द ओल्ड मॅन अँड द सी ♥️



1950 साली हेमिंग्वे लिखित या कादंबरीचा पुलं देशपांडे यांनी केलेला अनुवाद "एका कोळियाने"पूर्वी किमान दोन वेळा वाचलेलं होतं तर आता नुकतंच 'भारती पांडे" यांनी केलेला या सेम पुस्तकाचा अनुवाद सुद्धा वाचून पूर्ण केलं.तर आता लवकरच मुळ इंग्रजी पुस्तक सुद्धा वाचायला घेईन.कारण हे पुस्तक म्हणजे एक अप्रतिम असा प्रवास आहे,जो प्रत्येकाने करायला हवा.मुळात अनुभवायला हवा.यातून बोध घेऊन खूप काही शिकायला हवं आणि आयुष्यात ते रुजवायला हवं.🌿

या पुस्तकाच्या लेखकाला नोबेल पारितोषिक मिळाला होता आणि यामध्ये या कादंबरीचा मोठा वाटा होता असं म्हणू शकतो.या कादंबरीची कथा ही खूप उत्कृष्ट असून खूप काही शिकवून जाणारी आहे.जी वाचकाला आपल्या प्रेमात पाडते. साधी आणि सरळ वाटणारी ही शौर्य कथा खूपच रोचक आणि इंटरेस्टिंग आहे.एका कोळ्याच्या प्रवासाची, एका माशाबरोबरच्या आणि विशाल समुद्राबरोबरच्या त्याच्या एकाकी झगड्याची आणि जिंकूनही हरण्याची ही आगळी वेगळी कहाणी आहे.पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल एवढं नक्की.

ही कहाणी आहे पाश्चिमात्य गावात राहणाऱ्या सांतियागो नामक एका म्हाताऱ्या कोळीची.त्याच्या शेजारी राहणारा एक लहान मुलगा सोडला तर त्याची काळजी करणारा असं त्याला कोणीही नाही.सलग 84 दिवस या म्हाताऱ्या कोळ्याला समुद्रात एकही मासा सापडत नाही.यामुळे तो दुःखी होतो,पण तो हिम्मत मात्र हरलेला नाही.तो जिद्दीने पेटला आहे.याच जिद्दीने हा म्हातारा एक दिवस एक होडी घेऊन खोल समुद्रात दूरपर्यंत घेऊन जातो.आणि गळाला काही गावल्याशिवाय मात्र परत यायचं नाही असं तो ठरवतो.दिढ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर त्याला एक अफाट 18 फूट लांबीचा मासा सापडतो,जो त्याच्या होडीपेक्षा सुद्धा लांब असतो.सलग दोन दिवस भर समुद्रात एकटा स्वतःशी,माश्याशी आणि निसर्गाशी बोलत बोलत तो त्या मोठ्या माश्याशी झुंज देतो.आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून त्याच्यावर विजय मिळवतो आणि त्या माश्याला होडीच्या शेजारी बांधून परतीच्या प्रवासाला निघतो.पण वाटेत त्याला मात्र वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागतो.

आता...

पुढं म्हातारा काय करतो ? 

शेवटी तो मासा नेऊ शकतो की नाही ?

त्याच्या वाटेत येणारी ती संकटे नेमकी कोणती ?

तो किनाऱ्यावर माश्याला घेऊन सुखरूप पोहोचू शकतो का ?

तो मासा त्याचं नशीब बदलतो का ?

इत्यादी काही प्रश्नांची उत्तरे या कादंबरीत मिळतील.त्यामुळे आवर्जून वाचा आणि जाऊन या एका आगळ्या वेगळ्या प्रवासाला.❤️

©️Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ♥️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼