मी अल्बर्ट एलिस ♥️
डॉ.अंजली जोशी लिखित डॉ.अल्बर्ट एलिस यांच्या जीवनप्रवासाचा व व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेणारी ही आत्मचरित्रात्मक कादंबरी प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी आहे.
अमेरिकेतील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अल्बर्ट एलिस यांच्या जीवनावर लिहलेली ही मराठीतील दर्जेदार कादंबरी मी 2 दिवसांपूर्वी परत एकदा वाचून संपवली.आणि पुढे भविष्यात सुद्धा वेळोवेळी मी ही कादंबरी वाचत राहणार आहे एवढं नक्की.कारण प्रत्येक वेळी या कादंबरीतून नवीन आयाम,अर्थ आणि तत्वज्ञान उमजत, समजत जाणारं आहे.आपल्या आयुष्यातील असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला या कादंबरीतून मिळत जातात.अगदी सोप्या व मुद्देसूद भाषेत जीवनाचा मूलभूत तत्वज्ञान आणि मानसशास्त्राची एक रोचक आणि भन्नाट सफर घडवून आणण्याचं काम ही कादंबरी खूपच उत्कृष्ट पद्धतीने करते.डॉ.एलिस सरांची असामान्य बुद्धिमत्ता,बालवयातलं प्रगल्भ वाचन , तत्त्वज्ञानाचा त्यांनी केलेला गाढ अभ्यास , शारीरिक दुर्धरतेवर त्यांनी केलेली मात आणि मृत्युपर्यंत अखंड कार्यरत राहून बुद्धिनिष्ठतेची कास न सोडण्याचा त्यांचा कणखरपणा , हे सर्वच लेखिकेप्रमाणे आपल्याला सुद्धा विलक्षण आणि थक्क करून सोडणारा आहे.
एलिस सरांचा एकंदरीत खडतर आणि प्रेरणादायी आयुष्य,त्यांचे विवेकनिष्ठ विचार आणि झुंझार व्यक्तिमत्वाचा आढावा या अफलातून कादंबरीतून घेण्यात आला आहे.जो खूपच वाचनीय असून खूप काही शिकवून जाणारा आहे.आपला आयुष्य,समाज आणि विश्वाकडे बघण्याचा एकंदरीत दृष्टिकोन ही कादंबरी बदलून टाकते.'अल्बर्ट एलिस यांच्या "माझं जीवन हाच माझा संदेश आहे" या उद्गारांमधील यथार्थता या कादंबरीच्या प्रत्येक पानातून दिसून येते.
अल्बर्ट एलिस ते मानसोपचारतज्ज्ञ डॉ.अल्बर्ट एलिस होण्यापर्यंतचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास या कादंबरीतुन वाचकांसमोर सादर करण्यात आला आहे.एलिस सरांच्या जीवनात घडलेल्या केवळ घटना व त्यांचा जीवनप्रवासच या कादंबरीत मांडण्यात आला नसून त्यापलीकडे जाऊन त्या त्या वेळी त्यांनी घडलेल्या त्या घटनांना दिलेल्या मानसिक प्रतिक्रियांचा मागोवा सुद्धा या कादंबरीत घेण्यात आला आहे. त्यांचं जीवन-तत्वज्ञान त्यांच्याच जीवनप्रवासातुन दाखवण्यात आला आहे.1993 ते 2007 या कालखंडातला त्यांचा मानसिक प्रवास या कादंबरीत रेखाटण्यात लेखिकांना कमालीचं यश आलं आहे..
एक 9 वर्षांचा मुलगा तो सुद्धा असा की ज्याला वयाच्या केवळ 5 व्या वर्षांपासून किडनीचा आजार(नेफ्रायटीस) झालेला. त्याला लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आई-वडील असूनही नसल्यासारखेच, ते कधी त्याला भेटायलाही येत नसत.असा हा छोटा मुलगा परिस्थितीशी झगडून जगत असतो,प्रचंड संघर्ष करतो, पुस्तकांना आपला खरा मित्र मानून त्यांचे वाचन सुरू करतो आणि उच्चशिक्षित होतो.त्याला कुतूहल असलेल्या प्रत्येक गोष्टीचा तो ज्ञान घेतो.आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो पुस्तकांत शोधतो.असे करता करता तो अनेक प्रबंध,पुस्तके लिहितो पण त्याला हवे तसे यश काही मिळत नाही.त्यांच्या आयुष्यात असंख्य अडचणी,संकटे येत राहतात.तो त्यांना न जुमानता फक्त लढत राहतो.आणि पुढे हाच मुलगा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मानसोपचारतज्ज्ञ होतो.आज जगभरात प्रसिद्ध असलेल्या Rational Emotive Behavior Therapy - (विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीचे ) प्रणेते व प्रवर्तक डॉ. अल्बर्ट एलिस हाच तो मुलगा.जो असंख्य संकटाचा सामना करत करत इथपर्यंत पोहोचतो आणि एक वेगळी ओळख निर्माण करतो.यांच्या मानसशास्त्रावरील विचार व सिद्धांत यांचा अभ्यास करून, त्यांनी मांडलेलं विवेकी आणि मानवतावादी तत्वज्ञान त्यांच्या जीवनपटाद्वारे सोप्या शब्दांत सांगणारी ही एक आत्मचरित्रात्मक कादंबरी खऱ्या अर्थाने Must Read आहे.
■ मला आवडलेले विचार व मी यातून शिकलेल्या काही बाबी/गोष्टी खालीलप्रमाणे...♥️
◆भीतीच न वाटणं म्हणजे धैर्य नव्हे; तर वाटलेल्या भीतीवर प्रयत्नपूर्वक मात करणं म्हणजे धैर्य !
◆ No one can insult you without your permission !
◆एखाद्या माणसाचं बोलणं मनाला लागणं असं म्हणणं म्हणजेच तो माणूस जे बोलेल ते खरं मानणं होय ! जर त्या माणसाच्या बोलण्याला वस्तुस्थितीचा आधार असेल, तरच ते खरं मानावं ! जर असा आधार नसेल तर ते खरं मानण्याची गरजच नाही !
◆कुठल्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं असेल, तर त्या गोष्टीसंबंधी शक्य तेवढं सखोल ज्ञान संपादन करायला पाहिजे; त्यासाठी खूप वाचलं पाहिजे आणि खूप विचार केला पाहिजे.
◆No Matter Even If People May Reject You Or Your Views, You Should Never Reject Your Totality !
◆कुठलीही परिस्थिती अगदी संपूर्णतः वाईट नसते, त्यातून काहीतरी चांगलं निघतंच ! आवडत नसलेल्या परिस्थिती मधूनही काहीतरी चांगलं निघू शकतं हे आपल्याला समजायला हवं.
◆नीती म्हणजे काय ?
समाजात सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणावीत अशी तत्व म्हणजे नीती !
◆ कुठलीही समस्या उभी ठाकली, की सर्वप्रथम आपण समस्येबाबत स्वतःला अस्वस्थ करून घेतो. मग आपण असं अस्वस्थ होता कामा नये, असं स्वतःला सांगून आपल्या अस्वस्थतेत आणखी भर घालतो. त्यामुळे आपली मूळ समस्या अस्वस्थतेच्या विळख्यात अडकून पडते. यालाच 'Disturbance About Disturbance' असं म्हणतात ! समस्येवर उपाय करायचा असेल, तर प्रथम तिला अस्वस्थतेच्या विळख्यातून मुक्त केलं पाहिजे.
आपल्याला इतर कशाची भीती वाटण्यापेक्षा भीतीचीच भीती वाटत असते !
◆आपली एखादी इच्छा कितीही तीव्र असली तरीही ती केवळ इच्छाच असते. ती आपली इच्छा आहे म्हणून ती पूर्ण व्हायलाच हवी असा अट्टहास म्हणजे निव्वळ मूर्खपणा असतो.
◆माणूस हा त्याच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होत नाही, तर त्या घटनांकडे ज्या दृष्टिकोनातून तो पाहतो तो दृष्टिकोन त्याला अस्वस्थ करतो.
◆कोणत्याही कामाच्या बाबतीत चालढकल केली, तर कटकटींमधून तात्पुरती सुटका होते. पण त्यामुळे दूरवरच्या हितावर पाणी पडतं. म्हणूनच नजिकच्या आनंदापेक्षा, दूरवरच्या हिताचा विचार करणं अधिक श्रेयस्कर आहे.
◆इतरांवर विसंबून राहिलं की त्याची मदत होण्याऐवजी त्रासच जास्त होतो. त्यापेक्षा होतील तेवढी कामं स्वतःच करणं अधिक परवडतं !
©Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ♥️
मस्त लिहिलंय.. हे पुस्तक बरेच दिवसा पूर्वी वाचले होते परत वाचनार आहे
उत्तर द्याहटवा