भटक्यांचे लग्न ♥️


उत्तम कांबळे लिखित 'भटक्यांचे लग्न'हे पुस्तक काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा वाचलं आणि समजून घेतलं.वेगवेगळ्या जातीतील विविध लग्न पद्धतीची माहिती या पुस्तकांतून लेखकांनी खूपच सोप्या भाषेत दिली आहे.आपल्या भारत देशात असंख्य जाती आहेत.काहीही म्हटलं तरीही जात हे इथले एक दाहक वास्तव आहे.भारत देशात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या एका जातीत जन्माला येतो,जातीत वाढतो आणि त्याचा शेवटसुद्धा एका जातीत राहूनच होतो.या जातीतच असंख्य अशा भटक्या जाती सुद्धा आहेत ज्यांना गावगाड्यातही सामावून घेतलं नाही अश्या या जाती आजही डोक्यावर फाटकं आभाळ आणि पायांखाली दुभंगलेली जमीन घेऊन भाकरीच्या तुकड्यासाठी गावोगाव फिरताहेत.यांना मुळात गावच नाही,यांचे शासकीय दप्तरात नाव नाही,या जातींना कुठलीही प्रतिष्ठा नाही.गाव नसल्याने यांना गावोगावी भटकावे लागते.शेकडो वर्षे पाठीवर बिऱ्हाड घेऊन या जाती भटकतच आहेत. यांना 'भटक्या जाती'म्हणतात.

या जातींचं एकूण आयुष्य न्यारं, रीतीरिवाज न्यारे, जात-पंचायत न्यारी, सांस्कृतिक जीवन न्यारं आणि लग्नविधीसुद्धा ! लग्नविधींमध्ये जशी रंजकता आहे, तशीच प्राचीन परंपरांची अनेक मुळंही यामध्ये रुजली आहेत. रस्त्यावर, गटारीच्या काठावर, रानावनात आणि डोंगरदऱ्यांत होणाऱ्या या लग्नांतील परंपरा चक्रावून सोडणाऱ्या, काही मातृप्रधान संस्कृतीकडे बोट करणाऱ्या, काही निसर्गाशी नातं सांगणाऱ्या, तर काही अमानवी आहेत.या सर्व जातीतील विविध लग्न पद्धतीबद्दल 'भटक्यांचे लग्न' या पुस्तकांत विस्तृत अशी माहिती दिली आहे.जी खूप रोचक,नवी आणि विचार करायला भाग पाडणारी आहे.

आपल्या आजूबाजूला या विविध जातीतील माणसं आपल्याला वावरताना दिसत असतात.पण,आपल्याला त्यांच्या राहणीमान,भाषा,दिनचर्या आणि लग्नपद्धतीबद्दल अशी विशेष काही माहिती नसते.ती माहिती आपल्याला या पुस्तकांमध्ये वाचायला मिळते.या पुस्तकात या विविध जातीत होणाऱ्या लग्न समारंभ आणि त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीबद्दल रोचक आणि हटके माहिती दिलेली आहे जी खरोखर खूप वाचनीय आणि ज्ञानात भर पाडणारी आहे.अनेक विद्यार्थ्यांनी हा पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून वापरलं आहे यातच सर्वकाही आलं.तसे पाहता यातील प्रत्येक जातीच्या विवाह पद्धतीवर एक स्वतंत्र ग्रंथ लिहिता येईल,पण लेखकांनी या पुस्तकात कैकाडी, कूचकोरवी, पामलोर,घिसाडी,कुडमुडे जोशी, पिंगळे जोशी, पोपटवाले जोशी,ओढ बेलदार, रजपूत बेलदार,कांजारभाट,डोंबारी,गोसावी,लमाणी,पंचाळ,वड्ड,डवरी,फिरस्ते कोळी,फासेपारधी,गोपाळ गोंधळी,भामटे,बागडी,मांगगारुडी,वैदू,नंदीवाले,वंजारी,कंझार,हेळवे,श्रीरामभक्तरू आणि रावळ इत्यादी उपेक्षित जातींच्या विवाहपद्धतीचा थोडक्यात उत्तम परिचय या करून दिला आहे.

आवर्जून वाचा...💙🖤

©️Moin Humanist✍️

__________________________________________

टीप :- हे पुस्तक तुम्हाला वाचायचं असल्यास आपल्या हक्काच्या We Read  वाचन चळवळीतून सवलतीत घरपोच कुठल्याही पोस्ट खर्चाशिवाय भारतभरात कोठेही मागवू शकता...💙
https://wa.me/7066495828

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼