आवाका वाढवायचं ठरवलं आणि आठवीत असताना "अग्निपंख"हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. 'अग्निपंख'वाचल्यानंतर मला वाचनाचा जणू वेडच लागलं आणि मी जमेल तशी पुस्तके खरेदी करूनच वाचायला सुरुवात केली.अनेक वेगवेगळी पुस्तकं वाचून काढली.बघता बघता माझ्याजवळ बराच पुस्तकांचा संग्रह जमा झाला.अनेक पुस्तके मी वाचून संपवली.आणि पुढे अशाप्रकारे माझं पुस्तकांचं वेड दिवसागणिक वाढतच गेलं. पुस्तकासोबत चांगलीच गट्टी जमली. पुस्तकं हेच माझे खरे मित्र झाले.मी पुस्तकांसाठी वेगळं गुल्लक बनवून फक्त आणि फक्त पुस्तक खरेदीसाठी पैसे जमवायला सुरवात केली. वाचवलेल्या पैशांतून पुन्हा अनेक पुस्तकं खरेदी केली.
अशाप्रकारे शून्यातून सुरवात करून आणि डॉ. बाबासाहेबांचा आदर्श घेऊन माझं एक छोटंसं पुस्तकांचं ग्रंथालय निर्माण केलं.

‘जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल.’ बाबासाहेबांच्या या वाक्यानं प्रेरीत होऊन माझ्यासारख्या तळागाळातल्या वाचकांपर्यंत पुस्तकं पोचवण्याची आणि ती वाचायला प्रवृत्त करण्याची जबाबदारी घेऊन ‘वुई रीड’सारखा उपक्रम सुरू केला आणि आता सुद्धा सुरूच आहे.
अशातच विविध सोशल मीडियावर मी वेगवेगळ्या पुस्तकाबद्दल त्याचे अनुभव शेअर केले आणि करतोय.

मी एक खुप सामान्य वाचक आहे.जो फक्त जगावं कसं आणि समाजात नेहमी माणूस बनून कसं राहावं ?यासाठी वाचत असतो.वाचलेलं जगायचं प्रयत्न करत असतो.आजपर्यंत वाचलेल्या पुस्तकांवर अंमलबजावणी केली आहे. मार्गदर्शन करणारं आजूबाजूला कोणीही नसल्याने पुस्तकांनीच आजपर्यंत मला योग्य मार्गदर्शन केलंय.

मी आजपर्यंत बरंच काही वाचलेलं आहे आणि वाचतोय.जेवढं सुद्धा वाचलं आहे ते कमालीचं होतं.
त्यातून खूप काही शिकलोय, जगलोय आणि घडलोय.आजपर्यंत वाचलेल्या पुस्तकांमुळेच मी आज 2 शब्द लिहू शकतो, व्यक्त होऊ शकतो.माझी वाचन ही प्रक्रिया कधीही न संपणारी नाही किंवा संथ होणारी नाही..वाचन रोज सुरूच आहे..दररोज 40 पृष्ठे वाचण्याचा माझा टार्गेट असतो, तो मी रोज पूर्ण करण्यावर भर देतो.वाचनाला मी 'मानवी चौथ्या मूलभूत गरजेत' समाविष्ट केले असल्याने माझं वाचन हा नियमितपणे होतं असतो.एका आठवड्यात दोन तर महिन्यात 8 पुस्तके मी वाचून पूर्ण करण्यावर भर देतो.पुस्तके फक्त वाचतच नाही त्यावर मनन चिंतन करून अंमलबजावणी सुद्धा करतो.🖤

एकंदरीत वाचनाने काय दिलं तर वाचनाने कमालीची Maturity दिली...कधी,कोठे काय बोलावे ?आणि काय बोलू नये ?ही समज दिली.समोरच्या व्यक्तीचं शांतीने पूर्ण ऐकून घेण्याचं धैर्य दिलं. Negative टिकेला सकारात्मकतेने कसं घ्यायचं हे शिकवलं.समोरच्याला अजिबात न दुखवता सुद्धा कसं जगायचं हे शिकवलं.मत्सर,द्वेष,दुसऱ्यासोबत तुलना,अहंकार,स्वार्थ वगैरे वगैरे इतर काही गोष्टी वाचनाने आता अजिबात नाहीशा झाल्या..वाचनाने कमालीचं मार्गदर्शन केलं आहे आणि करत आहे..वाचनाने विश्वाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दिलं आहे.

चांगल्या पुस्तकं वाचनाने फक्त प्रेमच शिकवलं आहे.'शब्दांत व्यक्त करण्यापलीकडे चेंज झालोय.'पुस्तकांनी प्रेमळ,करुणामय,सकारात्मक नि भावनिक बनवलं आहे.'नकारात्मक गोष्टींत सुद्धा आता काहीतरी सकारात्मकच दिसतं आहे..'आजूबाजूला प्रेम दिसतोय,द्वेष करणाऱ्या नि पेरणाऱ्यांचा आता अजिबात राग येत नाही,येते फक्त त्यांची किव नि दया.त्यांच्याबद्दल वाईट वाटतं नाही आता.

'पूर्वी जे काही वाटायचं आता ते वाटतं नाही,'स्वतःमध्ये कमालीचं परिवर्तन आलेलं अनुभवतोय.'जे शब्दांत व्यक्त करण्यापलीकडे गेलं आहे.प्रत्येक पुस्तकं वाचल्यानंतर मी तो नसतो जो पुस्तकं वाचण्याआधी होतो.'प्रत्येक पुस्तकं काहीतरी देऊन जातं नि शिकवून जातं.'हे शिकलेलं आयुष्यात Implement करतो नि पुढील कामाला लागतो....🖤

©️Moin Humanist🌱

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼