प्रकाशवाटा ♥️
रात्री डॉ.प्रकाश बाबा आमटे लिखित "प्रकाशवाटा"हे त्यांचं आत्मकथन तिसऱ्यांदा वाचून पूर्ण केलं.आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारं हे पुस्तक माझ्या फार फार आवडीचं आहे.या आत्मचरित्रातून मला नेहमी खूप प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते.या पुस्तकातून आज पर्यत खूप काही शिकलोय आणि शिकत असतो.
आयुष्याकडे व आयुष्यातील येणाऱ्या समस्यांकडे बघण्याची एक नवीन दृष्टी मिळते.तर वेगवेगळ्या समस्यांवर मात करण्याची हिम्मत मिळते.
प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर.आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणीवर मात करतं सतत चालतं राहणे,मुळात हे फार कठीण काम असतं.हे काही सर्वांनाच जमतं नाही.आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी तर सर्वंच जगतात पण समाजातील दबलेल्या,कुचलेल्या आणि वंचित व दुर्लक्षित घटकांतील लोकांसाठी जगायला किंवा त्यांच्याबद्दल विचार करायला किती जणांकडे वेळ असतो ?
आज आपल्याला योग्य तो आहार आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात.पण त्या रानात मानवी वस्तीपासून कोसो दूर राहणाऱ्या आदिवासी समाजाचा काय ?त्यांच्यापर्यंत या बेसिक सुविधा खरंच पोहचतात का ?यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजपर्यंत कोणी किती आणि काय काय प्रयत्न केले आहेत ? हा प्रश्न आपल्यापैकी प्रामुख्याने किती जणांना पडतो ?त्या माणसांसाठी सुद्धा काही करायला हवं,त्यांना सुद्धा योग्य त्या सुविधा मिळायला हव्या.यासाठी आपण प्रयत्न करायला हवे असे किती जणांना वाटते ?
हे प्रश्न काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीला पडले होते.त्या व्यक्तिमत्त्वाचं नाव होतं,'थोर समाजसेवक बाबा आमटे".यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधायला सुरुवात केली आणि उत्तरे शोधून शांत न बसता त्यावर उपाय शोधून अंमलबजावणी सुद्धा केली.समाजातील कुष्ठरोगी,अंध,अपंग,कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं आहे. बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी १९४९ मध्ये "आनंदवनाची उभारणी केली. संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना या ठिकाणी आश्रय त्यांनी दिला.
येथेच न थांबता त्यांनी आपल्या पुढील पिढीला सुद्धा ही जबाबदारी दिली.
डॉ.प्रकाश आमटे यांनी "हेमलकसा"या अतिशय दुर्गम भागात जाऊन आदिवासी समाजासाठी कार्य करायला सुरुवात केली,आणि येथूनच सुरुवात झाली "लोकबिरादरी प्रकल्पा’ची.प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तल्या अनुभवांवर लिहिलेले अप्रतिम पुस्तक आहे. डॉ. बाबा आमटेंचे समाजकार्य अविरत पुढे चालू ठेवताना त्यांची दोन मुले डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास यांनी आपले आयुष्य देखील त्यांच्या या कार्यासाठी वाहिले. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी आहे “प्रकाशवाटा”.♥️
डॉ.प्रकाश आमटे म्हणतात :-
'आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबा आमटेंच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय, त्याची ही गोष्ट! म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट.'🌿
आमटे कुटुंबीयांनी ही जबाबदारी ज्याप्रमाणे पार पाडली त्याला खरंच हॅट्स ऑफ आहे.या पुस्तकातील असंख्य प्रसंग वाचत असताना डोळ्यातून पाणी येते तर काही वेळा गहिवरून येतं. त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव वाचत असताना सुन्न व्हायला होतं.आणि एकंदरीत माणूस म्हणून आपले कर्तव्य काय आहे ? हे आपल्याला या पुस्तकातून समजते.
सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात आला आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण अनेकांना प्रेरणाही देते.
आमटे कुटुंबीयांचा इथपर्यंतचा प्रवास हा खरंच सोपा नव्हता.त्यांना पावलोपावली असंख्य समस्यांना तोंड द्यावा लागला.असंख्य वेळा त्यांच्या जीवावर बेतलं होतं इथपर्यंत संघर्ष त्यांना करावा लागला.हे प्रसंग पुस्तकात विस्तृत वाचत असताना आपण थक्क होतो.हेमलकसा, गडचिरोली जिल्ह्यातील एक डोंगराळ भाग, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर असलेले प्रकाश आमटे आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी मंदाकिनी आमटे हे शहरातील आपले सुखी जीवन सोडून,आपल्या सहकार्यासमवेत हेमलकसामध्ये येतात त्यांची ही विलक्षण कथा प्रकाशवाटा पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते जी खऱ्या अर्थाने " समाजाचे आपण काहीतरी देने लागतो"या गोष्टीची आपल्याला जाणीव करून देते.
डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी हे दोघे गेली ४० वर्षे कोणतीही तक्रार न करता सगळ्या अडचणींवर मात करत हेमलकसा येथे आनंदाने काम करत आहेत.. त्यांना असे जगताना पाहून आयुष्य काय असते, याची खऱ्या अर्थाने जाणीव होते.."आदिवासी कधी जन्माला आणि कधी मेला याची कोणाला काही परवाच नसते".या पुस्तकांतून ही बाब अधोरेखित होते.पुस्तकातून आपल्या समाजातील अनेक गोष्टीवर प्रकाश आमटे भाष्य करतात.अंधश्रद्धा, रूढी-परंपरा,वृक्षतोड,आदिवासींचे जीवन व त्यांना न मिळणाऱ्या सुविधा,शिक्षण,आरोग्याचा तुटवडा व इतर अनेक बाबी आपल्याला वाचायला मिळतात..
डॉ. आमटे यांचे कार्य हे खूपच महान आहे.त्यांच्या पासून आपल्याला खूपच प्रेरणा मिळते आणि समाजासाठी कार्य करण्याची एक दिशा नक्कीच मिळते.❤️
नक्की वाचा...🌿♥️
©️Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा