कोसला♥️
2018 साली सर्वप्रथम मी नेमाडेंची 'कोसला' वाचली होती.मुळात तेव्हा ती फक्त वाचलीच होती,मला ती समजली मात्र अजिबात नव्हती.माझी बौद्धिक पातळी म्हणा किंवा कुवत म्हणा तेव्हा तेवढी नव्हती.यामुळेच मला ही कादंबरी तेव्हा भयंकर कंटाळवाणी वाटली.अनेक वेळा अर्ध्यातच सोडून द्यावी असं वाटतं होतं,पण मी शेवटपर्यंत वाचलीच आणि पुढे काही आता याच्या नादी लागायचं नाही असं ठरवून इतर वाचन सुरू ठेवलं. कोसलाच्या अनुभवामुळेचं मी नेमाडेंच्या 'चांगदेव चतुष्ट्य" आणि हिंदुच्या वाट्याला गेलो नव्हतो.
पुढे जसं जसं वाचन वाढलं,वाचनाचा आवाका वाढला तसं तसं 'नेमाडे आणि त्यांच्या पुस्तकाप्रति आकर्षण वाढतं गेलं'.नेहमी कुठे ना कुठे "कोसला आणि हिंदू" बद्दल चांगलं-वाईट वाचत आणि ऐकत होतो.पांडुरंग सांगवीकर,खंडेराव आणि चांगदेव या पात्राचें मिम्स बघत होतो.या इत्यादी कारणानेच बहुतेक मी पुन्हा 'नेमाडेंच्या वाट्याला जायचं ठरवलं.सुरुवात केली ती 'कोसला' पासून.वयाच्या पंचवीशीत लेखकांनी ही कादंबरी लिहिली तर मी पंचवीशीत ही दुसऱ्यांदा वाचली हा एक संयोगच जणू.
तर,काही दिवसांपूर्वी मी कोसला वाचली आणि समजून घेतली म्हणणार नाही तर समजून,उमजून घेण्याचं फक्त प्रयत्न केलं. यामध्ये कितपत यशस्वी झालो हे सांगता येणार नाही.पण,मला ही कादंबरी यावेळेस आवडली. सुरुवातीला बोअर आणि किचकट वाटलेली ही कादंबरी मला फार आवडून आणि भावून गेली. मी जरी आजपर्यंत आयुष्यात 'हॉस्टेल लाईफ'वगैरे जगली/अनुभवली नसली तरीही,ही कादंबरी मला कोठेतरी रिलेट मात्र झाली.यातून मला माझीच काही प्रश्नांची उत्तरे मिळाली,माझी वास्तवाची जाणीव जास्त नाही पण काही प्रमाणात तरीही विस्तारली म्हणू शकतो.या कादंबरीने मला'काही ठिकाणी अस्वस्थ केलं,भारावून टाकलं तर कधी विचार करायला भाग पाडलं.काही प्रसंगानी हसवलं तर काहींनी रडवलं सुद्धा.वाचताना मी त्या काळात हरवून गेलो होतो.आजूबाजूला मला त्याकाळातील पुणे दिसतं होतं. यातील पात्र जणू माझ्याशी बोलतं होते असं मला अनेक वेळा वाटलं.पांडुरंगचा हात हातात घेऊन मी त्याच्या कडून त्याची कहाणी त्याच्याच शब्दांत जाणून घेऊन परत आल्याचा अनुभव मला कोसला वाचताना आला;एवढं मात्र नक्कीच.
स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या अपेक्षा भारतीयांनी केल्या होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही.त्या अपेक्षा पूर्ण न झालेल्या पिढीचे
प्रतिनिधित्व लेखकांनी या कादंबरी केले आहे.या साऱ्यांचे प्रतिबिंब 'पांडुरंग सांगवीकर' या एका उत्तर महाराष्ट्रातील 'सांगवी'या खेड्यातून शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आलेल्या युवकाला केंद्रस्थानी ठेवून नेमाडे यांनी कादंबरीमध्ये अधोरेखित केले आहे जे फार वाचनीय आहे..
रा.ग जाधव म्हणतात :-
विफलतेची, अर्धशून्य अशी असहाय आणि अगतिक झाल्याची भावना 'कोसला' कादंबरीतून अभिव्यक्त होते. एका अर्थानि 'कोसला' कादंबरी ही शोकात्मिकेची जनक आहे, असेच म्हणता येईल. त्या वेळच्या पिडीची ही शोकात्म भावना वाचकांच्या मनात निर्माण करण्याचे संवेदनशील चित्रण 'कोसला' या कलाकृतीमध्ये आहे. तत्कालीन तरुणांच्या अस्वस्थेला आणि वैफल्याला 'कोसला' कादंबरीने वाट मोकळी करून दिली. 'वुई आर आऊटसायडर्स' या भावनेला शब्द दिला. कुठल्याही पिढीच्या कालखंडातील युवा वर्गाचे हे 'ट्रेजिक' संवेदन कायम राहते हे 'कोसला' कादंबरीचे यश म्हणावे लागेल की समाजबांधणीचे अपयश हाच खरा प्रश्न आहे.🌿
नक्की वाचा...🌿
©️Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा