ज्याच्या हाती पुस्तक ♥️
वाचक या नात्याने आपण पुस्तकांचा आतला आवाज हृदयाचे कान करून ऐकू या. निदान दिवसाकाठी एक-दोन पाने वाचण्याचा नियमित वसा घेऊ या. वर्षाकाठी तीन-चार पुस्तके विकत घेऊन वाचू या. आपल्या पाल्यांना पुस्तकांची ओढ लावू या. ग्रंथखरेदीसाठी, ग्रंथवाचनासाठी, ग्रंथाभ्यासासाठी, ग्रंथचर्चेसाठी व ग्रंथभेट देण्यासाठी वेळ राखून ठेवू या.
~ जॉर्ज गोन्सालविस🖤
काही दिवसांपूर्वी 'जॉर्ज गोन्सालविस' लिखित "ज्याच्या हाती पुस्तक"हे पुस्तक प्रेमावर लिहलेलं आगळ वेगळं पुस्तक वाचून पूर्ण केलं.अतिशय सुंदर आणि रसाळ भाषेत लिहलेलं,हे पुस्तकं प्रत्येक पुस्तकप्रेमींनी वाचायला व आपल्या संग्रही ठेवायला हवं.हे पुस्तक वाचून माझा पुस्तकांवर प्रेम अजून कितीतरी पटीने वाढलं.पुस्तक आणि वाचनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन मिळाला.पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून तर प्रस्तवानेकडे बघण्याची एक नवीन दृष्टी मिळाली.या पुस्तकात पुस्तक प्रेमावर दिलेल्या कविता मनात घर करून गेल्या.या पुस्तकाचा प्रवासा मला एक अफाट आणि सुंदर अनुभव देऊन गेला.
पुस्तक प्रेम काय असतं ?पुस्तके का वाचावी ?पुस्तके कशी वाचावी ?पुस्तके संग्रही करून का वाचावी ?वाचन संस्कृती का व कशी जपायला हवी ? इत्यादी कितीतरी प्रश्नांची सोपी आणि सुंदर उत्तरे आपल्याला या पुस्तकांतून मिळतात.एकूण 26 लेखांतून आपल्याला लेखक पुस्तक आणि वाचनावर प्रेम करायला शिकवतात.वाचनाचे महत्व पटवून देऊन,वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आणि नियमित वाचत राहण्यासाठी प्रोत्साहित करतात.तर डिजिटल युगात कमी होतं जाणाऱ्या वाचन संस्कृतीबद्दल खंत व्यक्त करून विचार करायला सुद्धा भाग पाडतात.
पुस्तक लिहिण्यामागच्या आपल्या उद्देशाबद्दल लेखक म्हणतात :-
आजपर्यंत माझ्या वाचनात आलेले अनेक लेखक, कवी, प्रतिभावंत, कलावंत, राजकारणी आणि त्यांच्या जीवनातील वाचनाचा छंद, ग्रंथसंग्रह, वाचन तळमळ यांनी मी प्रभावित झालो. ह्या देशी-विदेशी प्रतिभावंतांच्या जीवनातील घटना, प्रसंग यांच्याशी आपलाही सुसंवाद व्हावा या उद्देशाने मी 'ज्याच्या हाती पुस्तक' याची निर्मिती केली आहे. त्यातून आपणही प्रेरणा घेऊन आपली उपजत असलेली ग्रंथवाचनवृत्ती अधिक विकसित, परिपक्व करावी हाच माफक उद्देश आहे.♥️
आणि हा उद्देश सफल करण्यासाठी आपण वाचन करायलाच हवं. या पुस्तकातील प्रत्येक पानांत व शब्दांत तुम्हांला वाचन प्रेम अनुभवायला मिळतं.पूर्णपणे पुस्तक आणि वाचनाला वाहिलेल्या या पुस्तकाच्या वाचनाने असंख्याना वाचनाचे महत्व कळायला मदत होईल एवढं नक्की.
ज्याच्या हाती पुस्तक.
पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक.
पुस्तक माझा सांगाती.
वाचनामागची प्रेरणा.
ग्रंथभेट.
उमलत्या मनासाठी पुस्तकांशी दोस्ती.
ग्रंथालयाच्या सहवासात : जीवनाच्या नंदनवनात.
वाचनाची ओहोटी.
वाचन-संस्कृती रुजवण्यासाठी.
कशाला वाचायची पुस्तके ?
वाचनातून लेखनाकडे.
ग्रंथसंग्रहाची अनोखी नशा.
पुस्तकातली अर्पणपत्रिका.
राजकारणी आणि वाचन .
कलावंत आणि वाचन.
मुलखावेगळे वाचक.
या आणि इतर वेगवेगळ्या काही लेखांतून आपल्याला पुस्तकाबद्दल नवीन काहीतरी मिळतंच.त्यामुळे आवर्जून वाचा आणि समृद्ध व्हा.
'जमीन भाजणाऱ्या वाळवंटातील भट्टीत मला सोड
मी तिथे राहीन.
निर्मनुष्य बेटावर मला सोड
मी तिथेच पडून राहीन,
हवाविरहित ग्रहावर मला सोड
मी तिथेही जिवंत राहीन. पण.... पुस्तक नसलेल्या खोलीत मला कोंड काही तासातच मी मरून जाईन.
जगण्यासाठीचा श्वास म्हणजे नाहीत का - पुस्तके? तुमच्यातला सूर्य म्हणजे नाहीत का - पुस्तके?
फुलातला मध म्हणजे नाहीत का - पुस्तके? अमूल्य देणगी म्हणजे नाहीत का - पुस्तके ?"
~तमिळ कवी वैरमुत्तू
©️Moin Humanist🌿
मी वाचलेली पुस्तके
खूप छान पुस्तक. सुंदर परिचय. आपल्या we read मुळे या पुस्तकाची मला माहिती मिळाली. व खरेदी करून वाचले. मनःपूर्वक धन्यवाद.
उत्तर द्याहटवा