गढीवरून ❤️
2021 साली वाचलेलं शेवटचं एक वाचनीय पुस्तक.वर्षांचा शेवट या अप्रतिम आणि भन्नाट पुस्तकाने झाला याचा फार आनंद आहे.फेसबुक वरील गढीवरून या टायटल खाली येणारे राजा गायकवाड सरांचे लेख फार अप्रतिम असतात. आजच्या ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या खुसखुशीत, विनोदी,मार्मिक आणि डोळ्यात अंजन घालून जाणाऱ्या या लेखांचा एक मोठा चाहता वर्ग आहे.त्यापैकी मी सुद्धा एक.फेसबुकवर प्रचंड गाजलेल्या याच लेखांचा एकत्रित संग्रह म्हणजे गढीवरून हे पुस्तक.राजा सरांचे अफलातून लेख एकाच ठिकाणी पुस्तक रूपातून वाचायला मिळणे म्हणजे वाचकांसाठी एक मोठी पर्वणीच होय.जेव्हा गढीवरून नामक कथासंग्रह येतोय याबद्दल माहिती मिळाली तेव्हा प्रचंड आनंद झाला.मुखपृष्ठ बघून तर फार भारी वाटलं.आजपर्यंत फक्त कल्पनेत रंगवलेला तंबूशेट अपेक्षेप्रमाणेच फार आवडून गेला.जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं तेव्हाच मागवून वाचायचं होतं पण काही कारणाने ते राहूनच गेलं.मग पुढे विशेष मराठी साहित्य संमेलनातून आवर्जून हे पुस्तक मैत्री प्रकाशनाच्या स्टॉलवरून खरेदी केलं आणि ते सुद्धा दस्तरखुद्द राजा गायकवाड सरांच्या सहीसोबत.जेव्हा तो आनंद झाला तो मी व्यक्त करू शकत नाही.सरांच प्रथमच पुस्तक,प्रथम आवृत्ती ती सुद्धा सरांच्या सहीसोबत ही माझ्यासारख्या साधारण वाचकासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
गढीवरून घरी आणल्यावर सर्वप्रथम मी काय केलं असेल तर त्यातील सर्व अफलातून चित्र बघितले,निहारले आणि
मग वर्षाच्या शेवटी दोन दिवसांत हे पुस्तक वाचून पूर्ण केलं.मुळात मी नवीन वर्षांचा स्वागतच गढीवरून वाचून केलं जे माझ्या कायम स्मरणात राहणार आहे.गढीवरून पुस्तकातील काही लेख मी आधी वाचले होते तर अनेक वाचायचे राहून गेले होते ते मला या पुस्तकातून वाचायला मिळाले.गढीवरून मधील प्रत्येक लेख मनाला स्पर्श करून गेला.काही कथांनी मला पोट धरून हसायला भाग पाडले,तर काहींनी मला सुन्न केलं तर काहींनी रडायला भाग सुद्धा पाडलं.विनोदी लिखाण असलं तरीही भरपूर शिकण्यासारखं, विचार करण्यासारखं मला "गढीवरून "या पुस्तकात सापडलं.
लेखक आपल्या मनोगतात म्हणतात की .....
'मराठीत मुख्यतः मध्यमवर्गीयांचे भावविश्व दाखविणाऱ्या कथा आल्यात.नंतर दलित साहित्य आले . शेतकरी , मजूर व कष्टकरी यांच्या आयुष्यातील हिंदोळे दाखवणारे चित्रण झाले . तथापि महाराष्ट्राच्या समाजरचनेतील प्रभावी घटक असणारा देशमुख , पाटील या जमिनदारांच्या घरातील कोणी क्वचितच त्यांच्या भावविश्वाबद्दल लिहीले . देशमुख , पाटील हा मुख्यतः व्हिलनच असतो अशा तर्हेने आम्हाला रंगवले गेलेय . तथापि आमचेही वेगळे भावविश्व आहे , आमच्याही आयुष्यात सुखदुःखे आहेत , माणुसकी , जिंदादिली , प्रेम , वैर , राग - लोभ , खोडकरपणा , इरसाल वृत्ती , रसरशीतपणा आहे ही बाजू मराठी साहित्यात अभावानेच आलीय . या संग्रहात त्याचे प्रतिबिंब आपणास वाचायला मिळेल.
तर हे तंतोतंत खरे आहे आणि याची प्रचिती आपल्याला पुस्तक वाचत असताना येते.महाराष्ट्रातील समाज रचनेतील देशमुख,पाटील या महत्वपूर्ण घटकाचा एक वेगळाच भावविश्व आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळतो.पुस्तकातील काही कथांमध्ये फँटसीचा वापर सुद्धा बखुबीने केला गेला आहे.जो वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो.पुस्तकातील कोणतीही कथा आपल्याला कोठेही बोअर करत नाही.कोणतीही कथा उचला आणि वाचत बसा.त्यातून तुम्हाला काहीतरी वेगळंच मिळेल हे नक्की.
बालाजी सुतार सरांच्या भाषेत सांगायचं म्हटल्यास मुळात या कथा नसून 'गोष्टी' आहेत,हिंदीमध्ये ज्याला "किस्सागोई म्हणतात तसला हा प्रकार आहे.आणि राजा गायकवाडांना किस्सागोईची जबरदस्त जाण आहे . आपल्याला काय सांगायचं आहे याचं पक्कं भान त्यांना आहे . आपली गोष्ट ' सांगण्यातूनच ' अधिक रंगू शकते , हे त्यांना स्पष्टपणे माहित असल्यामुळे या सगळ्याच कथांचा घाट फड रंगवणाऱ्या अघळपघळ कथनाचा आहे . असा फड रंगतदार होण्यासाठी आवश्यक असतो तसा अतिशयोक्त विनोदाचा , क्वचित त्यापलीकडे जाऊन फँटसीचाही मजबूत आधार घेत घेत ही गप्पाष्टके राजाभाऊंनी रंगवली आहे..
मी सरांशी अगदी सहमत आहे.यात कुठलाही वाद नाही.लेखकांना नेमकं काय म्हणायचं आहे याची त्यांना जाण आहे.त्यामुळे प्रत्येक कथा ही खूप बोलकी आणि आपलं प्रभाव पाडणारी आहे.एकूण 75 कथा असल्या तरीही आपल्याला त्या कमीचं वाटतं असतात.कारण पुस्तकातील प्रत्येक कथा ही जबराट आणि अफलातून आहे.सरकार साहेब या कथेपासून सुरू होणारा या पुस्तकाचा प्रवास कधी शेवटच्या "अब्राहम लिंकनचे पत्र"पर्यत पोहोचून समाप्त होतो हे आपल्याला कळतं सुद्धा नाही..काही कथांमध्ये थोडफार योग्य त्या ठिकाणी अश्लीलतेचा तडका मारलेला असला तरीही तो कोठेही खटकतं नाही हे विशेष.आपल्या विनोदी लिखाणातून असंख्य बाबीवर लेखकांनी जी सणसणीत कानशिलात लगावली आहे ती माझ्या मनाला खूप भावून गेली.
"सरकार साहेब "या पहिल्याच कथेत ...
"केवळ खानदानीपणाच्या हट्टापायी आपल्या मुलीच्या भविष्याबद्दल काहीही विचार न करता तिचं एका चुकीच्या माणसासोबत लग्न लावून देणाऱ्या त्या असंख्य वडिलांबद्दल आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आपल्या स्वाभिमानी बहिणीच्या हातात वीस हजार रुपये देऊन लेखक तिला म्हणतात
" पोरी , घरी गेल्यावर पहिलं एक काम कर . तुमच्या घरातील सगळ्या वंशावळी , इतिहासाची पुस्तकं जाळ , ते मिशी आणि पगडीवाले फडा काढलेले फोटो चुलीत घाल .. आणि माझ्या भाचरांना डॉ .आंबेडकर वाचायला दे . सुखी होशील !
हे वाचून तर खूप खूप भारी वाटलं.यातून एक मोठा संदेश लेखकांनी दिला आहे.तर इतर वेगवेगळ्या कथेतून वेगवेगळ्या बाबी/गोष्टींवर लेखकांनी योग्य ते ताशेरे ओढले आहेत.समाजातील गुण -अवगुणांवर बोट ठेवलं आहे जे कळत/नकळत विचार करायला भाग पाडून जातात.अनेक कथेतून वास्तविकतेचा दर्शन सरांनी वाचकांना घडवलं आहे..एकंदरीत हे पुस्तक महत्वाचं आणि प्रत्येकांनी वाचायला हवं असं आहे.मुखपृष्ठ,मनोगत,प्रस्तावना,आत रेखाटलेली चित्रे सर्वकाही उत्कृष्ट आहेत.राजा गायकवाड सरांचे सर्व लेख एकत्रित आणून त्याला पुस्तकरूप देण्यासाठी प्रकाशिका मॅमच कौतुक करायला हवं.कारण या विषयावर पुस्तक येणं महत्वाचं होतं.आगामी काळात गढीवरूनचं नाव दर्जेदार विनोदी पुस्तकांच्या यादीत अग्रणी असेल एवढं नक्की आणि याची मला पूर्ण खात्री आहे.
बाकी मी काही विशेष काही लिहीत नाही.असंख्य जणांनी यावर भारी लिहलं आहेच.शेवटी पुस्तकातील प्रस्तावनेतील काही भाग मी येथे देतोय जे एखाद्या नवीन वाचकाला सुद्धा हे पुस्तक वाचण्यासाठी नक्की प्रवृत्त करणार आहे.
बालाजी सुतार सर लिहितात...
कृषी - परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराशा उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत , असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक - सामाजिक - सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हा घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत . आपलं वर्तमान केवढं अशक्त आहे , यापेक्षाही आपला इतिहास केवढा दिव्य होता , हेच सांगण्यात ज्यांना कृतकृत्यता वाटते , किंवा आपण स्वतः किती कर्तृत्वहीन आहोत ही गोष्ट साफ नजरेआड करून आपल्या पणजोबांच्या काळात आपल्या गढीवर केवढी जबरदस्त सरदारी होती , याच्या खऱ्याखोट्या कथांमध्ये रमून त्या सरदारीचे अवशेष विकून खात राहणं आणि त्यालाच ' खानदानीपण ' म्हणत राहणं , यातलं विदारकत्व राजाभाऊ विनोदाच्या - उपरोधाच्या - उपहासाच्या माध्यमातून दाखवायला लागतात , तेव्हा ते सामाजिक अंगानेही फार महत्त्वाचं वाटत राहतं..
नक्की वाचा 💜
©Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा