नरभक्षकाच्या मागावर ♥️


केनेथ अँडरसन लिखित व संजय बापट यांनी सुंदररित्या अनुवादित केलेलं 'नरभक्षकाच्या मागावर'हे अप्रतिम पुस्तकं वाचून पूर्ण केलं.या दोन दिवसाच्या अप्रतिम अश्या पुस्तकं प्रवासाने मला खरंच एक भन्नाट अनुभव दिला.केनेथ सरांसोबत जणू मीच 'नरभक्षकाच्या मागावर' चक्कर मारून आलोय अशी फीलिंग मला आली.यातील प्रत्येक कथा ही रोमांचक आणि थरारक होती,जी वाचताना अनेक वेळा अंगावर काटा येतो.यामध्ये केलेले काही प्रसंगाचे वर्णन सरळ अंगावर येतात.यातील एकूण 11 शिकारकथा वाचताना जणू आपण एका वेगळ्याच विश्वात वावरतोय असं वाटत राहते.आपल्या आजूबाजूला आपल्याला अरण्य आणि जंगली प्राणी वावरताना दिसू लागतात एवढं आपण यामध्ये गुंतून जातो.

स्वातंत्र्यपूर्व काळात 'केनेथ अँडरसन' या ब्रिटिश शिकारीचे थरारक शिकार अनुभव ह्या पुस्तकात त्याने मांडले आहेत.या पुस्तकांत नरभक्षक वाघ व बिबळ्यांच्या थरारक व रोचक शिकार कथा आहेत.तर एक कथा पिसाळलेल्या हत्तीची सुद्धा आहे.एकंदरीत 207 पृष्ठसंख्या असलेलं हे पुस्तक वाचकांना एका वेगळ्याच प्रवासावर घेऊन जातो.हे पुस्तकं एकदा हातात घेतल्यावर परत खाली ठेवावं वाटतं नाही,याचं कारण लेखकांची स्टोरी सांगण्याची पध्दतच ही खूप जबरदस्त आणि वाचकांच्या मनाचा कब्जा घेणारी आहे.यातील प्रत्येक गोष्टीतलं नाट्य उभं करण्याची त्यांची हातोटी खरंच वाखण्याजोगी आहे.नरभक्षक वाघ आणि बिबळ्याच्या दहशतीतुन तेथील स्थानिकांना वाचवणाऱ्या या लेखकाला अनेक वेळा आपले जीव धोक्यात सुद्धा घालावे लागले,पण तरीही धोक्यांना न जुमानता केनेथ यांनी आपलं कार्य प्रामाणिकपणे केलं.केनेथ अँडरसन हे एक पट्टीचे शिकारी होते. त्यांची बंदूक वेध घ्यायची ती फक्त नरभक्षक बनलेल्या वाघांचा अन् बिबळ्यांचा.त्यांनी अशी असंख्य शिकार केली आणि पंचक्रोशीत पसरलेली नरभक्षकाची दहशत कमी केली.

भारतातील जंगलांबद्दल या अँडरसनला विलक्षण प्रेम होतं. ते अनेकवेळा काहीही हत्यार न घेता जंगलात जायचे., कधीकधी ते तिथे रात्रीही मुक्काम करायचे तिथे मला मन:शांती मिळते असं ते म्हणायचे. ते तिथे रमायचे.
जंगलाशी नाळ जोडली गेलेला हा शिकारी जंगल वाचायला तर शिकलाच होता; शिवाय जंगलात राहणाऱ्या वन्य जमाती,प्राणी-पक्षी त्यांची जीवनशैली, रूढी अन् प्रथा, जगण्याची साधनं या साऱ्यांचंही त्यांनी  बारकाईनं केलेलं निरीक्षण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो.जो वाचत असताना त्यामध्ये आपण पूर्णपणे हरवून जातो.बदलत जाणाऱ्या जंगलातल्या रंगछटा, निरनिराळ्या प्राण्यांनी एकमेकांना घातलेली साद, किंवा दिलेले सावधानतेचे इशारे, अनेकविध पक्ष्यांचे आवाज. मोरांच्या केका म्हणजे लेखकाच्या लेखी स्वर्गीय सुखच होता.

दक्षिण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या पंचक्रोशीत दहशत माजवणाऱ्या नरभक्षकांना हिमतीनं अन् हिकमतीनं टिपणाऱ्या या निष्णात शिकाऱ्यानं सांगितलेल्या स्वानुभवाच्या थरारक शिकारकथा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात,ज्या खरंच खूप वाचनीय आहेत.या पुस्तकातून एक वेगळं विश्व आपल्या समोर उभा राहतो आणि आपण जणू लेखकांचा हात धरून दक्षिण भारतातल्या जंगलात वावरू लागतो एवढं नक्की.

शिकारी म्हणून लेखकाची ओळख त्यांनी नरभक्षक वाघ आणि बिबळ्यांना मारून तेथील स्थानिकांना भयमुक्त केलं या कारणासाठी जास्त आहे. त्यांनी आठ नरभक्षक बिबळे (सात नर व एक मादी) आणि सात वाघ (पाच नर आणि दोन माद्या) मारल्याची त्यांच्या खात्यात सरकारी दप्तरात नोंद आहे. अनधिकृतरित्या मात्र हे आकडे अठरा नरभक्षक बिबळे, पंधरा ते वीस नरभक्षक वाघ आणि काही पिसाट हत्ती असे आहेत.🖤

नक्की वाचा....♥️

©️Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼