थोडं मनातलं ♥️
आयुष्यात आजपर्यंत फक्त एकाच वेळी
तुटून पडलो त्याबद्दल व्यक्त व्हावं वाटलं.🌿
2017 ला 12th पास झालो.पुण्याला गेलो,काही कारणाने परत येऊन घरीच राहून अभ्यास करायचं ठरवलं.काकाच्या बंद पडलेल्या खोलीत स्वतःचा विश्व बनवलं.हाच आपला पहिला वहिला 'स्टडी बंकर'होय.2018 ते 2019 Cse चा मनापासून सर्वकाही विसरून अभ्यास केलं.अवांतर वाचन सुरूच होतं.
2019 च्या ऑक्टोबर मध्ये अनपेक्षितपणे आरोग्याने साथ सोडली आणि येथूनच मी मागे पडत गेलो.येथून अभ्यास बंद झाला.परत परत हॉस्पिटलमध्ये जाऊन अस्वस्थ वाटतं होतं त्यामुळेच एकटेपणाची सुद्धा जाणीव व्हायला सुरुवात झाली.गल्लीत जवळचा म्हणावं तसं कोणीही मित्र नव्हतं.होती ती फक्त 'अर्पिता' तिला बोलूनच थोडं छान वाटायचं.
आमचं एकमेकांवर खूप म्हणजे खूप प्रेम होतं.खूप काही वेगळी स्वप्ने बघितलेली होती आम्ही.
'Long Distance Relationship' असून सुद्धा आम्ही एकमेकांच्या जवळच होतो असं वाटायचं.एकंदरीत खूप भारी होतं आमचं नातं.पण परत परत आजारामुळे मी पूर्णपणे तुटलो होतो.माझं भविष्य अंधकारात दिसतं होतं.दिशा मिळतं नव्हती.समजून घेणारं आणि समजावून सांगणार कोणीही नव्हतंच.पाठीवर हात ठेवून लढ म्हणायला एखादा असा बॅकबोन नव्हताच याकाळात.
डिप्रेशन वगैरे म्हणतात ते हेच होतं बहूतेक. या काळात मला नेमकं काय वाटायचं हेच समजतं नव्हतं.कशातच रस नव्हतं, आत्महत्येचे विचार सतत मनात येऊन जायचे,बाहेर फिरावं वाटायचं,इतरांना बोलावं वाटायचं पण मनातलं बोलावं असं कोणीही जवळ नव्हतंच..याकाळात मला साथ होती ती फक्त माझ्या लाडक्या पुस्तकांची आणि सोशल मीडियाची.येथूनच मी वाचलेल्या पुस्तकांबद्दल व्यक्त व्हायला लागलो,बोलायला लागलो.याकाळात 'सोशल मीडियावर' मी जरा जास्तच ऍक्टिव्ह राहायला लागलो..वाचायचं,समजून घ्यायचं पुस्तकापासून शिकायचं पण त्यावर अंमलबजावणी काही होतं नव्हती.अभ्यास करावं वाटायचं पण मन काही लागायचं नाही.2020 मध्ये लॉकडाऊन लागलं आणि मी पुन्हा जास्तच गळून पडलो.
लॉकडाऊन मध्ये आजूबाजूच्या घटना बघून तर माझी अस्वस्थता पुन्हा वाढत गेली.घबराट व्हायची,जीव कासावीस व्हायचा.घरात राहून फक्त वाचायचो, चित्रपट-वेबसिरीज बघायचो आणि सोशल मीडियावर पुस्तकाबद्दल व्यक्त व्हायचो बस्स एवढंच आयुष्य उरलं होतं माझं.आईवडिलांना काहीच कळतं नसल्याने त्यांना काही आयडियाच नव्हती,की मी कोणत्या परिस्थितीतून जातोय.एकंदरीत अंधार दिसतं होता चोहीकडे.भविष्याचं काहीच खरं दिसतं नव्हतं.सर्व बघितलेली स्वप्ने एक एक कडून गळून पडायला सुरुवात झाली होती.
येथून मला आमच्या प्रेमाचा काहीच भविष्य दिसतं नव्हतं.कारण करीयरचं काहीच खरं दिसतं नव्हतं आणि मुख्य म्हणजे मला 'अर्पिताची' लाईफ खराब करायची अजिबात इच्छा नव्हती.आम्ही दोघांनी सुद्धा आपआपलं करीयर सेट करून 'आंतरजातीय विवाह' करायचं ठरवलं होतं. पण हा स्वप्न मला तुटताना दिसतं होतं.कारण आमच्या नात्यात सर्वात महत्वाचा अडथळा होता तो धर्म आणि जातीच.मला ठाऊक होतं स्वतःच करियर सेट केल्याशिवाय हे पूर्ण होणार नव्हतं. तेव्हा मला सर्वकाही अंधुक दिसतं होतं.म्हणूनच मी आयुष्यातील महत्वाचा निर्णय घ्यायचं ठरवलं आणि 'प्रेमातून सुटका करून घ्यायचं निर्णय घेतलं..
अर्पिता ला 'तू माझ्यासाठी स्वतःची लाईफ खराब करू नको'.'स्वतःच करियर सेट कर.माझ्यासाठी थांबू नको,माझ्या आशेवर अजिबात राहू नको.मला माझं भविष्य काहीच दिसतं नाही.त्यामुळे हा प्रवास येथेच थांबवूया'असं म्हटलं.तिने अपेक्षित नकार दिला.मी अनेक वेळा समजावलं पण ती काही समजून घेत नव्हती.तिने प्रत्येक बाबतीत मला साथ देण्याची हमी दिली.......पण खरंच मी तेव्हा पूर्णपणे तुटलो होतो.समजतं नव्हतं काय करावं ?कोणाला बोलावं ?निर्णय कसा घ्यावं ?याबद्दल कोणाला बोलू शकत नव्हतो आणि समजून घेणार तेव्हा आयुष्यात कोण होतं ?
एकंदरीत मी पूर्णपणे ब्लॅंक होतो.मला माहिती होतं सहजपणे ती हे स्वीकारणार नाहीच.कारण आम्ही प्रेम केलं होतं टाईमपास अजिबात नाही..….पण हृदयावर दगड ठेऊन मला तिला हे पटवून द्यावं लागलं.ती खूप रडायची पण इलाज नव्हताच माझ्याकडे.असेल सुद्धा पण तेव्हा तर दिसतं नव्हताच.Hope वगैरे म्हणतात ती काहीच नव्हती...चोहीकडे फक्त Darkness आणि विफलता दिसतं होती.प्रेम कमी झालं नव्हतं पण बोलणं मात्र कमी झालं होतं,तिचा कॉल यायचा मी इच्छा असताना सुद्धा स्वीकारायचो नाही,तुटकं फुटक बोलायचो आणि अशातच मी मध्येच माझा सिमकार्ड तोडून टाकलं आणि आमचा संपर्क तुटला.
आता माझ्या आयुष्यातील सर्वांत आवडती आणि महत्वपूर्ण व्यक्ती माझ्या आयुष्यात नव्हती.मीच ती दूर केली होती. मी पूर्वीपेक्षा जास्तच एकटा पडलो.जीवन भकास वाटायचं.दररोज फक्त एक कॉल यायचा आता तो सुद्धा बंद झाला होता...खूप खूप रडावं वाटायचं तेव्हा.येथून मी पूर्णपणे स्वतःला वाचनात गुंतून टाकलं ,एकामागे एक पुस्तक वाचायचो ,मनाला खंबीर बनवायचं आणि वाचलेली पुस्तके जगण्याचं प्रयत्न करायचो..
जसं जसं वाचत गेलो मनातील मरगळ काही प्रमाणात नाहीशी व्हायला सुरुवात झाली....अशातच मी तात्यांच 'सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध' वाचलं आणि आतापर्यंत का वाचलं नाही ?याबद्दल स्वतःलाच शिव्या दिल्या.बुद्धाची माझ्या आयुष्यात Entry झाली होती.बुद्धाने मला कळत/नकळतपणे एक मार्ग दाखवायला सुरुवात केली...मी इगो वगैरे बाजूला सोडलं आणि आजूबाजूच्या मित्रांना,शेजाऱ्यांना बोलायला सुरुवात केली.मित्रासोबत विहिरीवर पोहायला जायचो,त्यांना बोलायचो,वाचलेल्या पुस्तकाबद्दल गप्पा मारायचो,बाबासाहेब, गौतम बुद्ध ,शिवराय त्यांना समजून सांगायचो.
मी आता बदलायला लागलो,माझा एकाकीपणा या मित्रांमुळे कमी झाला.अर्पिताची आठवण सतत यायची,तिला कॉल करावं वाटायचं पण मनाची समजुत कशीतरी घालायचो आणि कामाला लागायचो...बघता बघता लॉकडाऊन शिथील झालं.ऑगस्ट पर्यत मी असंख्य पुस्तके वाचली होती आणि त्याबद्दल जमेल तसं फेसबुक आणि कोरावर लिहलं होतं..थोडंफार 'सोशल मीडियावर' एक चांगली ओळख आणि छवी निर्माण झाली होती.माझे पुस्तकं अनुभव लोकांना आवडायला लागले होते.अनेक वेळा 'व्हाट्सअप्प वर ते इतर नावाने फिरायचे तेव्हा मला खरंच छान वाटायचं.आतापर्यंत मनातील मरगळ काही प्रमाणात दूर झाली होती.थोडंफार छान वाटायचं पण हा प्रवास येथे समाप्त होणारा नव्हता.
ऑगस्टमध्ये 2020 मध्ये मी शरद तांदळे सरांचं
'द आंत्रप्रन्यूर'हे नुकतंच आलेलं पुस्तकं वाचलं..या पुस्तकाने मला एक दिशा दाखवली,खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली आणि व्यवसायात उतरण्यासाठी ऊर्जा दिली.मी आतापर्यंत वडिलांवर अवलंबून होतो.हे पुस्तकं मी जगायचं ठरवलं.शरद सरांचा आदर्श घेऊन व्यवसायात उतरायचं ठरवलं.आणि नोव्हेंबर मध्ये दिवाळीला स्वतःचा छोटंसं का असेना दुकान सुरू करायचं ठरवलं.आता माझ्या संग्रहातील पुस्तकं समाप्त झाल्याने ऑगस्ट मध्ये मी परभणी ला 'रावजी लूटे'यांच्या पुस्तक दुकानात गेलो आणि तेथून तब्बल 6000 ची पुस्तके खरेदी केली.
परभणीवरून पुस्तके आणली आणि ती वाचत सुटलो.ऑक्टोबर मध्ये एक आयडिया आली.ती म्हणजेच "खजिना पुस्तकांचा" हा उपक्रम.आपल्या सारख्या वाचकाला लॉकडाऊन मध्ये सहजपणे पुस्तके मिळत नाही.याचा अर्थ इतरांना सुद्धा ती मिळत नसणार.त्यामुळे आपणच त्यांना योग्य आणि वाचनीय पुस्तके सवलती मध्ये का पोहोचवू नये ? हा विचार करून खजिना पुस्तकांचा सुरू केला जो कालांतराने 'We Read' म्हणून ओळखल्या गेला.तेव्हा याल एवढा प्रतिसाद मिळेल हा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.सोशल मीडियावर पोस्ट केली आणि खजिना पुस्तकांचा सुरू झाला.....
नोव्हेंबर 2020 दिवाळीला स्वतःची 'किराणा दुकान' सुरू केली. दुकानाला प्रतिसाद छान मिळाला .त्यामुळे माझं पुस्तकाचं खर्च मी यातून काढायला सुरुवात केली.दुकानात येणाऱ्या छोट्या मुलामुलींत मिसळायला सुरुवात केली.. एकंदरीत हे बेस्ट होतं आणि अशातच माझ्या आयुष्यात Entry झाली एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाची आणि त्या पुस्तकातून एका अवलियाची तो अवलिया म्हणजेच 'हेन्री डेव्हिड थोरो आणि ते पुस्तक म्हणजेच वॉल्डन.वॉल्डन वाचलं आणि मी थोरोच्या प्रेमात बुडालो...थोरोच 'थोरो गुरुजी' कधी झालं हे मलाच कळालं नाही..या पुस्तकाने मला हेलावून सोडलं,परत नव्याने विचार करायला भाग पाडलं..वॉल्डनने मला निसर्गाच्या सानिध्यात जायला भाग पाडलं.रॅट रेसमधून बाहेर काढून मला फक्त आणि फक्त वर्तमानात जगायला शिकवलं..नैराश्यातून बाहेर पडायला मदत केली.अनेक बाबतीत बघण्याचा दृष्टीकोन दिला....एकांतवाद आणि एकाकीपणातील फरक उलगडून सांगितला....थोरो गुरुजीनी मला एकंदरीत जगायला शिकवलं.
फेब्रुवारी 2021 पर्यत मी बरंच काही वाचलं आणि ते जगायचं प्रयत्न केलं. ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यत" खजिना पुस्तकांचा " हा उपक्रम तब्बल चार महिने चालवलं..93₹ हजार रुपयांची पुस्तके 'सोल्ड आऊट' केली.तळागाळातील वाचकांपर्यंत पोहोचलो.या मुळे खूप चांगली हक्काची माणसं जुडल्या गेली.फेब्रुवारी मध्ये तब्येत पुन्हा ढासळली रक्ताची पातळी कमी झाली..अभ्यास बंद होताच इथपर्यंत 'अर्पिता'ला मी पूर्णपणे नव्हे पण काही बाबतीत विसरून गेलो होतो. पण आजारी पडलो आणि पुन्हा अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली..ठीक होतो तोपर्यंत सर्वकाही छान वाटायचं पण आजारी पडल्यावर वेगळंच वाटायचं.आजारामुळे मी 'खजिना पुस्तकांचा'उपक्रम काही दिवसांसाठी बंद केला.आणि अशातच मग पुढे दुसरी लाट आली आणि लॉकडाऊन पुन्हा लागला..
2021 चे 6 महिने असेच गेले.वाचन,चित्रपट आणि व्यवसाय हेच माझं आयुष्य बनलं होतं..उच्चशिक्षित होण्याचा स्वप्न,मनातील शिक्षणाची आग जी ' बाबासाहेब आंबेडकरांनी 7 वीत पेटवली होती ती आता विझली होती.एवढं सर्वकाही होतं होत पण मी वाचनाची आणि पुस्तकाने माझी साथ सोडली नव्हती..ती 7 वी पासून सुरूच होती आणि आहे.थोडं ठीक होताच नव्याने अभ्यासाला लागायचं होतं,पण तब्येत साथ देत नव्हती.अशक्तपणा,थकवा काहीच करू देत नव्हतं..मेडिसिन्स चा काही परिणाम होत नव्हता.माझा विरोध असताना सुद्धा आईने देव/धर्माचं सुद्धा करून बघितलं.पण तब्येत काही सुधरत नव्हती...
पण पुढे जुनच्या शेवटी थोडंफार ठीक वाटायला लागलं.आणि मी सर्वकाही विसरून 1 जुलै 2021 पासून जोमाने अभ्यासाला लागलो..याच महिन्यातच माझ्या आयुष्यात Entry झाली एका महत्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाची जो पुढे माझ्या हृदयात घर करून जाणार होता,एक अश्या मित्राची ज्याची सुरुवातीपासूनच मला गरज होती,माझ्या मैत्रीच्या व्याख्येची, अर्जुनाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण होता तशाच एका श्रीकृष्णाची.. जो मला पुढे प्रत्येक बाबतीत साथ देणारा होता,समजून घेणारा होता तो मित्र म्हणजेच माझा मित्र'हर्षल ! हर्षलची जागा माझ्या आयुष्यात खूप विशेष आहे.त्याची जागा कधीही कोणीच घेऊ शकणार नाही.हर्षल आयुष्यात अनपेक्षितपणे आला.तसा आला तो 2020 मध्येच होता तो सुद्धा पुस्तकामुळेच.पण नियतीला बहुतेक मला आणि त्याला सुद्धा तेव्हा काही त्रास द्यायचा होता..कारण पूर्वी आम्ही एकमेकांच्या आयुष्यात आलो असतो,तर चित्र थोडं वेगळं असलं असत. बहुतेक आमची बॉंडिंग एवढी जुडली नसली असती.आजपर्यंत खरी मैत्री पुस्तकात वाचली होती,चित्रपटात बघितली होती.पण आजपर्यंत खरी मैत्री कधी अनुभवली,जगली नव्हती.ती मला जगायला आणि अनुभवायला मिळाली माझ्या या मित्रामुळे.सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर माझ्या आयुष्यात आले त्यांच्यामुळे पुस्तके आली तर पुस्तकामुळे हर्षल सारखा खरा मित्र माझ्या आयुष्यात आला.या तिन्ही मुळे माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं.
अभ्यासासोबतच पुढे आम्ही वेळोवेळी बोलतं होतो.हर्षलच नेहमी कॉल यायचा तो आपुलकीने विचारपूस करायचा,आपल्याबद्दल सांगायचा.विविध विषयांवर बोलायचा.येथूनच मला त्याची समाज,शिक्षण आणि माणुसकी बद्दल असलेली तळमळ समजली.येथूनच हर्षल खऱ्या अर्थाने मनात घर करून गेला.तो ज्या पद्धतीने ज्या तळमळीने बोलायचा ते फक्त ऐकतच राहावं असं वाटायचं.येथूनच त्याने मला एकलव्य, Tiss/Apu/IIT आणि वेगवेगळ्या Fellowships' बद्दल माहिती दिली.यामुळे एका वेगळ्या जगाबद्दल मला कल्पना मिळाली..त्याची शिक्षणाप्रति असलेली तळमळ मला अभ्यास करायला आणि शिकायला प्रवृत्त करत गेली.एक चांगला मित्र मिळाला याचा आनंद होतं होता.उच्च शिक्षण घेण्याची मनातील आग थोड्याप्रमाणात हर्षलमुळे पेटायला सुरुवात झाली.
आता मी Depression मधून चांगल्याप्रकारे बाहेर आलो.असंख्य पुस्तकांनी मला नव्याने उभारी दिली आणि मी ध्येयाच्या वाटेवर चालू लागलो.दुकान सांभाळून मी नव्याने अभ्यासाला सुरुवात केली होती.असं करत करतच नोव्हेंबर महिना उजाडला आणि बघता बघता" 26 नोव्हेंबर संविधान दिवस आला.मला चांगल्या प्रकारे आठवतंय की 26 नोव्हेंबर रोजी मी रात्री दुकानात "वॉल्डन काठी विचार विहार' हे नवीन रिप्रिंट होऊन आलेलं पुस्तकंच वाचतं बसलो होतो.आणि मला 10.30 च्या सुमारास " शरद तांदळे" सरांचा कॉल आला.त्यांनी मला त्या आगळ्या वेगळ्या पुरस्काराबद्दल कल्पना दिली आणि शुभेच्छा दिल्या.सरांना बोलून कॉल ठेवलं.मला हे सर्वकाही अनपेक्षित होतं. मी भारावून गेलो होतो.घरी कुटुंबाला कल्पना दिली.मला आभाळ ठेंगणे झाले होते.
बस्सस !! मग काय तेथून आयुष्य बदललं.एक पुश मिळालं ज्याची सर्वांत जास्त मला गरज होती. प्रोत्साहन,शुभेच्छा,पाठिंबा,ओळख,प्रेम आणि आपुलकी मिळाली..भविष्यात आता कधीही कोठेही न थांबता लढायची ,भिडायची हिम्मत आली...फेब्रुवारी मध्ये "भुरा" वाचलं.भुराने अजूनच हिम्मत दिली आणि आयुष्याला कलाटणी देऊन स्वप्ने बघायला आणि ती पूर्ण करायला शिकवलं. आता मात्र थांबायचं नाही उच्चशिक्षित होऊन मोठी मजल मारायची ठरवलं आणि पुन्हा ताकदीने अभ्यासाला लागलो...1 मार्च ला चैत्यभूमी ला गेलो आणि परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून नवीन प्रवासाला सुरुवात केली..🖤
2022 मध्ये खूप खूप वाचलं,प्रवास केला,असंख्य जीवाला जीव देणारी माणसं जोडली.तळागाळात पुस्तके पोहोचवली-पोहोचवतोय,प्रेम पेरलं,TTYH Friend सुरू करून असंख्याना बोललो,BBC वर झळकलो ,स्वप्ने बघितली,बघतोय आणि आता ती पूर्ण करण्यासाठीच झटतोय... लवकरच पूर्ण होतील हा विश्वास आहे...डिप्रेशन सारख्या गोष्टी आता माझ्या वाट्याला येऊच शकत नाही.यामध्ये सर्वांत मोठा वाटा पुस्तकांचा आहे होता आणि असेल कायम...
सप्टेंबर 2022 मध्ये अर्पिता ला कॉन्टॅक्ट केलं...मनापासून माफी मागितली..बरंच काही बोललो.ती खुप नाराज होती,बोलायला तयार नव्हती.पण मी बोललो,समजवलं..As a friend म्हणून नेहमी तत्पर असेल,सुखात नसलो तरीही दुःखात असेल हा प्रॉमिस केलं..तिने मला माफ केलं आणि माझ्या मनावरील ओझं कमी झालं..चुकी तिची नव्हती,माझी सुद्धा नव्हती चुकी होती परिस्थितिची..बाकी मी आता एकदम ठीक आहे आणि अर्पिता सुद्धा..Good news ही आहे की तिची आता Engagement झाली आहे आणि मी तिच्यासाठी खूप खूप खुश आहे..♥️
सबका भला हो 🌿
Happy Ending 🖤
©️Moin Humanist🖤
खूप सुंदर .
उत्तर द्याहटवावाचतांना डोळे पाणावले. तितकच तुझ कौतुक सुद्धा करावं वाटल. जी मुलगी तुझ्या आयुष्यात येईल खूप नशीबवान असेल.
मोईन दादा तुझी स्टोरी तु खुपचं भारी लिहिली आहे खरच वाचतांना आधी खुप भावनिक झालो पण नंतर समोर आल्यावर भारी वाटल. ♥️😊
उत्तर द्याहटवामोईन मित्रा काय भारी लिहतोस तू..!!वाचताना मी फार भावनिक झाले.
उत्तर द्याहटवातुझ्या शब्दात जादू आहे. माझ्यासारखा कैक जणांना तू प्रेरित करतोस वाचनासाठी, चांगला जीवन जगण्यासाठी जिद्दीनं आयुष्यात उभारी घेण्यासाठी...❤️✨🫂
खूप खूप अभिनंदन मोईन.
उत्तर द्याहटवाभावा तुझा हा वाचनाचा प्रवास यामुळे मी भारावलो खूप खूप पुढे तू जा ह्याच शुभेच्छा...😊
उत्तर द्याहटवाअप्रतिम ❤️
उत्तर द्याहटवामोईन मिञा तुझ लिखाण जितके ह्दयस्पर्शी आहे तितकीच त्याला प्रमाणिक पणाची झालर असल्याच दिसतय ....आपली पहिली भेट बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या KRC जवळ झाली.. त्या अधिही आपला फोन काॕल झाला..तुझ्या लिखानतली आणि बोलण्यातली तळमळ मला खुप काही सांगून जायची..एक खाञीने सांगतो तू एक दिवस खूप मोठा माणूस होणार भावा...शुभेच्छा💐💐
उत्तर द्याहटवाविषयाची उत्तम मांडणी आणि वाचकांच्या मनात घर करणारी लेखणी भाई
उत्तर द्याहटवादादा बोलायला शब्दच उरले नाहीत आता 🥹🥹🥹🥹
उत्तर द्याहटवातुझ्या एकेक वाक्यसरशी मनात काहूर माजलं होतं.तुझ्या या प्रवासाची मला खूप गरज होती मागची काही वर्ष.आपली भेट खूप आधी व्हायला पाहिजे होती.खूप उशिराच झाली, पण हरकत नाही .
तुझ्या या प्रवासाने मला अजून जोमाने जगण्याची उमेद दिली आहे .
तुझ्या या प्रवासाने , तुझ्या दुःखाने असं वाटतंय की माझं तर दुःख काहीच नाहीय .मी पण काहीतर करू शकते अगदी तुझ्या सारखं दादा.
मला वाचनाची अवड आहे पण अपुऱ्या वेळेमुळे शक्य होत नाही .पण जसं जमेल तसं वाचण्याचा प्रयत्न करते.तू इतके कष्ट घेतलेस ना दादा मग तुझी अजून उत्तरोत्तर प्रगती होणार दादा.
आणि मी तुझ्या या भरघोस यशाची मी आतुरतेने आणि आता तर अगदी चातकासारखी वाट बघेन.
बाकी तुझ्या लिखाणाबद्दल तर वादच नाही .
तुझं लिखाण अगदी थकलेल्या मनावरची मरगळ दूर करते.
अजून काय बोलू दादा तुला शतशः नमन 🥹🥹🥹🥹🥹🥹
दादा खूप छान व्यक्त झालात. Positive विचार मिळतो तुला वाचून
उत्तर द्याहटवाभावा, मी तुला फेसबुक वरून फॉलो केलं. आणि पुस्तक वाचायची सवय तुझ्यामुळेच लागली. तुझा जीवनप्रवास मस्त आहे. आणि पुढं ही चांगल होईल
उत्तर द्याहटवाMoin,
उत्तर द्याहटवाखरंच तुझं जीवनप्रावास प्रेणादायी आहे, प्रत्येक त्या तरुणांसाठी जो आत्मविश्वास गमाहून बसलेला असतो.
कधी कोणाचे वॉट्सअप स्टेटस न पाहणारा मी, तुज्या वॉट्सअप स्टेटस बघण्यासाठी वेळ काढतो.. तुझ्या प्रत्येक लेखाचे वाचन करतो..निवडून काढलेलं लेख खरंच जीवनाला नवीन दिशा देण्याचं प्रयत्न करतात. तुझ्या या पुस्तकी प्रेमा मुले मला सुद्धा वाचनाची आवड निर्माण झाली आहे.. आत्ता तर असं वाटतं की कधी ऑफिस मधून घरी पोचतो आणि पुस्तकाचे वाचन करतो. ही चांगली सवय तुझ्या सहवासाचंच एक भाग असेल..
अशीच ज्ञान प्राप्ती आणि प्रगती करत रहा, त्याच बरोबर चांगल आरोग्य लाभो...
खूप प्रेरणादायी कहाणी आहे मोईन तुझ्या आयुष्याची, पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा ❤
उत्तर द्याहटवा