तू भ्रमत आहासी वाया ❤️
काल वपु काळे यांची एक सुंदर आणि प्रेमात पाडणारी ही कादंबरी वाचून पूर्ण केली.आणि तेव्हापासून या कादंबरीच्या आणि यातील सायरा या पात्राच्या अक्षरशः प्रेमात बुडालोय.माझ्या कल्पनेत मी माझ्या स्वप्नातील सायरा रंगवली आहे ती मला माझ्या आजूबाजूला दिसतं आहे.जागोजागी ती मला सुद्धा ओंकारनाथ सारखं महत्वपूर्ण तत्वज्ञान देतं आहे असं मला सारखं वाटतं आहे..एक वेगळ्याच प्रकारचं हँग ओव्हर मला या कादंबरीचा व वपु च्या लिखाणाचा चढला आहे जो सध्या सहजासहजी जरा सुद्धा कमी होणारा अजिबात नाही.कारण वपु काळे यांच लिखाणचं त्या प्रकारचा आहे जो वाचकांवर एक प्रकारची मोहिनी टाकून वाचकांना मंत्रमुग्ध करून टाकत असतो.🌿
वपु काळे यांनी आजपर्यंत खूप वेगवेगळं भन्नाट लिखाण केलेलं आहे.पण कादंबऱ्या त्यांनी बहुतेक निवडकच लिहिल्या आहेत. त्यापैकी ही एक कादंबरी आहे जी प्रत्येक वाचकाने वाचायला व मुळात अनुभवायला हवी. ही कादंबरी वाचल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये कमालीचं फरक जाणवतो.आपण कादंबरी वाचण्याआधी जो असतो ते आपण कादंबरी वाचल्यानंतर राहत नाही एवढं नक्की.. फक्त यातून वाचकाला महत्वपूर्ण आणि उपयोगी ते घेता यायला हवं.यामध्ये पावलोपावली तत्वज्ञान दिलेलं आहे जो खऱ्या अर्थाने आपल्याला विचार करायला भाग पाडतो..
उदा - यातील एक महत्वपूर्ण संवाद बघूया ज्याने वरील वाक्याची प्रचिती आपल्याला येते..
एकदा सायरा आणि ओंकारनाथ एका समुद्र किनार्यावर जातात.तेथे त्यांच्यामध्ये एक संवाद होतो.
तो खालीलप्रमाणे :-
सायरा :- "' समुद्राचं ऐकावं , बाकी काही करू नये . ह्या विराट अस्तित्त्वाच्या समोर क्षुद्र वाटेल , असं सगळं टाळावं ; स्वतःचा आवाजही ऐकू नयेस वाटतं , नेहमीच . '
ओकांरनाथ :- आजच्या दिवस तुमचा नियम मोडा . मी तुमचं बोलणं ऐकण्यासाठी आलो . ऑफिसात बोलता तसं काहीतरी . ' ‘
सायरा :-ऑफिसची गोष्ट वेगळी . ऑफिस म्हणा , घर म्हणा , तिथं वास्तुपेक्षा आपण मोठे असतो . मालकीचा अहंकार तिथं बोलतो . आपण क्षुद्र आहोत ह्याची जाणीव स्वत : ला करून देण्यासाठीच समुद्राजवळ बसायचं असतं . निसर्गाची प्रत्येक निर्मिती भव्यच असते . ' '
ओंकारनाथ :- तरीसुद्धा , तुमच्या मते अतिभव्य काय ? ?
सायरा :- माणूस. हा महासागर , ते क्षितीज , आकाश , मोजता येणार नाही . पण आपल्या एवढ्याशा डोळयाला ते दिसतं . रेटिना केवढास्सा , ब्रेनला संदेश देणारी ऑप्टिक नर्व्ह केवढीशी असेल ? ती मेंदूला काय नेमकं सांगत असेल ? मेंदू हेच एक प्रचंड विश्व आणि त्याच्याही पलीकडे मन . प्रत्येक माणूस वेगळा आणि प्रत्येक माणूस एकदाच महाभारताच्या आधीपासून तो माणसं घडवतोच आहे . पण रिपीटेशन नाही . डुप्लिकेशन नाही..💕
आता यातील एक उतारा बघूया जो खरंच खूप भन्नाट आहे..
''वाऱ्याची तीच झुळूक दुसऱ्यांदा येत नाही . पंख्याशिवाय चैन पडलं नाही , तरीही ते वारं नकोसं वाटतं . ' कारण तीच तीच हवा तुमच्याभोवती वेढे घालते . सुखाची पुनरोक्ती झाली तरी त्याचा शीण येतो . त्यात ताजेपणा नसतो . पावसाचा प्रत्येक थेंब नवा असतो . समुद्राची प्रत्येक लाट कोरीकरकरीत असते . नदीवर आंघोळ केली तर नदीचं नाव तेच असलं तरीही पाण्याचा प्रवाह वेगळा असतो . पाण्यात उतरतो तेव्हाचं पाणी कधीच पुढे जातं , पाण्यातून आपण बाहेर येतो ते पाणी बदललेलं असतं . प्रत्येक क्षणाचं भिजणं वेगळं असतं . सगळी समृद्धी असून माणसाला त्या जगण्यात जेव्हा आनंद निर्माण करता येत नाही तेव्हा समाजावं , नव्या दिवसाची किरणं त्याला झेलता आली नाहीत . तो कालचाच परिचयाचा दिवस आज जगतोय . निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाचीच एक निर्मिती असूनही माणसाला उबग येतो , ह्याचं कारण काय ? -तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून ठेवतो . भूतकाळावर अलोट प्रेम . पार केलेलं दुःखही आठवत बसायचं आणि उद्याचा दिवस कसा असेल यासाठी पत्रिका , कुंडली दाखवत रहायचं . आजचं चांदणं दिसत नाही आणि कोजागिरी कधी यासाठी छापलेले चौकोन शोधायचे . प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला तर कोजागिरी मावळतच नाही..❤️
भारी ना? 😀 असे कितीतरी अफलातून संवाद आणि वाक्य आपल्याला वाचायला मिळतात.जे वाचून आपण फक्त आणि फक्त थक्क होऊन जातो.एक नवीन दृष्टीकोन या कादंबरीतून आपल्याला मिळून जातो.त्यामुळे अजिबात ही छोटीशी कादंबरी कोणीही चुकवू नये अशी आहे.कादंबरी जरी छोटीशी असली तरीही यातील शिकवण खूप मोठी मिळते.एकंदरीत ही कादंबरी एक आरसा आहे ज्यामध्ये आपण आपला प्रतिबिंब बघू शकतो.
संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीत म्हणतात :-🌿
तैसी हे जाण माया,
तू भ्रमत आहासी वाया
शस्त्र हाणीतली छाया
जैसी अंगी न रूपे "
वपु काळे यांच्यावर या ओवीचा प्रभाव पडला होता म्हणतात.तो त्यांनी आपल्या कल्पकतेने या कादंबरीत खूपच सुंदर पद्धतीने उतरवला आहे.
"तू भ्रमत आहासी वाया"यातील वाया चं अर्थ व्यर्थ किंवा विनाकारण असा होतो.जो कादंबरी वाचत असताना पावलोपावली आपल्याला जाणवत असतो.यातील सायरा आणि तिचे गुरू आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडतात.सायरा आपल्या प्रेमभंगाला पचवून त्याच्या बॉसचं आयुष्य कशाप्रकारे बदलते हे वाचणं फार इंटरेस्टिंग आहे.सायराचे विचार आणि तिचं जगणं,वागणं,बोलणं हे सर्वकाही आपल्याला प्रभावित करून जातो.सायरा ही आपल्याला नेहमी आदर्शवत वाटते.आपल्याला आपल्या वर्तुळाबाहेर जाऊन विचार करायला ती नक्की भाग पाडते.बुद्ध, ज्ञानेश्वर, कबीर, ओशो यांचे विचार आपल्या मस्तकात पेरत जाते.अशी ही सायरा आपल्या आयुष्यात आपल्याला हवीहवीशी वाटतं राहते.बाकी आपल्याला सायरा मिळो अथवा न मिळो पण आपण एखाद्यासाठी सायरा नक्कीच होऊ शकतो.एखाद्याच आयुष्य नक्कीच बदलू शकतो एवढं नक्की.❤️
तर कादंबरीच्या कथेच्या रुपरेषेबद्दल मी अजिबात काहीही लिहीत नाही.कारण आपल्याला कादंबरी वाचायला प्रवृत्त करायला वरील नमूद केलेले मुद्दे पुरेसे असतील असं मला वाटतं.आणि आपण कुठलीही पूर्वकल्पना न घेता ही कादंबरी वाचली तर तेच बेस्ट असेल एवढं नक्की.. सो बाकी काही मला आवडलेले यातील निवडक विचार बघूया..❤️
1)"रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं"
2)"आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्वं दुसर्याला थेअरी वाटते."
3)"जगातला सर्वोच्च आनंद निर्भयतेत आहे आणि माणसाला निर्भय करण्याचं सामर्थ्य फक्त प्रेमात आहे"
4) एखाद्या तानेला कडाडून टाळी दिल्यावर कुणी सॉरी म्हणत नाही . उत्कट आशय , आविष्कारासाठी पटकन् शॉर्टकट शोधतो . टाळी म्हणजेही रसिकांनी मनातल्या मनात कलावंताला केलेला तो स्पर्शच असतो .
5)जित्याजागत्या माणसांपायीच आपण कमजोर आहोत की बलवान , हे आपल्याला समजतं . निर्जीव वस्तूंकडून हे शिकता येत नाही . वस्तूंचा संग्रह जितका वाढव न्यावा तितका अहंकार वाढत जातो . सगळे संतमहात्मे संग्रहाच्या विरुद्ध आहेत ते काय उगीच ? परमेश्वराचं नामस्मरण करता करता ते शेवटी परमेश्वराचीही मागणी करीत नाहीत ..
तर बस्स बाकी कादंबरीत वाचा..
चूकवू नका ❤️
©️Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा