खुलूस ♥️~काळोखात हरवलेल्याचांदण्याची स्पंदनं......
काल समीर गायकवाड सरांच नुकतंच प्रकाशित झालेलं नवकोरा कथासंग्रह 'खुलुस' वाचून पूर्ण केलं आणि विचारांच्या समुद्रात बुडालो.पहिल्या कहाणीपासून तर शेवटी लेखकांनी केलेल्या प्रत्येकाशी संवादापर्यत डोळ्यात अश्रू होते आणि डोक्यांत विचारांचा काहूर माजला होता.तो पुस्तकं समाप्त झाल्यानंतर सुद्धा सुरूच होता आणि आहे.यातील प्रत्येक कथेने मला अस्वस्थ केलं,सुन्न करून विचार करायला भाग पाडलं आणि त्या स्त्रियांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन अनेक बाबतीत बदलण्याचं काम केलं.'मंटोच्या'काही कहाण्या वाचल्यापासूनच या विश्वाकडे बघण्याची माझी नजर काही बाबतीत बदलली होती,त्या स्त्रियांप्रति संवेदना जागृत झाल्या होत्या आणि एक आदर-सन्मान निर्माण झाला होता.जो खुलूस खरंच वाचून अजून कितीतरी पटीने वाढला आहे.आपल्या समाजाचा एक हिस्सा या स्त्रिया सुद्धा आहेत त्यांना डावलून, हिनवून कदापी चालणार नाही ही शिकवण मला खुलूस ने दिली असे मी म्हणू शकतो.
खुलूस वाचून मी भारावून गेलोय.लेखकांचा बोट धरून जणू मीच त्या काळोखात खितपत जगणाऱ्या स्त्रियांशी संवाद करून आलोय असं मला वाटतं आहे.त्यांच्या वेदना,दुःख,दर्द,पीडा मला फार जवळून अनुभवून आल्याचा जणू भास होतोय.लेखकांनी त्या स्त्रियांचा विश्व आणि त्यांच्या वेदना,दुःख-दैन्य,इच्छा,आकांक्षा ज्या शब्दांत मांडल्या आहेत त्या वाचकाला अंतर्मुख करून हेलावून सोडणाऱ्या आहेत.कुलटा', 'किटाळ', 'वेश्या', 'रंडी'.असे अनेक शब्द वापरून या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, आपल्या समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं ?
दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा.
अशी असंख्य आयुष्यं जवळून बघितलेल्या लेखकांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा,त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.जे वाचत असताना वाचकाच्या डोळ्यांतून अश्रू आल्याशिवाय राहत नाही.यातील स्त्रिया लेखकांना आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर भेटत गेल्या.त्या आता हयात आहेत की नाहीत हे सुद्धा ठाऊक नाही.पण या कथेतील स्त्रिया खोट्या नाहीत की त्यांची दुःख बेगडी नाहीत.यातील प्रत्येक कहाणीला आगापिछा आहे,शेंडी-बुडखा आहे.
लेखक म्हणतात -
ही संपूर्ण सफर म्हणजे एका जिवलगाचा शोध होता,पाठलाग होता!ज्याचा शेवट काळजाला हुरहूर लावून गेला, जगणं समृद्ध असणं असणं म्हणजे काय याचे नव्याने संदर्भ देऊन गेला !🌿
हे पुस्तक एकूण 4 प्रकरणात विभागलं गेलं आहे.या प्रत्येक प्रकरणात त्या वेगवेगळ्या स्त्रियांच्या संघर्षमय कहाण्या दिलेल्या आहेत.'काळोखात हरवलेल्या चांदण्या,जगण्याचं गणित चुकलं नाही तरीही,
'काही वेगळ्या कहाण्या'आणि "कोविडकाळातल्या ज्वाळा" हे ते 4 प्रकरण होय."हिराबाई'पासून सुरू होणारा हा प्रवास 'नागम्मा'पाशी येऊन समाप्त होतो आणि वाचकाला विचारांच्या चक्रात गुंतवून टाकतो.शेवटी लेखकांनी स्त्रियांच्या वतीने इथे येणाऱ्या पुरुषांशी, त्यांना दलदलीत ढकलणाऱ्या दलालांशी, सरेआम या लुटल्या जात असतानाही स्वमग्नतेच्या कोषात गुरफटून गेलेल्या समाजाशी आणि सरतेशेवटी तमाम वाचकांशी केलेला संवाद आपल्याला विचार करायला भाग पाडून जातो एवढं नक्की....
या विषयांवर जास्तीत लिहायला,बोलायला हवं आणि मनन चिंतन करून विचार करायला हवं.हा विषय अजिबात दुर्लक्षित करता येणारा नाही.त्या स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवं आणि ते 'खुलूस'सारख्या पुस्तकांतून नक्कीच बदलू शकतो असं मला वाटतं..🖤
दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत........🌿
Sameer Gaikwad Sir Hats Off To You and Your Writing.....♥️🖤
©️Moin Humanist🌿
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा