झांबळ ✨💕
मार्च महिन्याची सुरुवात 'खुलूस'या कथासंग्रहापासून तर' एप्रिल' ची सुरुवात 'झांबळ' या नवाकोरा आणि अप्रतिम असा कथासंग्रहापासून झाली.समीर गायकवाड सरांची लेखणी आणि त्यांच्या 'लिखाणाला खरंच अजिबात तोड नाहीच'.वाचकांच्या हृदयाला स्पर्श करून,आपल्या लिखाणाने वाचकाला एकाच जागी खिळवून ठेवणारी समीर सरांची लेखणी सुन्न करून जाते.सरांच्या फेसबुक पोस्ट असो किंवा आता आलेली 'खुलूस आणि झांबळ' ही दोन्ही पुस्तके वाचकांना आपल्या प्रेमात पाडायचं काम करतात.संवेदनशील आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या या लिखाणातून माणसाला माणुसपण शिकायला मिळतो.
'झांबळ' वाचायला मी खूप उत्सूक होतो.
म्हणून हाती येताच वाचायला घेतलं आणि 2 दिवसांत वाचून पूर्ण सुद्धा केलं.यातील प्रत्येक कथेने आणि कथेतील माणसांनी मला जीवन आणि आजूबाजूला बघण्याचा नवीन दृष्टीकोन दिला,माणुसकीचे दर्शन घडविले तर नितांत मनापासून प्रेम करायला शिकवले.
या कथासंग्रहात एकूण 22 अप्रतिम आणि हृदयाचा ठाव घेऊन जाणाऱ्या कथा आहेत.ज्या आपल्याला अंतर्मुख करून जातात.यातील प्रत्येक पात्र आपल्या स्मरणात राहून जातो. जो हे पुस्तक संपल्यावर सुद्धा आपली पाठ लवकर सोडतं नाही.कितीतरी दिवस आपण त्याच विश्वात वावरतो.यातील माणसांचा शोध आपण आजूबाजूला घ्यायचो प्रयत्न करत राहतो एवढं नक्की.
'पाच रुपयांची नोट'पासून सुरू झालेला हा प्रवास 'जाईमावशी' या कथेपर्यत कधी येऊन पोहोचतो हे वाचताना कळतं सुद्धा नाही.वाचन सुरू केल्यावर आपण यातील प्रत्येक कथेचा एक भाग होऊन जातो.कथेतील प्रत्येक माणसाच्या सुखा-दुःखाशी आपण एकरूप होऊन जातो.लेखक म्हणतात ठीक त्याप्रमाणे "यातील कथा एकाच वेळी अतिव दुःख आणि अनामिक तृप्तता यांचा विलक्षण एकजिनसी अनुभव देऊन जातात.वाचकाला विचार करायला लावतात.प्रेम,आपुलकी,काळजी आणि मायेचा एक नवीन अर्थ आपल्या यातील कथेतील माणसं शिकवून जातात.
"कथासंग्रहातील काही कथा बऱ्यापैकी लघु स्वरूपाच्या आहेत तर काही थोड्याशा दीर्घ आहेत.या सर्व कथांमधला भवताल हा यातील घटना नि पात्रांइतकाच महत्त्वाचा आहे. किंबहुना त्यालाही काही संवादायचं आहे जे लेखकांनी त्यांच्या लेखणीतून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलं आहे.लेखकांच्या आयुष्यात वाट्याला आलेली हाडामासाची काही खरीखुरी माणसं आणि भवतालाच्या विश्वात दिसलेली काही माणसं यांचा यामध्ये त्यांनी मेळ घातलाय. अल्पशी निरीक्षणशक्ती, काही जाणिवा नि काही अनुभव यांच्या आधारावर हे लेखन त्यांनी साकारलंय" जे खरंच साहित्यात एक सुंदर मोलाची भर टाकण्यात यशस्वी झालं आहे.
या कथांत आपल्याला आपल्या अवतीभवती वावरणारी पण त्याचं वेगळेपण आपल्याला कधी न जाणवलेली माणसे भेटतील.लेखक म्हणतात त्याप्रमाणे की, "यातील माणसं अनेकार्थांनी घनदाट होती. त्यांच्यातली माणुसकी ओतप्रोत होती, मानवी जीवन मूल्यांवरचा त्यांचा विश्वास अफाट होता, त्यांची नाती अतूट मायेची होती आणि मुख्य म्हणजे अंधाराच्या उंबऱ्यावरच्या प्रकाशखुणा त्यांच्या भाळी होत्या. ही माणसं आपल्या अवतीभवतीच असतात तरीही त्यांच्यातलं वेगळेपण आपल्याला उशिराने जाणवतं. याबद्दलच्या लटक्या स्पष्टीकरणासाठी आपण पळवाटा शोधत राहतो तोवर ते निघून गेलेले असतात. मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या थेट वाटा उरत नाहीत, उरतो तो पश्चाताप! ही माणसं चराचरावर जीव लावतात आणि जीवावर उदार होऊन जगत काळाच्या ओघात लुप्त होतात. अशाच काही साध्यासुध्या पण घनदाट माणसांच्या गोष्टींचे हे पुस्तक.जे प्रत्येक वाचकाने वाचायला हवं.✨♥️
©️Moin Humanist✨
मी वाचलेली पुस्तके 🌱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा