परका ♥️


2 दिवसांपूर्वी 'आल्बेर काम्यू'या साहित्य साठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या लेखकाच्या मुळ फ्रेंच भाषेत 1942 साली 'लेत्रांजे' तर लंडनमध्ये 'द आऊटसायडर' या नावाने प्रकाशित झालेल्या 'कादंबरीचं नुकतंच आलेलं मराठी अनुवाद 'परका' वाचून पूर्ण केलं.मराठीमधे अनुवाद अवधूत डोंगरे यांनी केला आहे.जो एकंदरीत फार वाचनीय झालेला आहे.

फ्रेंचांची वसाहत असणारा 1930-40 च्या दरम्यानचा उत्तर आफ्रिकेतला अल्जीरिया देश. त्याची राजधानी अल्जीअर्स. या अल्जीअर्समध्ये राहणाऱ्या 'मेर्सो' च्या आईचं निधन होतं. मेर्सो तिच्या दफनविधीला उपस्थित राहतो. नंतर मेर्सोच्या आयुष्यात कमी- अधिक व्याप्तीच्या अनेक घटना घडत राहतात. काही घटनांना तो नुसता साक्षी असतो, तर काही घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो. दरम्यान, ऊन, आजूबाजूचे आवाज, माणसं, गाड्या हे सगळं त्याला जाणवत राहतं. मग अशातच अनपेक्षितपणे समुद्रकिनारी त्याच्या हातून खून होतो. त्याच्या विरोधात खटला उभा राहतो.
हे सगळं कसं होत जातं? खून का होतो ? खटल्यात काय होतं? या सगळ्याची गोष्ट खुद्द मेर्सोच्या तोंडून सांगणारी 'परका' ही आल्बेर काम्यू यांची कादंबरी. वेळोवेळी कौतुकाचा, टीकेचा, चिकित्सेचा विषय होत राहिली आहे. तिच्या प्रकाशनाला ऐंशी वर्षं झाली असली, तरी आजसुद्धा ही कादंबरी वेगवेगळ्या अर्थाना वाव देणारी ठरावी..

सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ही कादंबरी वाचकाला गुंतून ठेवण्यात यशस्वी होते.यामधील विविध घटना आणि प्रसंगाचे वर्णन वाचत असताना आपण गुंतून जातो.वाचता-वाचता आपण कधी या प्रवासाचा एक भाग होऊन जातो हे कळतं सुद्धा नाही.कालांतराने यातील सर्व कथानक आपल्याला डोळ्यांसमोर घडताना दिसतो.सुरुवातीपासून कादंबरीचं कथानक पकड घ्यायला सुरुवात करतो. वाचकांना थोडी सुद्धा नजर हटवण्याची संधी देत नाही.ही कादंबरी वाचत असताना मला सतत एकाकीपणा आणि कमालीची उदासीनता वाटतं होती.एकदा तरी नायकाने एखाद्या सामान्य माणसासारखं वागावं असं वाटतं होतं.कारण यातील मेर्सो हा नायक प्रचलित नियमांनुसार वागत नाही.आपण सगळेच जगणं सोपं करण्यासाठी रोज असं वागत असतो. पण मेर्सो जगणं दिसतंय त्याहून अधिक सोपं करायला नकार देतो. तो जसा आहे तेच बोलतो, तो स्वतःच्या भावना लपवणं नाकारतो आणि समाजाला लगेच धोका उत्पन्न झाल्यासारखं वाटतं. उदाहरणार्थ, प्रचलित पद्धतीप्रमाणे, स्वतःच्या गुन्ह्याचा खेद वाटतो असं म्हणायची सूचना त्याला केली जाते. आपल्याला या गुन्ह्याविषयी खरोखरचा खेद वाटण्याऐवजी जास्त वैताग येत असल्याचं तो म्हणतो. या सूक्ष्म अर्थभेदामुळे त्याला शिक्षा होते आणि याच अर्थी तो परका ठरतो.

लेखक म्हणतो :-

माझ्या लेखी, मेर्सो हा नाकारला गेलेला नाही, तर तो एक गरीब आणि विवस्त्र माणूस आहे, सावली न पाडणाऱ्या उन्हाची त्याला ओढ वाटते. त्याच्यात संवेदनशीलतेचा अभाव नाहीये, उलट अतिशय चिवट आणि त्यामुळे गहन अशा उत्कट भावनेने तो प्रेरित झालेला आहे, केवलत्व आणि सत्य यांच्याविषयीची ही उत्कट भावना आहे. अर्थात हे सत्य नकारात्मक आहे, जगण्यातून आणि जाणवून घेण्यातून जन्मलेलं हे सत्य आहे, पण त्याच्याविना स्वतःवर किंवा जगावर विजय मिळवणं कधीच शक्य होणार नाही.

©️Moin Humanist♥️
मी वाचलेली पुस्तके 🌱

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼