अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट 🌿
काही दिवसांपूर्वी आनंद विंगकर सर लिखित "अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट" ही महत्वपूर्ण विषयावरील अस्वस्थ करणारी व एकंदरीत सुन्न करून सोडणारी कादंबरी वाचून पूर्ण केली.तेव्हाच मला याबद्दल लिहायचं होतं पण शब्दचं मिळत नव्हते.🙂
आज कादंबरी वाचून एक आठवडा पार पडला तरीही या कादंबरीचं भारुड माझ्यावरून उतरलेलं नाही.अजूनपर्यंत आतून कोठेतरी मी या कादंबरीच्या विश्वातचं वावरतोय.यातील पात्र आणि प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून गेलेले नाहीत.निःशब्द करून सोडून ,विचारांच्या चक्रात बुडवणाऱ्या या कादंबरीने मला आतून हेलावून सोडलंय. शेतकऱ्याचं दुखणंच यातून मांडलेलं नाही तर त्यापेक्षा कितीतरी मुख्य गोष्टींवर लेखकांनी भाष्य करून वाचकांच्या डोळ्यांत अंजन घातलं आहे.हे ही कादंबरी फक्त दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्याची कथाच नसून वास्तव दाखवणारा एक आरसा आहे. यातून लेखक आपल्यासमोर भयानक वास्तव मांडतात, विविध असंख्य प्रश्न उपस्थित करतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात.
महाराष्ट्रातील एका गावात एका अवकाळी पावसाच्या दरम्यान घडलेली ही एका शेतकऱ्याची हृदयविदारक कथा आहे.ऐन सुगीच्या वेळेला तोंडाशी आलेला घास.अवकाळी पाऊस हिरावून घेतो.येथे फक्त सुखा दुष्काळचं नुकसान करत नाही तर ओला दुष्काळ सुद्धा त्रास देऊन जातो हे प्रामुख्याने अधोरेखित होते.समोर काहीच आशादायक दिशा दिसतं नसल्याने व सावकाराचा कर्ज फेडण्याच्या तणावाने ग्रस्त होऊन यशवंत (यशानाना) नामक कर्जबाजारी शेतकरी आपली पत्नी कष्टकरी (पार्वती) सोबत औषध घेऊन आपली जीवनयात्रा कायमसाठी संपवतो.व पाठीशी आपल्या तिन्ही मुलींना पोरकं सोडून जातो.या नंतर घडत जाणाऱ्या गोष्टी त्याच्या कुटुंबावर आलेली संपूर्ण जबाबदारीचं ओझं आणि यशानाना जिवंत असताना आणि त्याच्या मेल्यानंतर घडलेल्या घडामोडी या कादंबरीत आपल्याला वाचायला कमी तर अनुभवायला जास्त मिळतात.यातील कितीतरी प्रसंग,संवाद सरळ सरळ अंगावर येतात. कितीतरी संवाद आणि प्रसंग वाचून अंगावर काटा उभा राहतो.वेगवेगळ्या परिस्थितीत पात्रामधील संवाद तर यातील फार जमेची बाजू आहे.
प्रत्येक प्रसंगाच वर्णन लेखकांनी एवढ्या जिवंतपणे केलेलं आहे जे वाचत असताना जणू हे सर्वकाही आपल्या डोळ्यासमोर घडत आहे किंवा ही कथा आपल्याच गावात घडत असल्याचा भास आपल्याला होतो.यातील प्रत्येक पात्र आपल्याला समोर दिसायला लागतो आणि कळत/नकळतपणे आपण कधी याचा भाग होतो हे आपल्याला कळतं सुद्धा नाही.
यातील पात्रासोबत आपण कधी संवाद साधू लागतो व कधी यांच्या सुखा-दुःखात आपण अप्रत्यक्षरित्या सहभागी होतो हे समजतं नाही.कारण लेखकांनी या कथेचं नॅरेशन चं याप्रकारे केलेलं आहे.जे वाचताना आपण पूर्णपणे यामध्ये हरवून गेल्याशिवाय राहतं नाही.
जसं जसं कथानक पुढे जातो तसं तसं आपल्याला वेगवेगळ्या पात्रांचा परिचय होत जातो.या पात्रांची मानसिकता व मनाची अवस्था आपल्या समोर उलगडत जाते.यातील प्रत्येक पात्राची आपली एक वेगळी कहाणी आहे जी फ्लॅश बॅक मध्ये जाऊन थोडक्यात लेखक आपल्यासमोर मांडण्यात यशस्वी होतात.या कुटुंबाच्या आणि गावातील काही पात्रांच्या अवतीभवतीच ही संपूर्ण कादंबरी फिरते.पण फक्त एवढ्याच पूर्त ही कादंबरी मर्यादित नसून यापलीकडे जाऊन खूप काही गोष्टींवर यातून भाष्य केलं गेलेलं आहे. जागतिकीकरण, हवामान बदल, पुरोगामी चळवळी,प्रादेशिक असमतोल,बालविवाह,शेतकऱ्याची दयनीय अवस्था,शेतकऱ्यांना कुठलीही मदत न करणारी आपली व्यवस्था ,स्त्रीशिक्षण इ.इत्यादी कितीतरी विषयावर/प्रश्नांवर खूपच वेगळ्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे.
एकूण काय , तर आत्महत्या करीत असताना कोणी बघणारा माणूस ओळखीचा बिगर ओळखीचा , जाती - परजातीचा असू द्या , निष्क्रिय राहात नाहीच . एवढं असून यशानाना आत्महत्या करतोयच प्रत्येक गावात . कोणी थांबवू शकलेलं नाही त्याला . ना बायकोपोरं ना गणगोत - भावकी , जातीतली गावातली अन् असंच पुढे सरकार अन् साम्राज्यापर्यंतची संपूर्ण यंत्रणा . या सर्वांना डावलून प्रत्येक गरीब मग तो कामगार , शेतकरी , बेकार , जातपात न मानणारा मानवतावादी कोणीही असूद्यात , आत्महत्येच्या वाटेवर एकट्या एकट्याने चालतच आहेत हे सर्वजण . सर्वांचीच होत आहे पिळवणूक . जगणं आहे असुरक्षित , अपमानित अन् लाचार . तरीही त्यांचा मोर्चा होत नाही . ' आत्महत्येच्या वाटेवर उभे असलेल्या माणसांचा मोर्चा ! ' अशी कोणती बातमी छापून येत नाही पेपरात . मोर्चा राहू द्या वारीचं स्वरूपसुद्धा येत नाही . मोर्चेकऱ्यांची आषाढी - कार्तिकी . पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेच्या टोकावरून दिल्लीजवळ येणारा लाँग मार्च . वर सरकारला राहू द्या , त्या ईश्वराला , पांडुरंगाला साकडं का • घालीत नाहीत . यातून संवाद सुरू होईल , आत्मबळाच्या ओव्या - अभंग होतील आणि कोणी सांगावं , आत्मघाताविरोधी कारवाईची शक्यता इथूनच निर्माण होईल . पण असं काहीच सांस्कृतिक वा राजकीय पातळीवर घडताना कुठे दिसत नाहीय ..
वरील उताऱ्यातून आत्महत्या करत असलेल्या शेतकऱ्याच्या मनाच्या अवस्थेबद्दल लेखक भाष्य करतात तर खालील उताऱ्यातून एका महिलेचं दुःख आपल्यासमोर मांडतात.जे वाचून आपण गहिवरून गेल्या शिवाय राहत नाही.
कुशीवर वळत त्याने तिच्या अंगावर हात टाकला. शरीराची ऊब, आपल्याजवळ कोणतरी आहे म्हणूनचा आधार, यातून ती थोडी सैलावली. पोटात घेतलेले पाय तिनंं सरळ केले. होकाराची ही सुरुवात असेल म्हणून तो मोहरला. आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या आपुलकीनं बाईला समजावून घेत होता. दिवसरात्र नुसतं ढोरासारखं काम, पैशासाठीचा स्वार्थ, इतरांचा द्वेष, इच्छेसारखं काय घडलं नाही अथवा पाळला नाही एखाद्याने दिलेला शब्द तर त्याच्याविषयी वाटणारा इसाळ. नाहीतरी रानात आभाळाच्या खाली आतून निवळ शंख पाण्यासारखं असूंसुद्धा असंख्य वाईट विचारांनी मळून गेलेला आत्मा. दिवसरात्र कडवट तंबाखू खाऊन छाती-तोंडात पित्त वाढावं तसा आपला अहंकार. स्वतःचं भान हरवून दुसर्यात सामावण्याचा माणसाच्या जगण्यातला हा एवढाच विसावा.
त्याला वाटलं हे बायकोचं शरीर नाही. ढोलाच्या हाताळणीकडचं कमावलेलं तलम कातडं. साधी बोटं फिरवली तरीही ते केवढं थरथरतंय.
ती निमूट पडून राहिली. आता जर का आपण आढेवेढे घेतले तर हा माणूस जीव घ्यायला कमी करणार नाही. परत त्याच्या मनात बसलेलं तक्रारीचे भूत अंगात येऊन घुमायला लागेल. आणि आपला कसलाही संबंध नसताना त्यात ह्यो माणूस छळत राहील. त्यापेक्षा घोर नकाराच्या पलीकडून नुसतं पडून राहावं.
त्याच्या कोणत्याही गोष्टीला तिनं प्रतिसाद दिला नाही. जसं या क्षणी हे शरीर तिचं नाही. डोळे घट्ट मिटून घेतले, श्वास रोखला तिनं आतल्या आत. त्याला वाटलं आता कोणतीच आडकाठी राहिलेली नाही. याच दरम्यान आख्या गावात आपणाशिवाय कोणी नाही, या एकटेपणाच्या जाणिवेनं काळ्या रडायला लागला. त्याचा व्याकूळ आलाप पावसानं अन् दुःखानं झोडपून काढलेल्या निशब्द गावापासून खूप दूरवर गेला. प्रत्येकजण घरच्या काळज्या अन् दुःखं करून कोसळलेल्या सुतकात चिंताक्रांत. काळ्याच्या दुःखद रडण्याला, एरव्हीसारखं अशुभ समजून हाड-हाड म्हणायला कोणी बाहेर आलं नाही. त्यामुळे अतीव दुःखात तो सूर लावून रडायला लागला..
शेवटी रंगनाथ पठारे सर या कादंबरीबद्दल म्हणतात ते अगदी अगदी पटून जातं.
ते म्हणतात :-
कवी आनंद विंगकर यांची ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही एक अकस्मात घडलेली घटना आणि एक अस्मानी संकट यांच्या छायेत सुरु होते. अस्मानी संकटामागच्या मानवी हस्तक्षेपांचं भान देत, अकस्मात उद्भवलेल्या घटनांच्या मालिकांची अपरिहार्य शोकात्म परिणती दिग्दर्शित करत त्या वातावरणातील बदलते मानवीभाव, मानवीजीजीविषा, कणखरपणा यांचा गंभीर प्रत्यय देते. रंजकतेच्या पारंपरिक कुप्रथांचा त्याग करूनही ही कादंबरी अत्यंत वेधक उतरली आहे. कारण लेखकाचं वृत्तिगांभीर्य आणि भावनात्मक ताटस्थ्य. आत्महत्या करणारं शेतकरी जोडपं, त्यांची थोरली लेक, तिचा प्रियकर यांची चरित्रं आणि एकूण कथानकाचं वाहतेपण प्रभावी आहेच, खेरीज ग्रामसमाजातील व्यवहार, परस्पर संबंधाचे ताणेबाणे यांच्यातील अस्सलतेमुळे ही कादंबरी अधिक मोठा आवाका धारण करते. कादंबरी वाचून संपवताना आपण ती वाचण्याआधी चे उरत नाही, हे तिचं महत्वाचं यश आहे.
तर अजिबात चुकवू नये अशी ही महत्वपूर्ण कादंबरी आहे.याबद्दल लिहण्यासारखं बरंच काही आहे पण ते माझ्यालेखी लहान तोंडी मोठा घास होईल म्हणून जाणून बुजून लिहीत नाही.वाचकांनी वाचून समजून,उमजून घेऊन त्यावर विचार करायला हवं..❤️
एकंदरीत नक्की नक्की वाचा..🌿❤️
©️Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा