श्यामची आई 💜

रात्री अखेर 'श्यामची आई'हे पुस्तक पुन्हा एकदा वाचून पूर्ण केलं.'श्यामची आई' वाचताना जणू मीच श्याम झालो होतो..'यशोदा' आई कडून 'बहुमोलाचे संस्कार नि जीवनोपयोगी तत्वज्ञानाची शिदोरी घेऊन परतल्याची भावना माझ्या मनात दाटून आली आहे.'आतापर्यंत हे पुस्तकं मी किमान चार वेळा वाचलं नि प्रत्येक वेळी मला या पुस्तकाने खूप काही नवीन नि चांगलंच दिलं.'प्रत्येक वाचनातून मला काही नवीन समजलं-उमजलं नि दरवेळी मी अधिकच समृद्ध झालो आहे.

'माणसांपासून तर पक्षी,प्राणी,झाड नि फुलांवर सुद्धा नुसतं नितळ प्रेम करायला या आईने मला शिकवलं."तळव्याला माती लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला माती लागू नये म्हणून सुद्धा जप"ही बहुमोल शिकवण मला यातून मिळाली.

हे पुस्तक वाचताना मी स्वतः श्यामच्या मुखातून प्रेमळ यशोदा आईच्या आठवणी ऐकून आलोय असं मला वाटतं आहे.'या पुस्तकाच्या प्रवासात मी कितीवेळा रडलो नि किती काही शिकलो असेल हे शब्दांत मांडता येणारे अजिबात नाही.'श्यामने'सांगितलेल्या प्रत्येक आठवणीतून आयुष्य नि विश्वाकडे बघण्याची नवीन स्वच्छ दृष्टी मला मिळाली असं मी म्हणू शकतो.या पुस्तकाने माझे डोळ्यांनाच नव्हे तर काळजाला सुद्धा पाझर फोडले.

'माझे डोळे नि हृदय हे वाचून कोरडे राहिले नाही या गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे.मी हे पुस्तकं वाचण्याआधी जसा होतो वाचल्यानंतर मात्र तसा राहिलो नाही.'या आईने दिलेले संस्कार मी आयुष्यात उतवण्याचं प्रयत्न करणार हा वचन मी मनातुनच आईला दिला आहे.

'नाशिकच्या'तुरुंगात असताना अवघ्या 5 दिवसांत 'साने गुरुजींनी'लिहून पूर्ण केलेल्या या पुस्तकात एकूण 42 रात्री आहे.'या प्रत्येक रात्री श्यामने 'यशोदा आई'च्या आठवणी आपल्या मित्रांना सांगितल्या आहेत.ज्या ऐकताना/वाचताना आपण सुन्न,स्तब्ध नि फार भावनिक होऊन जातो.'प्रत्येक गोष्टींतून मातेचे नितळ प्रेमच झळकतं असते."मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यसूत्र आहे.त्याबरोबरच सुसंस्कृत व बालबोध घराण्यातील साध्या,सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे".जे फार वाचनीय नि खूप काही शिकवून जाणारे आहे..!

शेवटी,

साने गुरुजींच्या हृदयात त्यांच्या मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम,भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना हे पुस्तकं वाचताना आपल्याही हृदयातही उत्पन्न होतात हे मात्र खरं !

मला आवडलेले नि भावलेले निवडक....💜

1) प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही,जळू दिले नाही, त्याला पाणी घातले, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात, बालपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही.मनुष्य घेतो, तेच देतो.

2)पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे, असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुषमंडळी नसेल, तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे, हे गुण येतील, तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला, असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो, लग्न करून हेच साधावयाचे. लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो. स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजे विवाह होय.. अर्धनारीनटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे. स्वत: एकटी स्त्री अपूर्ण आहे. परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्ना दोन पूर्ण जीव जणू बनतात.

3)जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदयमंदिरातील सत्यदृष्टी दाखवीत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. ह्या सर्व बाह्य आकाराच्या आज जी दिव्य व भव्य सृष्टी असते, तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अती महत्त्वाची, जीवनाला सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे.

4) स्वतःच्या पायावर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो, परावलंबी कधी होऊ नको. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते, या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे."

5) या जगात नुसते प्रेम, केवळ दया असूनच भागत नाही, जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्ट ज्याच्या जवळ आहेत, त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ ; ज्ञानहीन प्रेम तेही फुकट : प्रेमज्ञानहीन शक्ति व शक्तिहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली; परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल, तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावयाचा. मजजवळ ज्ञान आहे; परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल, तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल, तर ते प्रेमही अपाय करील. एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे; परंतु त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी, याचे ज्ञान जर तिला नसेल, तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये, तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल! समजा, आईजवळ प्रेम आहे. ज्ञानही आहे; परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास; ज्ञान, म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन व बुद्धी या तिहींची वाढ जीवनात हवी.

©️Moin Humanist🖤

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼