बाप नावाच्या माणसाला 'वाढदिवस' वगैरे नावाचा काहीही दिवस नसतो.🖤
बाप नावाच्या माणसाला 'वाढदिवस' वगैरे नावाचा काहीही दिवस नसतो.🖤
हे मला आज समजतयं...
आज दुपारी माझं शरीर ऑफिस मध्ये असताना मन मात्र भूतकाळात चक्कर मारून आलं. कामात मनच लागतं नव्हतं आज, लॅपटॉप वर काम करताना मन मात्र भूतकाळात हरवलं होतं आणि मला एक नवीन जाणीव करून देत होत. ती जाणीव होती 'आईवडिलांप्रति असलेल्या जबाबदारीची आणि त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या त्यागाची.
आज वाढदिसानिमित्त अनेकांच्या शुभेच्छा येत आहेत. दरवर्षी येत असतात. मला आजही आठवतं, माझा वाढदिवस असला, की बाबा मला त्या दिवशी खर्चायला काही पैसे द्यायचे.ते इतके नसायचे की, एखाद्या पिझ्झा/बर्गर च्या हॉटेल मध्ये जाऊन मित्रांना पार्टी देता देईल, पण इतके जरूर असायचे की आपल्या मित्रांसोबत मनसोक्त 'भेल आणि पाणीपुरी'चा आस्वाद घेता येईल.
आजही आठवत राहतं. माझ्या वाढदिवसाआधी माझे
'बाबा' काही दिवस कामावरून खूप उशिरा घरी यायचे. मी त्यांना विचारायचो तेव्हा ते म्हणायचे, "आज काम जास्त असल्याने मालकासोबत जास्त वेळ लागला".
बारावीपर्यंत माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दिवसभर मित्रांसोबत वेळ घालवणे, फिरणे, धमाल करणे इत्यादी मौज मज्जा करण्यातच माझा संपूर्ण दिवस निघून जायचा. तो दिवस मला 'ऑफिशियल' सुट्टी असल्यासारखं वाटायचं.
मला नेहमी वाटायचं की, बाबांनी सुद्धा या दिवशी कामावरून सुट्टी घ्यावी, दिवसभर कुटुंबाच्या सोबत राहावं, पण तो दिवस काही आला नाही. एवढंच काय ते कधी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा घरी राहिलेले मला आठवतं नाही.
बाबांचा वाढदिवस आला की मी आणि माझे मित्र मिळून बाबांसाठी सायंकाळी 'केक' आणायचो. मित्रांसमोर माझ्या आनंदासाठी त्यांना ते आवडतं नसलं तरीही केक कापायचे. मग हळूच कोपऱ्यात घेऊन मला म्हणायचे की,
"एवढे पैसे कशाला खर्च केलेस ? 'तुला माहिती आहे ना की एक रुपयाला किती मेहनत करावी लागते. या पैशात तू तुझ्यासाठी काहीतरी घेऊ शकला असतास ना ? एखादं पुस्तक किंवा इतर काही ! पुढच्या वेळी अस काही करू नको बाबा, पैसे स्वतः वर खर्च करत जा."
त्यांचे हे वाक्य माझ्या डोक्यात नेहमी फिरत असतं.
'अर्धी बटनं तुटलेली शर्ट वापरणारा माझा बाप तर फाटकी साडी नेसणारी माझी आई,' मला राजा म्हणून जगता यावं, यासाठी खूप धडपड करायचे. राबराब राबायचे. या दोघांनी घेतलेल्या कष्टांमुळेच, मी आज आयुष्यात इथपर्यंत पोहोचू शकलो. त्यांच्या शिवाय हा प्रवास अशक्य होता.
आज माझा वाढदिवस असताना देखील प्रथमच मी पूर्वीप्रमाणे 'ऑफिशियल' सुट्टी' वर नाही. जबाबदारीच्या ओझ्याने मला ती घेता आली नाही.
आज सुद्धा मी ऑफिस ला आलो आहे. 'लॅपटॉप 'वर आज 'Government of India' च्या 'Policy' चा अभ्यास करताना, मागील 24 वर्षात माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी केलेली प्लॅनिंग आणि माझ्या विकासासाठी डिझायन केलेल्या 'policy' हे सगळ डोळ्यासमोरून जात आहे.💝
खरंच ! आपल्या आईवडिलांसारखं कोणीही जगात नसतं. त्यांनी आपल्या लेकरांसाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव होणे हे फार महत्वाचं असतं. स्वतःकितीही दुःखात असताना आपल्या पिल्ल्यांच्या चेहऱ्यावर स्मित आणण्यासाठी ते जिवाचं रान करतात. आपल्यावरील जबाबदारी पासून ते पळून जातं नाही तर ती जबाबदारी बखुबी निभावतात. आपल्या आयुष्याची महत्वपूर्ण वर्षे ती आपल्या लेकरांसाठी घालवतात, लेकरांच्या माथ्यावर सावली यावी यासाठी ते उन्हाचे चटके सोसतात.
आज प्रामुख्याने आईवडिलांची खूप आठवण येतं आहे. त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव होतं आहे. आज मन आठवणीत रमतयं,आजपर्यंतचा प्रवास डोळ्यासमोरून जातं आहे आणि एका गोष्टीचं खूप आनंद होतं आहे. ती ही की ,
'आतापर्यंत आईवडिल आपल्यासाठी जगले आता आपण त्यांच्यासाठी जगायचं,आपल्यासाठी काटेरी वळणावर चालत असताना त्यांच्या पायात खुडलेले काटे आता आपण काढायचे,त्यांना आयुष्यात आजपर्यंत जो सुख मिळालं नाही त्यांना तो मिळवून द्यायचं...आजपर्यंत ते आपल्यासाठी उन्हाचे चटके सोसत होते आता आपण सोसायचे.
एकंदरीत त्यांना सर्वांत महत्त्वाचं द्यायचं आहे ते म्हणजे निव्वळ प्रेम आणि आपुलकी....कारण 'आयुष्याच्या या धावपळीत ते फक्त प्रेमाचेच भुकेले होते.💝
©️Harshal✍️
Apratim
उत्तर द्याहटवा