पाडस ❤️
काही दिवसांपूर्वी पाडस या अप्रतिम आणि भन्नाट अश्या कादंबरीचा माझा वाचन प्रवास समाप्त झाला.आणि मला काहीतरी वेगळं आणि हटके वाचल्याचा आनंद मिळाला.ही कादंबरी जरी "The Yearling " या कादंबरीचा मराठी अनुवाद असली तरीही कोठेही अजिबात अनुवादित वाटतं नाही. एवढं अफलातून अनुवाद राम पटवर्धन सरांनी केलेला आहे. जो उत्कृष्ट अनुवाद कसा असावा याचा एक आदर्श उदाहरण ठरतो.
मुळ लेखिका मार्जोरी किनन रॉलिंग्स लिखित ही कादंबरी खूपच वाचनीय असून प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी आहे.
1938 मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीत अमेरिकेतील फ्लॉरिडा संस्थानाचे एक वेगळे रूप रेखाटले आहे.यातील काळ शंभर वर्षांपूर्वीचा असून त्याकाळातील एका कुटुंबाची ही एक भावनिक आणि रोमांचक कथा आहे.
मागील एक आठवड्यापासुन मी या कादंबरीच्या सानिध्यात वावरतोय.जणू मी या कादंबरीचा एक भाग झालोय असा मला भास होतोय.मी यातील कथानकात एवढा गुंतलोय की मला आजूबाजूला यातील पात्रच दिसतं आहेत.
ज्योडी,पेनी, ओरी आणि इत्यादी पात्रांना मी जणू बोलतोय त्यांच्यासोबत शिकारीला जातोय,शेती करतोय व यांच्यासोबत मेजवानी करतोय असं मला वाटतंय.एकूण 416 पृष्ठसंख्या असलेली ही मनमोहक कादंबरी वाचताना जरासुद्धा कंटाळवाणी वाटतं नाही.सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवण्यात ही कादंबरी कमालीची यशस्वी होते.कादंबरीचा कथानक वाचकाला अखेरपर्यंत गुंतवून ठेवतो.तर शेवट सुन्न करून सोडतो जो वाचताना डोळ्यांतुन अश्रूंची धार कधी लागते समजतं सुद्धा नाही.यातील केलेल्या प्रत्येक पात्र, प्रसंगाचं वर्णन ज्याप्रमाणे केलेलं आहे ते आपल्याला एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणते.कादंबरीतील प्रत्येक घटना जणू आपल्या डोळ्यासमोर घडत असताना आपल्याला दिसते.
थोरो गुरुजींच वॉल्डन वाचल्यापासून मला या प्रकारातील पुस्तके वाचण्याचा छंद लागला आहे.तशी निसर्ग आणि अरण्याची आवड लहानपणी "जंगल बुक" ही सिरीज बघितल्यापासूनच लागलेली आहे.जंगलाच्या एकांतात आपण छोटसं घर करून राहावं,तेथेच शेती करून निसर्ग,पक्षी व प्राण्यांच्या सानिध्यात आयुष्य घालवावं असं मला नेहमीच वाटतं आलं आहे.आणि मुळात हा माझा एक स्वप्न आहे ज्याला दुजोरा वॉल्डनने दिला आहे.पाडस मध्ये सुद्धा याचं प्रकारे जंगलात राहून वास्तव्य करणाऱ्या एका बॅक्स्टर
कुटुंबाची कथा दिलेली असून जी वाचून मी या कादंबरीच्या अक्षरशः प्रेमात पडलोय.या कादंबरीने मला विचार करायला भाग पाडले.आधी 'अरण्यकांड' तर आता पाडसने मला जंगलाचा एक वेगळं रूप दाखवलं आहे.बाहेरून जंगल जेवढं सुंदर आणि मनमोहक दिसतो आतून तेवढंच तो भयानक असतो.येथे फक्त भुकेला महत्व आहे,भुकेच्या पुढे खरंच काही नाही.दया माया ला येथे काहीही महत्व नसतं.पोटाची खळगी भरणे फक्त एवढंच एक महत्त्वाचं काम येथे असतो.ही महत्त्वाची शिकवण सुद्धा मला या कादंबरीतुन मिळाली.
"भक्षक व्हा किंवा भक्ष्य व्हा" हा जंगलाचा कायदा मला यातून उमजला..
ज्योडी म्हणतो :- “एखादा प्राण्याचं रुपडं बघून त्यांची शिकार करावीशी वाटते. तोच प्राणी तडफडताना, रक्ताची धार लागलेला बघवत नाही, पण तो मेल्यावर त्याच्या मासांचे तुकडे केले की आता छान पदार्थ खायला मिळणार या भावनेने तोंडला पाणी सुटतं”.🙂
तर चला आता कादंबरीच्या कथेबद्दल बोलूया....❤️
अमेरिकेच्या फ्लॉरिडा या राज्यातले अफाट जंगल.सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा हा काळ.थोडेसे रान तोडून तयार केलेल्या शेतीवाडीत जिवापाड कष्ट करून कशीबशी गुजराण करणारे बॅक्स्टर कुटुंब आई बाप आणि बारा वर्षांचा कोवळा पोर ज्योडी. हिस्र श्वापदांनी वेढलेल्या त्या वाडीच्या भोवती काही मैलांच्या घेरात अजिबात लोकवस्ती नाही.तिथल्या एकाकी जीवनाची गाठ सदैव निसर्गाशी पडलेली असते.त्याच्याशी झगडायचे ,त्याच्याशी सलोखाही कायम ठेवायचा.निसर्गाशी दोन हात करत उदरनिर्वाह करत करत जगायचं.यांच्या रोजच्या आयुष्याचा उदरनिर्वाहचं साधन म्हणजे शेती, पशुपालन आणि शिकार.जंगलातील हरीण पासून तर अस्वलापर्यत प्रत्येक प्राणी हा त्यांच्या रोजच्या मेजवानीचा भाग आहे.हरणाचे, अस्वलाचे खारीचे, डुकराचे, कासवाचे- जे मिळेल त्याचे ताजे, सुकवलेले, खारवलेले किंवा धुरकटवलेले मांस, रताळ्याची रोटी, मक्याची खिचडी,अस्वलाच्या चरबीत तळलेल्या डुकराच्या मासाचे तुकडे, कोवळ्या खारीच्या मासाचा पुलाव, सुसरीच्या शेपटीचे तुकडे इत्यादी काही पदार्थ यांच्या न्याहारीत हमखास असतात.
या परिसरात एकटेपणाने वाढणाऱ्या ज्योडीला जिवाभावाच्या मैत्रीची अनिवार तहान लागलेली असते.एकेदिवशी त्याला हरणाचे एक पोरके 'पाडस' मिळते आणि त्या स्नेहबंधनात त्याचे जीवन तृप्तीने ओसंडू लागते.तो स्वतःला विसरून त्या पाडसाच्या प्रेमात वाहवत जातो.पण निसर्गक्रम हा अटळ असतो,आणि ज्योडीच्या बाळबुद्धीने त्या स्नेहबंधातून उभारलेल्या रम्य जगाच्या ठिकऱ्या उडतात.तो पाडस बघता बघता एक पाडा होतो. त्याच्या मोठेपणाची जाणीव बॅक्स्टर
कुटुंबाला होते.त्याची भूकही वाढते आणि मग तो बॅक्स्टर कुटुंबियांनी लावलेल्या पिकांचाच फन्ना उडवायला लागतो. त्याला कोंडून ठेवण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ होतात. आता बॅक्स्टर कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा रहातो. यामुळे शेवटी अनपेक्षितपणे कादंबरी जो वळण घेते तो फक्त वाचकाला सुन्न करून जाते.या वळणानंतर ज्योडीचे बाळपण संपते आणि तो नव्याच सुजाण आणि प्रौढ वृत्तीने जीवनाचा पुढे स्वीकार करतो.❤️
आता वळण नेमकं काय हे तुम्ही कादंबरीत वाचायला हवं..🙂
फ्लॉरिडामधल्या दोन म्हाताऱ्या शिकारी मित्रांनी सांगितलेल्या गोष्टींमधून ' द इयरलिंग ' उभे राहिले आहे. बँक्स्टर - कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाचा ' पाडस'मधील चित्रपट संथपणे डोळ्यांपुढे उल गडत जाताना आपल्याला अनेकदा मराठी ग्रामजीवनातील निसर्गसौंदर्य , रोमांचकारी प्रसंग , विनोदी घटना व वृत्ती , परंपरागत समजुती आणि या सायाला व्यापून उरणारे ' अशिक्षित ' ,अ - नागर शहाणपण यांची आठवण येते , ज्योडी आणि त्याचा बाप पेनी यांच्यामधल्या वात्सल्यपूर्ण जिव्हाळ्याचे मनोज्ञ चित्रण मराठीत नवीन वाटेल . आधुनिक शहरवासियांना दुर्मिळ झालेली निसर्गाची गूढ , प्रसन्न भीषण रूपे अस्सलपणे जाणवतील आणि ऋतुचक्राच्या संथ पण अखंड लयीचे भान वाचकाला पुन्हा एकदा लाभेल एवढं नक्की...❤️
याबद्दल लिहण्यासारखं खूप म्हणजे खूप काही आहे.पण मला वाटतं ते वाचकांनी कादंबरीतूनच अनुभवायला हवं...😊
©️Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ❤️🌿
Nice
उत्तर द्याहटवा