मऱ्हाटा पातशाह ♥️
'मऱ्हाटा पातशाह' एवढा छत्रपती जाहला, ही सामान्य गोष्ट झाली नाही..🌿
शिवाजी महाराजांवर पहिलं पुस्तक लिहीणं ही साधारण गोष्ट नव्हे.. वर्षाला हजारोच्या संख्येने शिवचरित्र प्रकाशित होतात. त्याच गर्दीत आपलंसुद्धा दीडदोनशे पानांचं योगदान, इथवर आपण सिमीत होऊन जाऊ अशी भीती वाटत होती. एका जवळच्या मित्राने सल्ला दिला, शिवाजी महाराजांच्या फक्त चित्रांवर लिहिलेलं पुस्तक असं किती जण घेतील? व्यावहारिकदृष्ट्या त्याचं मत 100% योग्य होतं. पण तुम्ही सर्वांनी ही सगळी भीती साफ धुडकावून लावली.
- केतन पुरी ♥️
काही दिवसांपूर्वी केतन पुरी दादा लिखित "मऱ्हाटा पातशाह" हे पुस्तक दुसऱ्यांदा काळजीपूर्वक वाचून पूर्ण केलं..कितीतरी दिवसांपासून मला याबद्दल माझं अनुभव लिहायचं होतं पण ते काही जमतं नव्हतं.कारण शिवराय आपल्या काळजाचा विषय आहे आणि त्यांच्या पुस्तकाबद्दल लिहायचं म्हटल्यावर घाईघाईत लिहून चालणार नव्हतं.म्हणून आता ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच या पुस्तकाच्या अनुभवापासून करायचं ठरवलं आणि आता माझा अनुभव शेअर करतोय.हे पुस्तक मुळात मी वाचलं नाही तर अभ्यासलं.समजून,उमजून घेऊन यातील बारकावे न्याहाळले.
70 पेक्षा जास्त संदर्भग्रंथ आणि 250 पेक्षा जास्त डच भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर करून अतिशय अपरिचित माहितीचे संकलन या संदर्भ ग्रंथातून लेखकांनी ज्या सोप्या आणि साध्या भाषेत आपल्यापुढे ठेवले आहेत त्यासाठी लेखकाचे खरंच आभार मानायला व कौतुक करायला हवे.छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा, त्यांची वेशभूषा,विचार करण्याची पद्धत, दैनंदिन जीवनशैली, समकालीन वा काही कालावधीनंतर देशी- विदेशी चित्रकारांनी काढलेली त्यांची चित्रे आणि त्यांचा जागतिक स्तरावरील गौरव याबद्दल विस्तृत संशोधन करून अत्यंत मेहनतीने केतन दादांनी हे पुस्तक लिहलं आहे.आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंगावर खूप काही लिखाण झालेलं आहे पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचे संशोधनकार्य अजून म्हणावे तितके झालेले नाही.आणि अशातच मऱ्हाटा पातशाह सारखं पुस्तकं येतं आणि ती उणीव भरून काढायचं काम करतं.
आजच्या काळात प्रामुख्याने गरज असलेलं हे महत्वपूर्ण पुस्तक प्रत्येकांनी वाचायला मुळात अभ्यासायला हवे.वाचून,समजून घेऊन शिवरायांच्या सानिध्यात जाऊन यायला हवे.हे पुस्तक वाचताना आपल्याला शिवरायांचे एक वेगळेच रूप बघायला,अनुभवायला मिळते.छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे ? त्यांचं बोलणं कसं असेल ? आपल्या खाजगी आयुष्यात त्यांचा वावर कसा असेल ?ते इतरांशी कशाप्रकारे वागत असतील ? इत्यादी काही प्रश्न आपल्या मनाला नेहमीच पडत असतात.आणि या प्रश्नांची उत्तरेच या पुस्तकातून आपल्याला मिळत जातात.यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व समकालीन चित्रांचा, त्यांच्या श्रीमानयोगी असलेल्या व्यक्तिमत्वाचा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मागोवा या पुस्तकांतून घेण्यात आला आहे.शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.हे पुस्तक जरी संदर्भ,संशोधत्माक ग्रंथ असलं आणि यामध्ये काही रंजक,थरारक लिखाण केलेलं नसलं तरीही हे पुस्तक वाचकाला कोठेही बोअर करत नाही.पावलोपावली दिलेली महत्वपूर्ण माहिती आणि केलेले वर्णन वाचून फार भारी वाटतं.तर प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीलाच शिवरायांचे दुर्मिळ कलर फोटो बघून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो एवढं मात्र नक्की.
पुस्तकात जागोजागी संदर्भग्रंथांची यादी पाहून केतन दादाच्या संशोधनाची खोली आणि त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आपल्या लक्षात येते व जाणवते.हे पुस्तक ऐकून 4 प्रकरणाच्या रूपातून आपल्या समोर येते. यामध्ये 1) "शिवरायांचे आठवावे रूप",
2)मऱ्हाटा पातशाह,
3)"शिवरायांचे बोलणे कैसे" आणि "
4) मराठा चित्रशैलीतील छत्रपती" या प्रकरणांचा समावेश होतो.यातील पहिल्या प्रकरणात ज्या ज्या देशविदेशातील प्रवाशांनी, अभ्यासकांनी शिवरायांना पाहिले होते,त्यांनी शिवरायांचे लिहून ठेवलेले वर्णन व नोंदीचा मागोवा या प्रकरणात घेण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात शिवरायांच्या जगभर विखुरलेल्या चित्रांचा मागोवा घेण्यात आला आहे.वेगवेगळ्या शैलीतील चित्रांचे वर्णन खूपच अभ्यासपूर्ण पद्धतीने या प्रकरणात करण्यात आले आहे.तिसऱ्या प्रकरणात शिवरायांचे बोलणे कैसे ? यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.खरंच शिवाजी राजा सारख व्यक्तिमत्त्व नेमके बोलायचे कसे ?आपण याबद्दल कधी विचार करतो का ?एखाद्या चित्रपट किंवा मालिकेत शिवरायांच्या पात्राची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या तोंडातून ज्याप्रमाणे संवाद दाखवतात शिवराय तसेच बोलतं असतील का ?
याबद्दल आपण कधी जास्त विचार करत नाही.
अवघ्या रयतेला आपलासा वाटणारा हा माणूस खरंच किती उत्कृष्ट बोलतं असेल ना ?याबद्दलच या प्रकरणात विस्तृत पद्धतीने माहिती देण्यात आली आहे.तर शेवटच्या चौथ्या प्रकरणात मराठा साम्राज्यातील वेगवेगळ्या शैलीतील चित्रांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेण्यात आला आहे.मध्ययुगीन काळातील चित्रकार आणि त्यांनी काढलेल्या विविध चित्रांबद्दल फारच रोचक माहिती आपल्याला वाचायला मिळते. एकंदरीत या पुस्तकाच्या निमित्ताने ऐतिहासिक माहितीचा एक नवा खजिना आपल्याला मिळाला आहे आणि तो खजिना आपण संग्रही करायला हवा..😊
आवर्जून वाचा...♥️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा