वाट तुडवताना ♥️
मी 'रोज एक पाटी शेण गोळा करतो, मग देशील पुस्तक ?'
आई :- 'आरं शेणकुट्याचं पैसं पुस्तकावर उधळलास तर खाशील काय?
या दोन प्रश्नांच्या सोबत वाढणारं लेखकाचं हे मन आहे. या दोन प्रश्नांच्या संघर्षातला आलेख त्यात आहे. या दोन प्रश्नांमधल्या दोन भुकांनी जळणासाठी त्याला उकीरडे शोधायला लावले आहेत, चिखल वाहायला लावले आहे, डिंक गोळा करायला लावला आहे, खांद्याला घट्टे पडेपर्यंत पाणी वाहायला लावले, हमाली करायला लावली, आतडी जाळण्यासाठी भुताचा नैवेद्य खायला लावला, नळाला तोंड लावून भुकेवर मारा करून घेतलेला आहे, सायकलीचे पंक्चर काढले आहेत, पेपरचे गठ्ठे बांधून बसमध्ये टाकले, बुक बाइन्डिग केले, कंपाउंडर म्हणून काम केले, आणि 'भाकरी युगाचा शाप' कशी बनली आहे हे अनुभवले. भाकरीचा अभावसुद्धा त्याचे अर्थपूर्ण स्वेतर होऊन गेला. या अभावाने त्याला पुस्तकांपासून दूर ठेवले. पण एक भूक दुसऱ्या भुकेची भूक वाढवत असते; या न्यायाने त्याची पुस्तकांविषयी भूक तीव्र होत गेली.🌱
उत्तम कांबळे हे लेखक माझ्या काही निवडक आवडीच्या लेखकांच्या यादीत नेहमी अग्रणी असतील.यांच्या लिखाणाचा मी फार चाहता आहे.सरांनी लिहलेलं सर्वकाही मला आवर्जून वाचायचं आहे.आतापर्यंत मी वाट तुडवताना, आई समजून घेताना, कुंभमेळ्यात भैरू,देवदासी व नग्नपूजा,फिरस्ती,तिरंग्यातून गेला बाप,श्राद्ध ,कथा माणसांच्या इत्यादी काही पुस्तके वाचलेली असून इतर सुद्धा लवकरच वाचून काढणार आहे.फक्त वाचणार नाही तर समजून उमजून घेऊन त्यावर विचार सुद्धा करणार आहे. कारण या लेखकाचं प्रत्येक पुस्तक हे वाचकाला अंतर्मुख करून एकदम खोलमध्ये जाऊन विचार करायला भाग पाडतं असतं.उत्तम सरांच्या लिखाणाला खरंच तोड नाही.सरांचं प्रत्येक पुस्तक वेगळं आणि भन्नाट असतं.
यापैकी "वाट तुडवताना आणि कुंभमेळ्यात भैरू" हे माझी दोन्ही आवडती पुस्तके आहेत.
तर आज मी यापैकी माझ्या खूप आवडत्या एका आत्मकथनाबद्दल माझं अनुभव शेअर करतोय.हा आत्मकथन मी एकूण 4 वेळा वाचला असून प्रत्येक वेळी मला यातून काहीतरी नवीनचं गवसलं आहे.हे आत्मकथन मला खूप रिलेट होतो आणि कायम वाचत राहण्याची प्रेरणा देऊन जातो.या पुस्तकातून आपल्याला अवांतर वाचन व ग्रंथाचे महत्व कळते तर वाचायला आणि वाचत राहायला सकारात्मक प्रेरणा मिळते.ग्रंथाने माणूस कसा घडतो आणि पुस्तके माणसाला कशाला बदलून टाकतात याचं एक उत्कृष्ट उदाहरण उत्तम कांबळे आहेत.त्यांच्या आयुष्याच्या या खडतर प्रवासात त्यांना पुस्तकांनी कशाप्रकारे तारलं हे वाचून फक्त थक्क व्हायला होतं.आतापर्यंत मी वेगवेगळ्या लेखकांचे असंख्य आत्मचरित्र-आत्मकथने वाचले असतील.पण शरद बाविस्कर सर यांच भुरा व उत्तम कांबळे सरांचं "वाट तुडवताना" हे दोन आत्मकथन मला प्रचंड आवडून आणि ग्रंथप्रेम शिकवून गेले.शिक्षणाचं आणि अवांतर वाचनाचं महत्व यातून मला नव्याने समजलं.
आत्मकथनाच्या शेवटी जेव्हा लेखक म्हणतात :-
माझ्या जगण्यात ग्रंथांचा वाटा प्रचंड मोठा मोजता येणार नाही इतका मोठा. माझ्यावर सावलीही ग्रंथांची आणि माझे हातही ग्रंथांच्याच हातात..मोठ्या विश्वासानं गुंतलेले...
मला_वाचण्यासाठी_अजून_वाचायच_आहे...♥️
हे वाचून कमालीचं भारी वाटतं आणि तंतोतंत पटून जातं.कारण या पुस्तकाच्या प्रत्येक पानातून लेखकाचं पुस्तक प्रेम झळकत राहतं.🌱
वाट तुडवताना हे 221 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक प्रत्येक सुजान नागरिकाने वाचायलाचं हवं असं आहे.मुळात हे पुस्तक आत्मचरित्र म्हणून लिहलं गेलेलं नाही,तर प्रस्तुत पुस्तकातून लेखकांच्या वाचन संस्काराचा एक आलेख वाचकांसमोर यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हे पुस्तक लिहिल्या गेलं आहे.जे खऱ्या अर्थाने फारच वाचनीय झालं आहे."ग्रंथ माणसांना घडवतातच असा ठाम विश्वास बाळगून "स्वतःची वाट तुडवत निघालेल्या एका भन्नाट वाटसरूची ही कथा आहे.हा वाटसरू आपल्या आजूबाजूला डोळसपणे बघतो,चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवतो,धडपडतो आणि आपल्याला पडलेल्या असंख्य प्रश्नांचे उत्तरे पुस्तकात शोधतो..
हे आत्मकथन वाचत असताना लेखक-निवेदक आपल्या डोळ्यादेखत आकारित होतो आहे असे सतत जाणवत राहते.
आपल्या निरीक्षणाच्या नोंदी मध्ये प्रभाकर बागले सर म्हणतात :-
श्री. कांबळे यांचे हे आत्मकथन दलित आत्मकथेच्या परंपरेला महत्त्वाच्या वळणावर आणून ठेवणारे आहे. त्या परंपरेला नूतनीकरणाची संधी उपलब्ध करून देणारे आहे. आणि या वळणावर जो दिशा बदल होत असतो त्याचा आरंभ बिंदू होण्याचे श्रेय त्याच्याकडे जाईल, असे ते वाचत असताना वाटते. कारण एक दलित मुलगा समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहापर्यंत येतो. त्या प्रवाहात खंबीरपणे उभं राहतो, स्वतःच्या जातीच्या जीवन प्रवाहाकडे आणि मुख्य प्रवाहाकडे पाहतो, अनुभव घेतो, आपली कार्यक्षमता सिद्ध करून पत्रकार, संपादक बनून पत्रकारिता या व्यवस्थेचा भाग बनतो.
हे आत्मकथन दलित-आत्मकथनाला एका वेगळ्या वळणावर आणून ठेवते, ते या अर्थाने की त्यामध्ये वेशीच्या बाहेरचे आणि आतले जीवन यामध्ये अर्थपूर्ण देवाण-घेवाण दिसते आहे. मुख्य प्रवाहात स्वतःला ठेवून, दोन्ही प्रकारच्या जीवनाला संवादी ठेवण्यासाठी, तो संवाद विकसित करण्यासाठीची धडपड त्यात दिसते आहे. हे कथन संवादांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर संपर्क बिंदू म्हणून काम करताना दिसते. दारिद्र्यामुळे बसलेले चटके, झालेल्या जखमा वाचनप्रक्रियेत विसरून, वाचनातील संस्कार स्वीकारत, स्वतःला सक्षम करत वाचन संस्कारांचा एक आलेखच या कथनात दिसतो. हा विकसित होणारा आलेख दोन्ही समाजांना आपल्या अस्मिताविषयक संकल्पनेवर विचार करायला लावतो. दुरभिमानाकडे सहज कलणाऱ्या अस्मितेचे वास्तवमान संवादाच्या सातत्यासाठी कसे उपकारक असते, हे तो आलेख दाखवून देतो.♥️
तर ....
उत्तम कांबळे सर म्हणतात :-
ज्याला व्यवस्थेने इतिहास दिलेला नसतो, भूगोल दिलेला नसतो,चालण्यासाठी चांगला वर्तमानही दिलेला नसतो, अशा माणसांना ग्रंथ खूप उपयोगी पडतात असं माझं मत आहे.
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी ग्रंथांच्या गावात गेलो नसतो, तर
गावगाड्यातच राहिलो असतो. मला चार्वाक, बुद्ध, गांधी, आंबेडकर यांपैकी कोणीही दिसलं नसतं. त्यांच्या पाऊलखुणाही दिसल्या नसत्या. माझी स्वतःची ओळख सांगण्यासाठी शब्दही मिळाले नसते. मी तसाच राहिलो असतो - बिनचेहऱ्याचा...!
वाट गमावलेला...🌿
आणि हे अगदी खरं आहे...♥️🌱
नक्की नक्की वाचा...🌱🌿
©️Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके
We Read
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा