अन्न हे अपूर्णब्रह्म ♥️
काही दिवसांपूर्वी 'शाहू पाटोळे' सरांच 'अन्न हे अपूर्णब्रह्म'हे फार महत्वपूर्ण विषयावरील 264 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तकं वाचून समजून-उमजून घेतलं.
'बहुजनांच्या' विशेष करून 'पूर्वाश्रमीचे महार अन् मांग'या दोन जातीच्या खाद्यसंस्कृतीवर लेखकांनी या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे.गावकुसाबाहेर जगणाऱ्या या दोन जातीच्या एकूण खाद्य जीवनाचा धांडोळा यात मांडला आहे.या जाती जशा उपेक्षित होत्या तशीच त्यांची खाद्यसंस्कृती सुद्धा उपेक्षित राहिली होती.या जातींतील मुख्य-प्रमुख आहार शब्दबद्ध करण्याचा आणि सामाजिक,धार्मिक श्रेणीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न यातून लेखकांनी केला आहे.
लहानपणापासून 'जीवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥'हा श्लोक ऐकत आलोय.पण खरंच' अन्न हे पूर्णब्रह्म'आहे का ? जोपर्यंत यामध्ये शेवटच्या घटकाच्या 'खाद्य व अन्नाचा' इतिहास विचारात घेतल्या जाणार नाही तोपर्यंत हे पूर्णब्रह्म कसं होईल ? आणि याच भूमिकेतून या पुस्तकाचं नाव 'अन्न हे अपूर्णब्रह्म'.
लेखकाच्या मते:-
या जातीत जन्मलेल्यांना यात नाविन्य,थ्रील वाटणार नाही.पण याच जातीतील 1972 च्या दुष्काळानंतरच्या शहरी पिढीला हे नवीन वाटण्याची शक्यता आहे.त्यासोबतच या लेखनामागचा उद्देश:
" शाकाहाराचा प्रतिवाद वा मांसाहाराचे समर्थन करणे हा नसून अतार्किकपणे, कर्कश्शपणे, धर्माचा आधार प्रामाण्य मानून खाण्यावरून लोकालोकांमध्ये जे आजही भेदभाव करतात, त्यांना 'आम्ही' कोण आहोत हे कळावे; हाही आहे."
आजपर्यंत खाद्यसंस्कृतीविषयी चर्चा करीत असताना.केवळ उच्चवर्णीय ते मध्यमवर्गीय यांच्याच खाण्यापिण्या व स्वयंपाकाच्या पाककृतींबद्दल चर्चा केली गेलेली आहे.आहार दृष्ट्या हिंदू धर्मातील'चातुर्वरण्याच्या पलीकडे असणाऱ्या पाचव्या वर्णातील 'महार आणि मांग'या जातीच्या खाद्यसंस्कृतीबद्दल कोणीही चकार शब्द काढायला तयार नव्हतं.याच धर्मातील इतर वर्णाच्या 'आहार आणि खाद्यसंस्कृतीबद्दल' आजपर्यंत बरंच काही लिहलं/बोललं गेलं आहे,पण याच धर्मातील एका 'वर्ण'शुद्रातिशूद्र'च्या खाद्यसंस्कृतीबद्दल कोणीही बोलायला/लिहायला तयार नव्हतं .
ही "माणसं दररोजच्या जेवणात काय खात होती? त्यांच्या नियमित आहारात कोणकोणते पदार्थ होते ? ते कोणते सण, उत्सव साजरे करतात? सणावाराला कोणती पक्वान्नं बनवतात? पाहुण्या-रावळ्यांसाठी कोणता 'खास' बेत करतात? यांसारखे साधे प्रश्न कोणाला पडतं नव्हते."
मग पुढे सत्तरीच्या दशकात दलित साहित्य आले आणि. या साहित्याने मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाला हादरे देण्याचं काम केलं. दलित साहित्यात प्रामुख्याने गावकुसाबाहेर राहणाऱ्यांना उपजीविकेसाठी खाव्या लागणाऱ्या अन्नाचा उल्लेख आला.तेव्हा या समाजाची जगण्याची संस्कृती, स्थापत्य, कला आणि एक वेगळी खाद्यसंस्कृती सुद्धा असते, याची चर्चा व्हायला सुरुवात झाली.दलित साहित्यातील खाद्य जीवन आणि खाद्यसंस्कृती बद्दल वाचून अनेकांना याबद्दल माहिती मिळाली.
पण दलित साहित्यात उल्लेख असलेल्या दलितांच्या खाद्यजीवनाबद्दल व खाद्यसंस्कृतीचा कोणी सविस्तर मागोवा घेतला नाही किंवा संशोधनपर लेखन वगैरे कोणीही केलं नाही.दलित गावकुसाबाहेर राहिले तशी त्यांची खाद्यसंस्कृतीसुद्धा राहिली होती.
ही बाब लेखकांच्या लक्षात आली आणि त्यांनी बहुजनांच्या खाद्यसंस्कृतीचे दस्तावेजीकरण करायचे ठरवले व यातूनच या महत्वपूर्ण पुस्तकाची निर्मिती झाली.
हे पुस्तकं फार महत्त्वाचं दस्तावेज आहे.साध्या आणि सोप्या भाषेत उपेक्षित समाजाच्या खाद्यसंस्कृतीचं परिचय लेखकांनी करून दिलेलं आहे.'मराठी साहित्यात' एक अति महत्वाची भर लेखकांनी टाकली आहे.या विषयावर पुढील लिखाण करणाऱ्या अनेकांसाठी हे पुस्तकं संदर्भ ग्रंथाच काम करणारं आहे एवढं नक्की.✨
शेवटी यातील आवडलेला
एक उतारा येथे देतोय जो विचार करायला भाग पाडतो.♥️
लेखक म्हणतात :-
मुळात कुणी काय खावं ही ज्याची त्याची वैयक्तिक, खाजगी बाब आहे. सात्त्विक खाण्यामुळे माणूस 'सत्शील' बनत असता तर एतद्देशीय संस्कृतीत | जातिव्यवस्था आणि वर्णव्यवस्था कशाला टिकली असती? धर्माच्या नावावर शोषण आणि परावलंबित्व जोपासलं गेलं नसतं. माणूस काय खातो यापेक्षा तो इतरांशी आणि समाजात कसा वागतो, हे बघायला हवं. कोणत्याही आहाराचा गंड किंवा श्रेष्ठत्व बाळगण्यापेक्षा इतरांच्या जगण्यावर अजाणतेपणीही मर्यादा । येणार नाही, व्यक्तिस्वातंत्र्यावर कुरघोडी होणार नाही याची दक्षता बाळगणे हीच खरी संस्कृती आणि तोच खरा 'सात्त्विक'!
आवर्जून वाचा आणि संग्रही ठेवा....♥️
©️Moin Humanist♥️
अगदी खरं आहे की जोपर्यंत शेवटच्या घटकातील खाद्य व अन्न संस्कृतीचा इतिहास विचारात घेतला जाणार नाही तो पर्यंत अन्न हे अपूर्णब्रम्हच 👌👌
उत्तर द्याहटवा