केदारनाथ 17 जून.........♥️


काही दिवसांपूर्वी प्रकाशनाच्या दुसऱ्याच दिवशी 'केदारनाथ' 17 जून ही डॉ.प्रकाश कोयाडे सरांची नवी-कोरी कादंबरी वाचून पूर्ण केली आणि पूर्णपणे यामध्येच हरवून गेलो.'सायकॉलॉजीकल थ्रिलर'जॉनरा असलेल्या या कादंबरीची मोहिनी ज्याप्रकारे माझ्या मनांवर चढली होती ती उतरायचं नावचं घेतं नव्हती.मी पूर्णपणे यातील कथानकाचा एक भाग झालो होतो.यातील नायकासोबत संवाद साधून नि त्याचं बोटं धरून हा 'रोमहर्षक' प्रवास करून आल्याची फीलिंग माझ्या मनात निर्माण झाली.

आयुष्यात आजपर्यंत कधीही 'केदारनाथ किंवा पहाडी' भागात गेलेलो नाही, पण या कादंबरीतून मला तेथे जाऊन आल्याचा अनुभव आला.जणू मी माझ्या डोळ्याने हे सर्व घडताना बघितलं किंवा बघून आलोय असं मला वाटतं आहे.

डोकं सुन्न करून सोडणाऱ्या व आपल्या पानापानांतून वाचकाला 'कुठल्याही परिस्थितीत जगण्याचं बळ देणाऱ्या या कादंबरीचा प्रवास एक अफलातून अनुभव ठरला माझ्यासाठी."कोणत्याही परिस्थितीत मरायचं नाही,तर जिवंत राहायचंच' या प्लॉटवर आधारित असलेली ही कादंबरी वाचकाला एक नवीन ऊर्जा देऊन जगण्याची उर्मी देऊन जाते.

 "सर्वकाही संपल्यावर सुद्धा पुन्हा शून्यातून सुरुवात करता येते" हा आत्मविश्वास देते !

सुरुवातीच्या पहिल्या 'पृष्ठापासून शेवटच्या पृष्ठापर्यत' वाचकाला पूर्णपणे गुंतून ठेवणारा अप्रतिम कथानक आणि पावलोपावली दिलेले जीवनोपयोगी 'तत्वज्ञान'या कादंबरीचं जीव की प्राण आहे.जीवन व निसर्गाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन या कादंबरीने मला दिला, तर विविध छोट्छोट्या प्रसंगातून माणुसकीचे दर्शन घडवून "'कुठल्याही परिस्थितीत 'माणुसकी सोडायची नाही,माणूस म्हणूनच शेवटपर्यंत जगायचं'हा महत्वपूर्ण संदेश दिला !

कथानकाबद्दल...💙

17 जून 2013 साली 'उत्तराखंड येथील 'केदारनाथ'खोऱ्यात आलेल्या 'महाप्रलयावर'या कादंबरीचं कथानक बेतलेला आहे.10 वर्षांपूर्वी निसर्गाने दाखवलेल्या रौद्ररूपाने संपूर्ण देशाला हादरून सोडलं होतं. बघता बघता काही क्षणातच हजारो लोकांना या महाप्रलयाने 'यमसदनी' धाडलं होतं.त्या काळी घडलेल्या एका खऱ्या घटनेवर ही कादंबरी आधारित आहे.

पुण्यातील 'सायकॅट्रीस्ट' असलेल्या डॉ.सिद्धार्थ ची ही एक विलक्षण आणि रोमहर्षक कथा आहे. सिद्धार्थ आपल्या छोट्याश्या कुटूंबासोबत म्हणजेच पत्नी 'प्रणया' व  आपल्या 3 वर्षीय लहान बाळासोबत आनंदाने जगत असतो.एक छोटा आणि समाधानी कुटुंब असतो त्याचा.

एकंदरीत असंच सर्वकाही सुरळीत चाललेलं असतं...🌱

अशातच एकेदिवशी 'प्रण्याने' त्यांना 'मुल होण्यासाठी' महादेवांला काही वर्षांपूर्वी केलेल्या नवसाच्या पूर्ततेसाठी ते 'केदारनाथ' ला दर्शनासाठी जायचं ठरवतात आणि सर्वकाही नियोजन करून'केदारनाथ बाबाच्या'दर्शनाला निघतात.'डेहराडून' येथे सिद्धार्थ त्याचा मित्र 'श्रेयस' व त्याच्या कुटुंबाला सोबत घेऊन आधी 'ऋषिकेश' ते नंतर 'केदारनाथ'ला पोहोचतात.

'केदारनाथ'ला पोहोचण्याआधीचं वातावरण फार खराब झालेला होता.सारखा पाऊस सुरू असतो.16 जून ला ते  केदारनाथ येथील एका हॉटेलवर वास्तव्य करतात.सकाळी 17 जून ला त्यांना 'केदारनाथ बाबाचे'दर्शन होणारे असतात,त्यांचा स्वप्न पूर्ण होणारा असतो.

पण येथे नियतीने त्यांच्या नशिबी काही वेगळंच लिहून ठेवलेलं असतं.ज्याची त्यांना थोडीशी सुद्धा कल्पना नसते.

17 जून 2013 ची सकाळ उगवते.पाऊस सारखा सुरुच असतो.चोहीकडे शांतता पसरलेली असते.'मंदाकिनी'वेगाने वाहत असते आणि अचानकपणे कानठळ्या फोडणारा मोठा आवाज होतो.त्यांच्या पायाखालची जमीन थरथरते.प्रचंड पावसामुळे 'भूस्खलन' झालेलं असतं, आजूबाजूच्या परिसरात झालेल्या भूकंपाने प्रचंड मोठी आपत्ती आलेली असते.
केदारनाथ खोऱ्यात तो भयंकर 'महाप्रलय'आलेला असतो.

बघता बघता हा महापूर सर्वकाही नष्ट करतो.सर्वांना आपल्यासोबत घेऊन जातो.आजूबाजूला काहीच उरलेलं नसतं.निसर्गाने रौद्र रूप धारण केलेलं असतं, महादेवाने आपला तिसरा डोळा उघडलेला असतो.एकाच फटक्यात निसर्गाने " माणूस त्याच्या पुढे किती शूद्र आहे" हे दाखवून दिलेलं असतं.

सर्वकाही संपलेलं असतं...

महापूर येऊन 3 दिवस झालेले असतात.चोहीकडे चिखलाचा थर आणि आजूबाजूला मृतदेहाचा सडा पडलेला असतो.या सडलेल्या,कुजलेल्या मृतदेहाच्या खचामध्ये एक 'मनुष्य' जिवंत असतो.हा एकच मनुष्य त्या भयंकर महाप्रलयातून वाचलेला असतो.प्रचंड जख्मी झालेला व उजव्या पायात लाकडी फासळी घुसलेला हा मनुष्य दुसरा तिसरा कोणी नसतो तर तो या कथेचा नायक 'सिद्धार्थ'असतो.

ज्याचं सर्वकाही संपलेलं असतं. त्याची प्रिय पत्नी,लहान बाळ त्याचा मित्र सर्वकाही क्षणातच त्याला सोडून गेलेले असतात.त्याचा आयुष्य काहीच क्षणार्धात बघता बघता उध्वस्त झालेलं असतो.आता तो एकटाच जिवंत राहिलेला असतो.पुढचं मागचं त्याला काहीच दिसतं नसतं,त्याच डोकं बधिर झालेलं असतं.

नेमकं आता जगायचं कशासाठी ? 

हाच एक प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभं होतं.जिवंत राहण्याचं काही एक कारण त्याच्याजवळ शिल्लक राहिलेलं नव्हतं.असंख्य वेगवेगळे प्रश्न मेंदूत गिरक्या घालतं असताना या सर्व प्रश्नाचं एकच उत्तर त्याच्यासमोर होतं.

तो शेवटचं उत्तर म्हणजेच 'आत्महत्या !'

सिध्दार्थ आत्महत्येचा निर्णय घेतो.

कारण,

"जेव्हा सगळं संपतं तेव्हा तीन गोष्टींच्या आधाराने पुन्हा उभा राहाता येऊ शकतं...कुटुंब, मित्र आणि आशेचा किरण !

सिद्धार्थ यापैकी सगळंच हरवून बसला होता.त्यामुळे तो  एका उंच टेकडीच्या वरी जाऊन आत्महत्या करायचं ठरवतो.टेकडीवरून तो खाली 'मंदाकिनीत' समाविष्ट होण्याच्या तयारीत असतानाच त्याला,नदीच्या पलीकडे एक आशेचा किरण दिसतो.

हा एक आशेचा किरणच त्याला 2 पावले मागे आणतो,आत्महत्येपासून परावृत्त करतो.आणि येथूनच सुरुवात होते एका आगळ्या वेगळ्या'संघर्षमय आणि रोमांचक' प्रवासाची.अंगावर शहारे आणणाऱ्या व उत्कंठावर्धक सफरीची.जो शब्दांत व्यक्त करता येणारा मुळीच नाही.'सिद्धार्थ चा हा पुढील जीवघेणा आणि पावलोपावली माणुसकीचे दर्शन करून देणारा,जीवनोपयोगी तत्वज्ञान देत,कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहण्याची शिकवण देऊन; आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या वाचकांना एक नवीन  उर्मी देणारा प्रवास प्रत्येक वाचकाने या अप्रतिम कादंबरीतूनच वाचावा.

यापुढील सिद्धार्थचा जगण्यासाठीचा हा प्रवास आणि या प्रवासात त्याला आलेले विलक्षण अनुभव लेखकांनी ज्यापध्दतीने शब्दबद्ध केले आहेत,त्यासाठी लेखकांना सलाम.

'सिद्धार्थच्या' या प्रवासाचा एक भाग बनून, त्याचं बोट धरून हा 'समृद्ध करणारा' प्रवास करून यायला हवं,असं मला प्राणनिकपणे वाटतं.ही कादंबरी फक्त वाचू नये तर जगावी-अनुभवावी.यातून खूप काही चांगलं घ्यावं आणि आपल्या  आणि इतरांच्या आयुष्यात ते पेरायचं प्रयत्न करावं.

ही कादंबरी एक नवी दिशा वाचकांना दाखवते.कोणाला आपल्या आयुष्यातील त्रास आणि दुःख फार मोठे वाटतं असतील त्यांनी ही कादंबरी वाचावी.'आयुष्याला कंटाळलेल्या व्यक्तीला ही कादंबरी नव्याने सुरुवात करण्याची हिम्मत देईन एवढं नक्की.

मला कादंबरीतील आवडलेली काही वाक्ये.....♥️

1)'जगातील सुंदर गोष्टींची जर यादी केली तर सर्वात वर असेल नुकतंच उमललेलं फुल... आणि त्यापेक्षाही सुंदर फक्त एक गोष्ट असेल ती म्हणजे आईचं प्रेम, जे कोणत्याच यादीत बसणार नाही!'

2)“हे बघ बाळा... मला माहीत नाही की तुझं पुढचं भविष्य काय असेल पण एक गोष्ट लक्षात ठेव... माणूसकी सोडायची नाही! कुठेही जा, काहीही हो. जीवनात जे करायचं ते कर पण माणूस म्हणून! मी शेवटपर्यंत माणूस बनण्याचा प्रयत्न केला... तू सुद्धा कर!"

3)कधीकधी आपल्याला कुठे जायचं आहे यान काल विशेष फरक पडत नाही पण आपल्यासोबत कोण आहे याने भरपूर फरक पडतो!

4) खरा गिर्यारोह तो नसतो जो केवळ डोंगर पार करतो... तो असतो जो स्वतःच्या मर्यादा पार करतो! 

5)'अन्नाची चव फक्त जिभेला कळते... पोटाला नाही!

6)“ज्या गोष्टीची तुला भिती वाटते ती गोष्ट मुद्दामहून करायची आणि पुन्हा पुन्हा करत राहायची. हा त्या भीतीवर विजय मिळविण्याचा सर्वात खात्रीशीर पर्याय आहे! एखाद्या गोष्टीची भिती वाटणं यात लाजण्यासारखं काहीच नसतं... आपण त्याला सामोरं कसं जातो हे सर्वात महत्त्वाचं!”

7) स्वतःचा मृत्यू समोर दिसत असताना दुसऱ्याच्या जगण्यासाठी प्रयत्न करणारा तो अवलिया बघून त्याच्या मनाला उभारी आली.

8) 'निसर्ग जेव्हा एका बाजूला तुमच्यासाठी खडतर रस्त्याचे नियोजन करतो त्याचवेळी दुसरीकडे तुमच्या पायात तेवढेच मजबूत बूट मिळवून देतो!'

9)नियती सदैव आपल्या सोबत असते! जेव्हा वाटतं की, मी एकटा संकटात आहे तेव्हा नियती आपल्याआधी त्या संकटात उतरलेली असते! आपल्या सोबत उभा राहते, आपल्या सोबत चालते! कितीही वाईट परिस्थिती येवो नियती साथ सोडत नाही... फक्त विश्वास ठेवता आला पाहिजे!

10)चेहरा नेहमी सूर्याच्या दिशेने ठेवायचा ज्यामुळे तुम्हाला सावली कधीच दिसणार नाही.'

11)खरंतर नियतीनं आपल्याला निवडलेलं नसतं, आपण नियतीला निवडत असतो !

12)जगात कुठलीच गोष्ट विनाकारण होत नसते. प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि ते कारणच गोष्टी बदलत असते. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कुठेना कुठे जुळलेली असते!

13) माणूस क्षणोक्षणी आशेवर जगत असतो, भविष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणांकडून काहीतरी चांगलंच मागत असतो. 

14)'आपण हरलो आहोत..!'
ही भावनाच भयंकर असते. माणसाला आजच्यापेक्षा उद्याच्या दिवसाकडून जास्त अपेक्षा असतात. भविष्यकाळ हा चांगलाच असतो ही भावना असते! 

15)खरंतर प्रत्येक क्षण हा एक धोकाच असतो... मनासारखं झालं तर चांगलं वाटतं आणि मनाविरुद्ध झालं की त्याला 'धोका झाला' हे नाव चिटकवलं जातं. ही झाली या आपत्तीमधली गोष्ट पण दैनंदिन सर्वसामान्य आयुष्य जगतानाही आपल्या आयुष्यात क्षणाक्षणाला धोका असतोच की! मृत्यूचे प्रसंग आपल्या आयुष्यात दररोज येत असतात, फक्त आपण मरत नाही म्हणून त्याचं काही विशेष वाटत नाही.

'एखादी गाडी एकदम आपल्या जवळून जाते, एखाद्या जुन्या पडायला आलेल्या इमारतीच्या खालून आपण निघून जातो, बऱ्याच गोष्टी घडून जातात ज्याचं आपल्याला काही विशेष वाटत नाही. खरंतर आपल्याला मृत्यू येत नाही म्हणून आपण ती गोष्ट विसरूनही जातो. एखाद्याचं दुर्दैवं असतं... मृत्यू होतो!'

'धोका क्षणोक्षणी असतो!'

©️Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼