इजिप्सी ♥️
सुरुवातीला आपल्या अप्रतिम प्रस्तावनेत
लेखिका दिपा देशमुख मॅम लिहितात :-
हजारो वर्षांपूर्वीचे पिरॅमिड कुणी बांधले असतील, त्यांच्या आतली रचना, त्या वेळी प्रगत तंत्रज्ञान नसताना हे कसं शक्य झालं असेल, तिथल्या राजांचे / महत्त्वांच्या लोकांचे मृतदेह म्हणजेच ममी एका विशिष्ट तऱ्हेच्या पेटीत जतन का कराव्या वाटल्या असतील, ममीबरोबर सोनं-चांदी आणि हजारो वस्तू का ठेवल्या जात असतील, इजिप्शियन लोकांच्या चित्रविचित्र देव-देवता कशा होत्या, त्यांची हायरोग्लिफ नावाची अत्यंत क्लिष्ट अशी चित्रलिपी काय सांगू पाहत होती, आजवर तिथे होऊन गेलेले तीनशे फेरो म्हणजे कोण होते, त्यांचं महत्त्व काय, तुतानखामून कोण होता, रामसेस या फेरोचे असंख्य पुतळे का बांधले गेले, या फेरोचं काम काय होतं, नेफेर्तिती, हॅटशेपसूत आणि अनेक राण्या कशा होत्या, त्यांची वैशिष्ट्यं कोणती अशा अनेक प्रश्नांची उत्तरं 'इजिप्सी' वाचताना मिळतात.
आणि खरंच मुळात एवढंच कारण हे पुस्तकं वाचायला पुरेसं आहे.कारण या सर्व प्रश्नांची दिलेली उत्तरे ही खूप इंटरेस्टिंग आणि रोचक आहे.जे वाचणे एक वाचकांसाठी मेजवानीच ठरते.🌿
__________________★★____________________
तर दोन दिवसांपूर्वी नुकतंच प्रकाशित झालेल्या 'इजिप्सी'या अप्रतिम अश्या 622 पृष्ठसंख्या असलेल्या प्रवासवर्णनाचा एक अप्रतिम व भन्नाट प्रवास समाप्त झाला आणि ऑक्टोबर महिन्याची एकंदरीत "हॅपी एडिंग" झाली...हे पुस्तक वाचल्यापासून जणू मीच इजिप्तची सैर करून आलोय की काय ? असचं मला वाटतंय. मुळात अजूनही मी या पुस्तकाच्या त्या ऐतिहासिक आणि रोमांचक विश्वातच वावरतोय.या पुस्तकाने एक वेगळ्याच प्रकारची जणू मोहिणी माझ्या मनावर टाकली आहे.जी काही दिवस तरी अजिबात कमी होणारी नाही याची मला खात्री आहे..
कारण मला जेव्हा पासून थोडंफार वाचन केल्यावर समजलं तेव्हापासून इजिप्त/मिस्त्र आणि तेथील अफाट व रहस्यमयी गीजा येथील पिरॅमिड हा माझा नेहमीच कुतूहल आणि आवडीचा विषय राहिलेला आहे. आणि जोपर्यंत याबद्दल काही कुतूहल असणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तर मिळतं नाही तोपर्यंत तरी हा कुतूहल टिकून राहणार आहे....
तर याच कारणाने भविष्यात मला भेट द्यायच्या पाश्चात्य देशाच्या यादीत "इजिप्त" हा देश नेहमी अग्रणी राहिलेला आहे. मला आयुष्यात एकदा तरी डोळ्यांनी ते भव्य पिरॅमिड बघायचे आणि न्याहाळायाचे आहेत.पण त्याआधी मला या संबंधित मिळेल ते सर्वकाही वाचायचं आणि बघायचं आहे... (जाऊ तेव्हा जाऊ ,सध्या याबद्दल वाचून तरी घेऊ.)
मी आतापर्यंत मीना प्रभु यांच अफलातून असं "इजिप्तायन , सुनील अत्रे व डॉ. अच्युत बन या दोन्ही लेखकांच 'पिरॅमिडच्या देशात', पॉल ब्रन्टन यांच 'रहस्यमय इजिप्तचा शोध' आणि टॉम मार्टिन ची 'पिरॅमिड' इत्यादी काही पुस्तके वाचली होती.तर आता नुकतंच प्रकाशित झालेलं रवि वाळेकर सरांचं 'इजिप्सी' हा शानदार प्रवासवर्णन वाचून हातावेगळं केलं.आतापर्यंत याबद्दल काही पोस्टी वाचून जाम उत्सुकता लागलेली होती.
ती अखेर समाप्त झाली...
काही दिवसांपूर्वी हे जाड-जुड आणि नवं-कोर पुस्तकं हाती आलं.सुरुवातीला अप्रतिम असं मुखपृष्ठ, लेखकांनी आपल्या मोबाईलने काढलेले आतील रंगी-बेरंगी फोटोस,लेखकाचं सुंदर मनोगत आणि वीणा देशमुख मॅमची अप्रतिम अशी प्रस्तावना वाचून जाम भारावून गेलो.आणि 4 दिवसांतच हा प्रवास पूर्ण केला..मी जसं आणि जेवढं अपेक्षित केलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने हे पुस्तकं मला प्रचंड आवडलं आणि मनाला भावून गेलं.कारण खरंच,एका जिप्सीने केलेली इजिप्त देशाची गूढ, रम्य सफर ! अतिभव्य पिरॅमिडस, ऐतिहासिक अलेक्झांड्रिया शहर, सुप्रसिद्ध सुएझ कालवा, गूढ स्फिंक्स या सगळ्या अनाकलनीय गोष्टींचा उत्कंठावर्धक प्रवास वाचकांसाठी घडवून आणणारं हे पुस्तक आहे.जे फक्त वाचावं आणि वाचतचं जावं असं आहे !!
यामध्ये मला सर्वांत जास्त काही आवडलं असेल, तर ती लेखकाची खुमासदार आणि भन्नाट लेखन शैली ही होय.जी प्रत्येक वाचकांला आपल्या प्रेमात आणि मोहात पाडायचं काम करते.पुस्तकात पावलोपावली लेखकांने मारलेले मराठी पंचेस तर भन्नाट आहे,जे कधी आपल्याला खळखळून हसवतात,तर कधी अंतर्मुख करून विचार करायला सुद्धा भाग पाडतात.. लेखकाचं मस्तमौला/मिष्कील स्वभाव त्यांच्या लिखाणात झळकतो.जो वाचत असताना शेवटपर्यंत आपल्या चेहऱ्यावर समाधान आणि स्मित टिकवून ठेवतो..लेखकांनी इजिप्त मध्ये आजूबाजूला डोळ्याने जे काही बघितलं त्याचे वर्णन खूपच अफलातून पद्धतीने केले आहेत.काही वर्णन वाचून तर लेखकाच्या निरीक्षणाची तारीफ करावीशी वाटते.यामध्ये विशेष म्हणजे "झोला उठावो और चल पडो"असं लेखकांनी केलं नाही.तेथे जाण्यापूर्वी त्यांनी या देशाचा आणि स्थापत्याचा सखोल अभ्यास केला आणि तो अभ्यास आपल्याला संपूर्ण पुस्तकातून झळकतो.
622 पेजेस वाचत असताना आपल्याला कोठेही थोडा सुद्धा कंटाळा येत नाही ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे..जणू आपणच लेखकांसोबत फिरतोय,संवाद साधतोय असं आपल्याला अनेक वेळा वाटून जाते.या प्रवासवर्णनात इजिप्त या देशाची सफर तर वाचायला-अनुभवायला मिळतेच, पण इजिप्त आणि येथील विविध गोष्टींबद्दल खूप काही महत्वपूर्ण ज्ञान सुद्धा मिळतो.येथील रहस्यमय आणि रोचक इतिहास माहिती होतोच व त्याबरोबर तेथील सामाजिक,धार्मिक आणि आर्थिक बाबी सुद्धा आपल्याला समजतात.एकंदरीत इजिप्त बद्दल काहीही माहिती नसणाऱ्या एखाद्या वाचकाने हे पुस्तकं वाचलं तरीही त्याला या पुस्तकातून बरीच माहिती मिळून जाते.एखाद्या नवख्या प्रवाशाला हे पुस्तक एका गाईड सारखं मार्गदर्शन करतं एवढं मात्र खरं !
आज इजिप्त आणि पिरॅमिड जणू एक समीकरण झाले असले तरीही,लेखक म्हणतात :-
"इजिप्त म्हणजे फक्त पिरॅमिड्स नाही. इजिप्तमध्ये अनुभवण्यासारखे बरेच काही आहे. इजिप्तला जाऊन फक्त पिरॅमिड बघून परतणे म्हणजे डिशभर खमंग चिवड्यातून फक्त एक शेंगदाणा उचलून तोंडात टाकल्यासारखे आहे...
आणि हे पुस्तक वाचल्यावर हे तंतोतंत पटून जाते.कारण आपण कधीही न ऐकलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती मिळते.आणि आपण अजून पुन्हा जास्त इजिप्तच्या प्रेमात पडतो.
इजिप्त बद्दल लेखक म्हणतात :-
ज्यांना प्रवासाची आवड आहे, त्यांनी इजिप्तला जावे. ज्यांना इतिहासात रुची आहे, त्यांनी इजिप्तला जावे. ज्यांचे मन पुरातन वास्तूंमध्ये रमते, त्यांनी इजिप्तला जावे. ज्यांना भव्यता भावते, त्यांनी इजिप्तला जावे. ज्यांना प्राचीन संस्कृतीविषयी आकर्षण आहे, त्यांनी इजिप्तला जावे. ज्यांना स्थापत्यशास्रात रस आहे, त्यांनी इजिप्तला जावे, ज्यांना अद्भुततेची आवड आहे, त्यांनी इजिप्तला जावे. ज्यांना अवाक व्हायला आवडते, त्यांनी इजिप्तला जावे. . .
खरे तर, ज्यांना शक्य होईल, अशा प्रत्येकानेच इजिप्तला जावे !
लेखकांनी प्रवास करता करता इजिप्तला एक पूर्ण फेरी मारली आहे.सलग एक महिना त्यांनी इजिप्तची काहीही न ठरवता सफर केली त्यामुळे त्यांना अनेक नवे अनुभव मिळाले. दुसऱ्या दिवशी कुठे जायचे, हे लेखक आदल्या रात्री ठरवायचे.राजधानी असलेल्या कैरो शहरापासून उत्तरेकडे अलेक्झांड्रिया शहरात, तिथून पूर्वकडे पोर्ट सैद येथे, नंतर सुएझ, तिथून दक्षिणेत आस्वान नामक ठिकाणी, अगदी इजिप्तचे शेवटचे टोक असलेल्या अबू सिम्बेल इथपर्यंत, मग परत वरती येत लक्सोर येथे आणि तिथून परत कैरोला ! असा अप्रतिम प्रवास लेखकांनी केला आणि तेवढ्याचं भन्नाट शब्दांत त्यांनी तो पुस्तकात मांडलेला आहे.या प्रवासात त्यांनी त्यांना माहिती असलेली स्थळे तर अनुभवलीच, पण काही नव्या स्थळांचेही त्यांना दर्शन झाले. भारतात असताना माहितीही नसलेल्या सक्कारा, बाल्टीम, पोर्ट फुआद सारख्या नव्या गावांमध्ये त्यांचे मुक्काम घडत गेले. प्रवासात माणसे जोडली.फक्त स्थानिकच नव्हे तर अगदी पोलंड, घाना सारख्या देशातीलही नवे मित्र इजिप्तमध्ये आणि इजिप्तमुळे लेखकांना मिळाले...
एकंदरीत इजिप्सी मध्ये सर्वकाही आहे.रोमांच,भटकंती, आपुलकी,रहस्य,प्रेम,माणुसकी आणि विनोद इत्यादी सर्वकाही.यातील प्रत्येक प्रकरण विशेष आहे आणि त्याच्या नावावरूनच तो मजेशीर वाटतो.एक प्रकरण संपल्यावर पुढील प्रकरणात काय असणार याची सारखी उत्सुकता लागलेली असते.
दिपा मॅम म्हणतात :-
इतकं मोठं पुस्तक असूनही पानोपानी काहीतरी विशेष आहे. कधी माहीत नसलेल्या माहितीचं भांडार, तर कधी हलकासा विनोद, कधी मनुष्यस्वभावाचे चित्रविचित्र पैलू, तर कधी आजच्या शहराचं बदललेलं रूपडं, कधी मानवाने निर्माण केलेले अविश्वसनीय आविष्कार हे सगळं अनुभवणं म्हणजे एक थरार आहे, एक खिळवून ठेवणारं नाट्य आहे, संपूच नये असं वाटणारी एक सुहानी सफर आहे.
खरंच मराठी साहित्य विश्वात हा प्रवासवर्णन मैलाचा दगड ठरेल एवढं नक्की.इजिप्सी हे मराठीतील सर्वात मोठे प्रवासवर्णन आहे. एक देश,एकांडा शिलेदार..३६८८ किलोमीटर,१३ स्थळे, ३० तंबू..अंतर्बाह्य पिरॅमिड्स, मंदिरे आणि बरेच काही..हिजाब, सिगारेट, मांजरी आणि बरेच काही..
बरेच कायच्या कायी,
आणि बरेच बरेचसे काही..यामध्ये आहे.
त्यामुळे सर्वांनी आवर्जून वाचून या सुंदर प्रवासाला नक्की जाऊन यावे..
शेवटी इजिप्सी कोणी वाचावे व का वाचावे हे स्वत:लेखकांच्या भाषेत सांगायचे असल्यास :-
ज्यांना 'विश्वचि माझे घर' असं वाटतं,
ज्यांना जगभराची सैर करावी वाटते,
ज्यांना कुतूहलाचा ध्यास
आणि ज्ञानाची आस आहे, ज्यांना अद्भुताची ओढ
आणि इतिहासाचं प्रेम आहे,
ज्यांना मानवी कर्तृत्वाचा अभिमान
आणि उत्तुंगतेचा शोध आहे,
अशा सगळ्यांनी इजिप्सी वाचलंच पाहिजे.
इतकंच नाही, तर एखाद्या देशाची
लोकसंस्कृती कशी टिपावी,
मैत्र कसं जोडावं,
आपलं नातं विश्वाशी कसं असावं,
इजिप्सी वाचायलाच हवं.♥️
नक्कीच वाचा
चुकवू नका...🌿
©️Moin Humanist♥️
Best
उत्तर द्याहटवा